Thursday, April 25, 2019

Modern Imroz Amrita

आधुनिक इमरोझ अमृता

इमरोझ ह्या पत्राबद्दल प्रचंड आदर,कौतुक,आतमियता,कुतूहल.
आपण जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीचे प्रेम अपंग. अपंगत्व हे शारीरीकच असते,ही चुकीची कल्पना. अपंगत्व,हे बौद्धिक,भावनिक,आर्थिक आशा अनेक प्रकारांचे असू शकते. अमृताचे प्रेम,हे इमरोझच्या दृष्टीने अपंग,कारण तिचा जीव जडला होतो साहिर या प्रतिभावान साहित्यिकावर. इमरोझ वर प्रेम करण्याची क्षमता पांगळी होती. त्या अर्थाने तिचे प्रेम अपंग होते.
हे तिचे अपंगत्व त्यांच्या नात्याला कधीच ग्रहण लावू शकले नाही. परताव्याची अपेक्षा न करणारे,बिनशर्ती,निरपेक्ष. स्वतःच्या प्रेमाबद्दल इतका आत्मविश्वास. कुठलीच असुरक्षितता नसलेले,सतत  तिच्यावर वर्षाव करणारे,एक अद्वितीय अलौकिक प्रेम.
असे प्रेम खरच असू शकते का,ही शंका सदैव मनात घर करून होती. मग मनाची समजूत घालण्या साठी ' तो जरा विक्षिप्त असावा, थोडा सरकलेला असेल, प्रेम या कल्पनेच्या प्रेमात असेल, असे अनेक तर्क वीतर्क.
     पर्वा एका पेशंटचा अपॉइंटमेंट घेण्यासाठी फोन आला. मी त्याच्या बायकोचे ओपरेशन 12 वर्षा पूर्वी केले होते. मणक्याची गाठ होती. तिला परत दाखवायचे होते. मला आठवत नव्हती ती केस. मी त्याला सकाळची अपॉइंटमेंट दिली.
दिलेल्या वेळी मी हॉस्पिटल ला निघालोच होतो, की फोन आला हॉस्पिटल मधून. तुमची पेशंट येऊन थांबलीये.
मी पोचलो आणि केबिन मध्ये शिरताना ती दिसली. खुर्चीवर बसली होती. तिच्या प्रसन्न चेहेऱ्यावर आनंदी हास्य उमलले. मी त्यांना आत बोलावले.
चेहेरा ओळखीचा होता. मग एकदम तिचे टोपण नाव आठवले. 'पालथी मावशी'. आणि मग सगळी केस स्पष्ट आठवली. 2007 सालातली केस. तेव्हा जेमतेम 15 वर्षाची होती ती. भावाने उचलून आणली होती तिला. पायावर बऱ्यापैकी खोल जखमा होत्या. तिच्या चेहेऱ्यावर उदासीनता होती.
जन्मली तेव्हाच पाठीवर माकड हाडावरील भागात गाठ होती. (Lumbosacral meningocoele). सार्वजनिक रुग्णालयामध्ये गाठीचे ऑपरेशन केले. नंतर, वय वाढायला लागल्यानंतर 5 वर्षाची झाल्यावर पाऊलं दुखायला लागली,आणि लंगडत चालायला लागली. तो त्रास वाढत वाढत इतक्या स्तरावर गेला, की आता 15 वर्षाची होईपर्यंत,पायावर जखमा,लघवी,शौचावर गेलेले नियंत्रण, पाय निर्जीव,वाळलेले,आणि हातांवर भार देऊन रांगत घरीच वावरायची. MRI.केला तेव्हा निदान झाले आणि माझ्या हॉस्पिटल ला पाठवून दिली. खूपच केविलवाणी परिस्थिती. आर्थिक दृष्ट्या खूपच दुर्बल.
मी MRI. बघितला आणि मला लक्षात आले की तिचा मज्जा रज्जू पूर्वीच्या ऑपरेशन केलेल्या गाठीच्या ठिकाणी चिकटला होता आणि त्यामधून निघणाऱ्या नासंवर ताण पडल्यामुळे नसा काम करत नव्हत्या( tethered cord)
ऑपरेशन करायचे ठरले आणि 5 तास झगडून त्या नसा मोकळ्या करून,त्या स्पायनल कॉर्ड ला सोडवले.
मणक्याभोवती वाहणाऱ्या CSF हे पाठीतून लीक होऊ नये म्हणून पोस्ट ऑप तिला 3 आठवडे पालथं झोपायला  लागले. तिला चेष्टेत रोउंडवर ' कशी आहे आमची पालथी मावशी? असे विचारायचो. ती हसत हसत उत्तर द्यायची आणी कधीच तोंड वाकडं केलं नाही.
कालांतराने,तिचे टाके काढून तिला घरी पाठवली. कॅथेटर होता आणि पायाच्या जखमा थोड्या भरू लागल्या होत्या.
     त्या दिवसानंतर थेट कालचा फोन. आणि आज आमची तब्बल 12 वर्षांनी भेट.
तिचा हसरा चेहेरा,आणि सोबत एक धडधाकट 30 वर्षाचा तरुण. तिचा नवरा. त्यानेच  फोन केला होता.
मी विचारल्यावर तिने लाजत लाजत सांगितले- "सर,आमचं लव्ह मॅरेज आहे. अडीच वर्षे झाली लग्नाला. आता, मी आधार घेऊन चालू शकते. घरची सर्व कामे व्यवस्थित करू शकते.सर, तुम्ही मला नवीन आयुष्य दिले आहे. मी स्वतः उभी राहू शकते"
 त्यांचे एकमेकांवरचे प्रेम त्यांच्या आविर्भावातून स्पष्ट व्यक्त होत होते. मी त्याला माझ्या मनातला स्वाभाविक पुढचा प्रश्ण विचारणार,इतक्यात स्वतःला आवरले.
हा धडधाकट देखणा तरणाबांड युवक. त्याचे प्रेम,हे तिच्या व्यक्तिमत्वावर, तिच्या गुणांवर. तिच्या आत्मिक सौंदर्यावर. तिचे व्यंग त्यांच्या नात्याच्या आड येत नव्हतं.
हा आधुनिक इमरोझ,त्याच्या प्रेमात कुठेच दयेची,उपकाराची, छटा नव्हती.
मला जाणवलं,की मी जरी माझी शंका त्याला विचारली असती, तरी त्याच्या उत्तराचा अर्थ समजण्या इतकी प्रगल्भता माझ्याच जवळ नव्हती. अपंगत्व हे दृष्टीचे असते,दृष्टीकोनाचे असते. इमरोझ चे प्रेम मला कधीच का उमगले नाही,याचे कारण माझे 'प्रेम' या संकल्पनेचे व्यंग.
मी फक्त त्याच्या पाठीवरून कौतुकाचा हात फिरवला, त्यांच्या वैद्यकीय शंकांचे निरसन केले,आणि भरलेल्या डोळ्यांनी आणि अंतकरणाने त्यांचा निरोप घेऊन गाडीत बसलो.

डॉ दीपक रानडे.

No comments: