Thursday, April 25, 2019

Marathi kanyadaan

आज सोनियाच्या कन्यादानाचे सौभाग्य. सर्वात श्रेष्ठ, सर्वात पवित्र,सर्वात पुण्यशील, असे हे दान.
कोणी कोणाचे व कशाचे दान करणार.
 सोनिया बरोबर घालवलेले क्षण,तिच्या आठवणी, तिचे ते लोभस हास्य,तीची अतीव संवेदनशीलता,तिचे अफाट कर्तृत्व,तिचे खळखळणार्या पाण्यासारखे हसणे, तिचा तो अल्लडपणा, तिचे गोजिरवाणे सौंदर्य,तिची तीक्ष्ण क्रीयेटीव्ह बुद्धिमत्ता,तिचे तयार होताना दोन दोन मिनिटाला आई आई हाक मारणे, तिचा न्यूयॉर्क मधील छोटासा पण अत्यंत नेटका मांडलेला संसार, तिचा लाघवी स्वभाव,तिच्या नर्तकी सारख्या डौलदार हालचाली,तिचे भावनांनी ओतप्रोत भरलेले हिरणाकशी डोळे, अत्यंत बायकी गप्पा,आणि त्याच बैठकीत अद्वैतवादावर चर्चा, रात्री उशिरा पर्यंत कट्टा,मग मस्त कॉफी,आणि त्यानंतर लॉंग ड्राईव्ह. एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून डोळ्यात पाणी येई पर्यंत  पोट धरून हसणे.कंपास लावून कोरलेल्या चेहेऱ्यावर ना कधी आठी ना कधी नाकारकमकतेचा औंश. सौंदर्याला उजळून टाकणारी विनम्रता,सहजता,आत्मविश्वास आणि एक अलौकिक पावित्र्य.
सोनिया माझ्यात तुझे दान करण्याची पात्रता नाहीये. किंबुहना, तेवढे पुण्य सुद्धा नाहीये.
एका झंझावाती वादळाचे, एका दैवी व्यक्तिमत्वाचे,एका अप्सरेचे दान करण्याचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. तू वातसल्याचे प्रतीक, तू सहृदयतेची अभिव्यक्ती,तू सौंदर्याची मूर्त,तू कोमलतेचे प्रतिबिंब. इतके सारे दान करण्याची श्रीमंती माझ्याकडे नाहीये।  माझ्याजवळ सगळ्यात अनमोल असलेला ठेवा,तुझ्या बरोबर घालवलेल्या क्षणांच्या. त्या आठवणींचे दान करण्याचा प्रयत्न करेन. तुझ्या भावी आयुष्याला भरभरून आशीर्वादांचे दान करेन. तुला मी कमावलेल्या सर्व पुण्याचे दान करेन. कन्या व्हावी तर ऐशी .
ह्या कन्या तत्वाचे दान करण्याचे सौभाग्य दिल्याबद्दल माझ्या दैवाला शतशः प्रणाम. आणि मला कन्येचे सुख व दान करण्याचा अधिकार दिल्याबद्दल तुझे ही शतशः आभार.

No comments: