Thursday, April 25, 2019

Marathi Chaukat Raja

चौकट राजा,बदाम राणी

कॉलेज मध्ये आपल्या वर्गात तरतर्हेचे मित्र, मैत्रीणी यांच्याशी जवळून संपर्क येतो. वैद्यकीय अभ्यासक्रमात तर सगळीच हुशार,कर्तबगार मंडळी. चौकटीतला अभ्यासक्रम,कलासेस,ढोर मेहेनत, सिंसीयरली दिलेले पाठ वेळेत आटोपून,अभ्यासू  मंडळींनबरोबर स्पर्धेत उतरणे माझ्या सारख्या अत्यंत टवाळ,धम्माल करणाऱ्या व्यक्तीची झोप उडवून टाकणारे.
पहिल्या टर्मएन्ड परीक्षेनंतर एक अव्यक्त पण बोचणारी "अकॅडेमिक हायरारकी" - 'बुद्धीवर्णता' उदयास आली. या बुद्धीवर्णते मध्ये आमचा क्रमांक खूपच खाली लागला. कोण किती अभ्यास करतोय,हे कोणास थांग पत्ता लागू न देत, सगळे घासायचे. आम्ही टाईम पास करत हिंडायचो, सिनेमा,पार्ट्या,ट्रेक ला जाणे इत्यादी कुमार वयातील लीलां मध्ये झोकून टाकले आणि मग टर्म एन्ड परीक्षेत दिवे लावले. खडबडून जागे झालो. उपाय शोधणे गरजेचे. ऍडमिशन मिळवणे एकवेळ सोपे,पण ऍडमिशन ला पात्र आहे,सिद्ध करणे अधिक कठीण. इतर हुशार मंडळी कसा अभ्यास करतात,याचा वेध घ्यावा. 
एका अत्यंत अकॅडेमिक, नुमवी अ तुकडीतल्या मित्राला एकत्र अभ्यास करण्याचे खूप साकडे घातले. तीन चार दिवसात त्याच्या आईने हा प्लॅन उधळून टाकला. तुमच्या गप्पाच जास्त,अभ्यास कमी असे ताशेरे ओढून माझ्या अकॅडेमिक उत्क्रांतीवर घाव घातला. आपण आपल्याला जसे जमेल,तसा आणि तेवढाच अभ्यास करायचे ठरविले. आपण प्रस्थापित चौकटीत कधी बसूच शकणार नाही,याची पदोपदी जाणीव होत होती.
अभ्यास, मग तो कुठला का असो, कन्सेप्टच्युअल लेवल वरच करणे मला शक्य होते. शरीररचना, बायोकेमिसट्री फिजिओलॉजी,इत्यादी विषय घोकंपट्टीचे. कर्मधर्म संयोगाने स्मरणशक्ती बरी असल्याने फर्स्ट एम बी बी एस परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झालो. मित्र मैत्रिणींना जरा धक्काच बसला. मी फार अभ्यासू नसल्यामुळे,मार्क बघून थोडी पोटदुखी स्वाभाविकच होणार. अभ्यास कुठे करतो आम्ही,हे एकीकडे म्हणणारे ' तुला किती मार्क्स मिळालेत' हे हळूच विचारायचे. दामभिकता जाणवणारी. मी जरा अतिरेकीच. धम्माल करताना टोटल धम्माल, आणि अभ्यास करताना ( जो काही थोडा करायचो) झोकून टाकायचे. चौकटीत दोन्ही थोडे स्तिमित. कुठलाच अतिरेक नाही. सगळेच खूप नियोजित,कंट्रोल्ड.  पोक्त विचार,अकाली प्रौढ वर्तणूक. एखादा भारी पंच असलेला विनोद केला, किंवा जरा वर्गात कल्ला केला,तर "कम ऑन,ग्रो अप" असे पालकत्वाच्या ओतप्रोत भरलेले एक्स्प्रेशन देत नाकं मुरडणारी मंडळी.
चौकटीमधील अलिखित,अव्यक्त,सुप्त नियमावलीच्या अस्तित्वाची जाणीव होत होती. लोकांचे टोमणे,भुवया,चेहेर्यावरील हावभाव आपण केलेल्या उल्लंघनाची जाणीव करून देत होते.
माझा पोशाख- फाटक्या जीन्स,बुलेट मोटोरसायकल, गिटार,धूम्रपान,  वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या प्रतिमेशी विसंगत.
आमच्या वर्गातला सगळ्यात हुशार,सिंसीयर, निर्व्यसनी,सगळे कलासेस आणि क्लीनीकस रेगुलरली अटेंड करणारा चौकट राजा. वडील सुद्धा प्रथित यश नावाजलेले डॉक्टर. आणि,आमची "बदाम राणी" त्या चौकट राजावर भाळलेली.
प्रत्येक वर्गात,प्रत्येक मुलाच्या आयुष्यात असते ही बदाम राणी.
बदाम राणी हमखास अबोल,लाजरी,सुंदर,आणि चौकट राजाच्या शोधात. आमचा नंबर लागणे अशक्यच. चौकटीत आणि बदाम राणीच्या हृदयात कुठेच स्थान न मिळाल्याने आपण बंडखोरी स्वीकारली.
चौकटीची, चौकट राजाची,बदमराणी, सगळ्यांची ऐशी तैशी.
आपण आपल्या चौकटीच्या बाहेरचे आयुष्य जगू.
चौकटीच्या बाहेरचे जग हॉस्टेल मध्ये राहिल्यावर अजूनच  जवळून पहिला मिळाले. कोणीही कौतुक,चोचले,लाड करणारे नव्हते. Each to his own.
 चौकटीच्या पलीकडची दुनिया खरच खूप वेगळी. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या जवाबदरीवर करायची. कोणी डोक्यावर बसून कळप सोडून जाणार्या मेंढराला परत कळपात सक्तीने आणणार नव्हते.
चौकट राजा चौकटीत आत्ममग्न,आपले अधिराज्य गाजवत,आपल्याच नादात. पाहिजे ती पीजी सीट मिळालीच. बदामराणीने आपली कूच चालू ठेवत, इतर चौकट राज्यांच्या शोध चालू ठेवलाच होता.
आपण नाद नाही करायचा. चौकटीतुन खूप पूर्वीच हकालपट्टी झाल्यामुळे,चांगले मार्क्स मिळूनसुद्धा त्याचा बदामराणीवर काहीच असर नाही.
असो, आता कित्येक वर्ष उलटली आहेत.
चौकट राजाचा कालांतराने चौकट गुलाम बनला. चौकटीचा आता खूप तिरस्कार वाटू लागलाय. चौकटीतल्या नियमांचा नव्हे. बंड चौकटी विरुद्ध नव्हताच.  बरेच चौकट राजे,चौकट राण्या, नजर चुकवून चौकट ओलांडून सीमोल्लंघन करताना जाणवत होते. वरवर्ती म्हंटल तर चौकटीचे सभासदत्व राखून असतात. सुमडीत कोंबडी.  चौकटी बाहेरच्याचे धिंडोरे उडवणे, त्यांची अवहेलना करणे क्रमप्राप्त.  कारण ते सभासदत्व राखण्यास गरजेचे असते. चौकटिचे सभासदत्व  ही सामाजात ताठ मानेने वावरण्यासाठी अत्यंत महत्वाची. चौकटीपेक्षा त्या चौकटीतल्या मानद सभासदांच्या दामभिकतेचा संताप येतो.
बदामराणी कुठल्यातरी चौकट राज्या बरोबर सौंसारत रममाण. कदाचित,चौकट राजाचा वीट आला असेल सुद्धा.  चौकटीत घुसमट होतेच. ती घुसमट सभासदत्वाची वर्गणी असते. ती भरावीच लागते. धरलं तर चावतय, सोडलं तर पळतय.चौकटीतली अत्यंत निर्लेप नाती, कॉस्मेटिक हसणे बोलणे,सुखी असल्याचे अवसान,सारे खूप उबग येणारे.
म्हंटल तर मी माझे चौकटीच्या बाहेरचे आयुष्य सुखात व्यतीत करतोय. चौकटीत शिरण्याची अजिबात इच्छा नाही. बरेच चौकट राजे भेटतात. मी चौकटीच्या बाहेर काय, कसे करतो,याची  उतकंठा असतेच त्या सर्वांना. चौकटी बाहेरचे आयुष्य,खरोखर आपल्या आपली वेगळीच ओळख करून देते. आपल्या प्र्रतिभेला विविध पैलू पाडून देते. चौकटीतल्या राहिवाशांकडुन पाठ  थोपटून घेण्याची किंवा त्यांच्या समर्थनाची अजिबात गरज भासत नाही.
चौकटीच्या कित्येक पलीकडची सर्वात भारी इस्पिक राणी मिळालीये. आणि मी आता स्वछंदसाम्राज्याचा राजा.

Dr. Deepak Ranade

No comments: