Thursday, April 25, 2019

शेवटचा प्याला

माझं शालेय शिक्षण कॉन्व्हेंट मध्ये झाले आणि त्यामुळे मी विचार सुद्धा इंग्लिश मध्ये करतो. पण भाषेची आवड असेल किंवा मराठी भाषेची प्रतिभा म्हणावी, माझे मराठी भाषेवर खूप प्रेम आहे.
परवा काशीनाथ सिनेमा बघितला. या सिनेमातल्या अनेक गोष्टी भावल्या. एक कठोर,कटू सतत बदलणारे वास्तव, पचवता न येणारे घवघवीत यश, व्यसनाधीन झालेल्या,अहंकाराने पोखरलेल्या मनाची होणारी दयनीय अवस्था, याची खूपच सुरेख अभिव्यक्ती. दारू पायी बऱ्याच लोकांची झालेली दुरावस्था अनाहूतपणे मनात डोकावून गेली. दारू हे एक अनाकलनीय रसायन आहे.  डॉक्टरी अभ्यासक्रमात वेगवेगळ्या औषधी तत्वांना प्रत्येक व्यक्तीचा वेगळा प्रतिसाद असतो,हे शिकलो होतो. दारूचे मेंटबॉलिसम वेगळ्या व्यसक्तींमध्ये वेगळे होते. काही मंडळी टँकर या टोपण नावाने ओळखले जातात, तर काहींची मजल एक किंवा दोन पेगच्या पर्यंतच असते. माझ्या उमेदीच्या कारकिर्दीत मी सुद्धा 'टँकर' होतो. दारूचा एका कर्मणुकीच्या साधना पासून व्यसना पर्यंतचा प्रवास अगदी नकळत,हलक्या पावलांनी कर्तृत्व,जवाबदारी,नाती, स्वाभिमान तुडवत होतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकदा व्यसनाधीन झाल्यावर चूक करतोय याची जाणीव असून देखील दारू व्यक्तीला नपुसक,हतबल बनवून टाकते. दारू चा नशा उतरल्यानंतर आपल्या व्यसनामुळे कुटुंबातल्या सर्वाना अपार त्रास होतो याची सल निश्चितपणे असते. वैद्यकीय संशोधाने आता सिद्ध केले आहे,की काही व्यक्तींना व्यसनाधीन होण्याचा समान्यांपेक्षा जास्त धोका असतो. आशा व्यक्तींनी सोशल ड्रिंकिंग,अथवा एक घोट देखील घेणे टाळले पाहिजे. दारू ही तब्येतीला अपायकारक असतेच पण त्यापेक्षा जास्त मानसिक दृष्ट्या कमकुवत करून टाकते . खूप जास्त भावुक होणे,एरवी पाळली जाणारी सामाजिक बंधने,मर्यादा,सैयम सर्वांचे नकळत  उल्लंघन करणे ही सर्वांना परिचित लक्षणे. सारासार विचार, सद्सद्विवेकाचा ऱ्हास तर होतोच. एका काल्पनिक, प्रतिसृष्टीची निर्मिती  केली जाते आणि त्यात डुंबत राहण्याची सवय लागते.
कालांतराने ही गरज मानसिक पातळीवर न थांबता, शरीराची गरज आणि आयुष्याचे अविभाज्य अंग होते
देवदास मधला प्रदिद्ध डायलॉग -

"कौन कंबखत केहता है हम बरदाश करनेके लिये पिते है?
मै तो सांस लेने के लीये पिता हूं."

अशी केविलवाणी परिस्थिती झालेली खूप उदाहरणे  आमच्या वैद्यजिय व्यवसायात देखील दुर्दैवाने  पाहिलीयेत. व्यवसाय,संसार,मुलं, प्रतिष्ठा,नाती,मैत्री सर्वांची आहुती देऊन नेस्तनभूत झालेली मंडळी आहेत.
मेंदूच्या पुढील भागाला फ्रॉनटल लोब्स म्हणतात.  या भागाची वैशिष्ट्यपूर्व जबाबदारी-  सैयम पाळणे, आवर घालणे,व स्वतःवर ताबा ठेवणे. पंचेंद्रियांचे लाड पुरवण्या पेक्षा त्यांच्यावर प्रभुत्व प्राप्त करणे,हे ह्या मेंदूच्या भागाचे काम असते.  दारू नेमकी या भागावर असर करते. जीभ जरा सैल होणे, आक्रमकता वाढणे आपण सर्वानीच अनुभवली असतील. पुढचा पेग नको म्हणणारा भागच अकाऱ्यांवित होतो. मग सर्व बंधने,लाज,आत्मसन्मान वेशीवर टांगून सौजन्याची ऐसीतैशी करून एका आत्मघातकी प्रवासावर प्रयाण.
ह्या कथानकात अपयश हा खलनायक नाहीये.
अपयशाचा पाया म्हणून वापर करून यशाचे साम्राज्य उभारणारी अनेक उदाहरणे ज्ञात आहेतच. या कालाकृतीतला खरा खलनायक दारू आहे.
या जंजालातून मुक्ती मिळून तब्बल 7 वर्ष झाली,पण हा सिनेमा बघितल्यावर या विकृतीला बळी पडलेल्या व्यक्तींसाठी जीव हळहळला. असो, एक अत्यंत दर्जेदार कलाकृती बघण्याचं समाधान निश्चित झालं.

दीपक रानडे
( हा माझा पहिलाच प्रयोग आहे. चुका असल्यास क्षमस्व)

No comments: