Friday, April 17, 2020

बटाटे वडा

बटाटे वडा
       बटाटे वडा . आपल्या मुलुखाचा अविभाज्य सौंस्कृतीक,culinary वारसा. कित्येक वेळा, बाहेर गावी ऑपरेशन करायला जाताना,वाटेत,पटकन एखाद वडापाव चेपला, की भुकेची ऐसीतैशी. तो गरम गरम,बाहेर कुरकुरीत,आत लुसलुशीत,खमंग,चविष्ट,स्वादिष्ट,थोडा चमचमीत,खुसखुशीत,चटकदार. विशेषणे कमी पडतात. रोहित,जोशी,अश्या अनेक ब्रँड्सनी ह्या snack चा प्रचंड प्रसार आणि व्यवसाय प्रस्थापित केलाय.प्रवास म्हणजे, हा खाद्य पदार्थ अनिवार्य. शिरवळ ला श्रीराम,खोपोलीचा दिवाडकर, पनवेल चा दत्त स्नॅक्स,इथे विसावा घेऊन वडा पाव न खाता जाणे म्हणजे प्रवास देवतेचा घोर अपमान. त्या शिवाय प्रवासाचे औचित्य साधल्या सारखे वाटतच नाही. कित्येक परप्रांतात स्थायिक झालेली मंडळी मुंबई नगरीत उतरत्या क्षणी, वडापाव डिचकण्यासाठी अधीर असतात. परदेश मुक्कामानंतर पश्चाताप करण्याचे कर्मकांडच जणू.वडा पाव रेमटण्याचे समाधान काही औरच. परदेशातल्या अळणी आयुष्याला तडका देणारा वडापाव. अनेक  पावसाळ्यातल्या ओल्या आठवणी ताज्या करणारा हा वडापाव. केवळ पोट भरणारे अन्न नसून,ते मनाचे,चित्ताचे,वृत्तीचे पोट भरणारे व्यंजन. सद्य परिस्थितीत, हे सगळे जिभेचे चोचले बाहेर करायची पाबंदी. कुठेतरी,जिभेला चुकल्यासारखे वाटत होते खरे. वडा पाव जिभेच्या सौंस्कराचा भाग बनला होता.
मेधाने बेत आखलाच शेवटी.
बटाटे उकडून झाले होते. ते सोलून,सारण तयार करता करता तिने त्याची चव बघायला बोलाविले.
ते सारण जिभेवर पडताच,अंगातू एक शिरशिरी सळसळली. आहाहा आहाहा. चव,आणि आपली समरणशक्तीशी यांचा इतका घनिष्ठ संबंध असतो,हे जाणवले. ती chemical reaction क्षणात आठवणींच्या भंडाराचे दार उघडते.
मग तिने ते डाळीचे पीठ कालवायला घेतले. पाण्याची मात्रा क्रमा क्रमाने वाढवत, ते हळूहळू एकजीव होत होते. हाताला भांड्याच्या कडेवर घासून,भांड्यात ओघळणारे ते पिवळे धमक कालवण. आता कधी माझा जीव भांड्यात पडणार? तोंडात त्या वाड्याच्या वेधाची कारंजे उडत होती. जीवाची तळमळ होत होती.
एकीकडे,त्या सारणाच्या गोल चकत्या,त्या पिठात सूर मारायला अधीर होत्या.
      वेळ जाता जात नव्हता.तिच्या प्रत्येक कृतीला असाधारण वेळ लागत होता. कढईत तेल घालून तास भर झाला असल्याचा भास. अजिबात तापत नव्हते ते मेलं तेल. पोटात वणवा लागायला एक क्षण काफी.
हे तेल काही ऐकेना. संथ वाहते कृष्णा माई. काय छळ चालू होता.
अखेरीस, पिठात डबडबलेला हात त्या कढईत झटकला आणि ते शिंतोडे तेलात पडताच चुरररररर असा ब्रह्मनाद कानात दुमदुमला. पुढच्या क्षणी,एका पाठोपाठ 5 चकत्या त्या पिठात नाहून कढईत उतरल्या. त्या तापलेल्या तेलाला क्रुद्ध करतात आणि त्या क्रुद्ध तेलात डुंबायला लागतात. झाऱ्याने त्यांना बुडवून त्यांच्या श्वासाच्या बुडबुड्यांची मालिका त्या तेलाला ढवळून काढतात. अलगदपणे ते पालथे करून,झर्यात उचलून वर काढल्यावर त्यांच्या श्वेतवर्णाला तांबूस छटा बहाल झालेली असते. श्वेतवर्णाचे कृष्णवर्णीय रूपांतर-एक delicious सोहळा.  मग झाऱ्याने त्यांच्यावर उकळते तेल शिंपडणे, ही महत्वाची कृती. आता धीर निघत नव्हता. पटकन डिश घेऊन उतावीळ पणे गडी उभा.
  त्या गरम गरम वड्याचा घास म्हणजे साक्षात निर्विकल्प समाधी अवस्था. निर्विकल्प आणि सविकल्प समाधीतला फरक आज समजला. बटाटे वड्याला विकल्प नाही. निर्विकल्प.

No comments: