आयुष्याची रुबिक क्युब
1980 साली रुबिक क्युब नावाचा एक विलक्षण आविष्कार एक हंगेरियन शिल्पकार आणि वास्तुविशारद असलेल्या Erno Rubik याने डिझाइन केला. या क्यूबनी जगात खळबळ उडवून दिली. सर्वात जास्त खपणारा खेळ म्हणून प्रसिद्ध झाली ही क्युब. ही क्युब म्हणजे खूपच युनिक होती. 6 बाजू असलेल्या ह्या क्युबच्या प्रत्येक बाजू मध्ये 9 वेगवेगळ्या रंगाचे चौकोन होते. ती क्युब म्हणजे एक प्रकारचे कोडे होते. त्या क्युबची वरची,खालची आणि दोन्ही बाजूच्या रांगा फिरवणे शक्य होते. त्या फिरवल्यावर सर्व 6 रंगांचे छोटे चौकोन विखरून जात. कोडे सोडवण्यासाठी सर्व एकच रंगाचे 9 चौकोन एकत्र आणून 6 बाजूचे 6 रंग पूर्ण करायचे.
सर्व तरुण,वयस्कर,गृहिणी,विद्यार्थी ह्या क्युबच्या मागे वेडे झाले होते. अगणित combinations होऊ शकत होती त्या क्युबची.
मी कॉलेज मध्ये होतो आणि कर्म धर्म संयोगाने,मी ती क्युब 8 ते 10 मिनिटात पूर्ण करत होतो. वर्गातले सगळे खूपच आश्चर्यचकित होत असे. ती क्युब पूर्ण करण्याचे एक टेकनीक होते. एकेक रांग स्टेप बाय स्टेप पूर्ण करत हळू हळू ती क्युब पूर्ण करावी लागे. पुढे पुढे ,त्या क्यूबला पूर्ण करताना त्रेधातिरपीट उडायची. एक बाजू पूर्ण केली की इतर बाजू विस्कटून जायच्या. अखेर मार्ग सापडायचा पण खूप प्रयत्न करावे लागले.
वय होत गेले,तशी ती क्युब विसरून गेलो. पर्वा,एका मित्राच्या घरी गेलो होतो आणि त्याच्या 12 वर्षाच्या पुतण्याच्या हातात ती क्युब दिसली.
का कोणास ठाऊक,पण ती क्युब त्याच्या कडून मागितली आणि 10 मिनिटात पूर्ण करून दाखवतो,आशा फुशारक्या मारत कामाला लागलो. पाऊण तास गेला,पण ती क्युब पुर्ण तर सोडा,एक बाजू देखील पूर्ण करू शकलो नाही. नाद सोडून दिला आणि अहंकाराचे झालेले तुकडे एकत्र करीत ती क्युब परत केली.
आणि मग एक विचार सहजच मनात आला.
आयुष्याची देखील रुबिक क्युब असते. 6 रंग म्हणजे आयुष्यातील 6 पैलू. तब्येत,पैसा, प्रसिद्धी,कुटुंब,व्यवसाय आणि अध्यात्म. ह्या 6 पैलूंचे चौकोन एकमेकात मिसळून, ती क्युब पुर्ण विस्कळीत होती. कुटुंबाची बाजू पूर्ण करायला गेलं,की इतर बाजू अपुऱ्या. मग एक रांग तरी पूर्ण करायचा प्रयत्न. ती रांग पूर्ण होताच बरोबर मागे असलेली अध्यात्माच्या बाजूची रांग बिघडली. अवघड होतं. एक रांग देखील एकाच रंगाची पूर्ण करू शकलो नाही.
इतरत्र नजर फिरवली,तर काही मंडळींची एखाद बाजू पूर्ण दिसायची. काहींची कुठली बाजू पूर्ण असली,तरी कुठलीच बाजू इतर बाजूंपेक्षा श्रेष्ठ नसते. आयुष्याची क्युब दुसरीकडून पहिली,तर बाकीच्या बाजूंची बोंबच दिसायची. सगळ्यांची सगळ्या बाजू पूर्ण करायची धडपड. पण कुठली तरी बाजू अपूर्णच. मग जाणवले,की वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या बाजू काही काळा करता पूर्ण दिसत. काही काळ गेल्यावर दुसरी बाजू,पूर्ण करण्याच्या नादात पूर्ण झालेली बाजू पुन्हा विस्कळित. एकाच वेळी सगळ्या बाजू पूर्ण होणे नाहीच.
मग विचार आला, सगळ्या बाजू काही औंशी पूर्ण करायचा प्रयत्न करत राहणे,एवढेच आपल्या हातात. बऱ्यापैकी पूर्ण असलेली बाजू तेवढ्यापुरतं चांगली दिसते. पण दुसऱ्या बाजू बघण्याचा प्रयत्न केला,की त्यांची अपूर्णता जाणवायची.
कुटुंबाच्या बाजूत थोडे पैशाचे चौकोन घुसून ती बाजू विस्कळित. तब्येतीच्या बाजूत प्रसिद्धीचे चौकोन घुसून ती बाजू बिघडवायची.सगळीच गुंतागुंत. कुठलीच बाजू धड किंवा पूर्ण नाहीच.कोणाचीच क्युब पूर्ण नसतेच. त्यातल्या त्यात पूर्ण असलेली बाजू प्रथमदर्शनी ठेवून, सगळी क्युब पूर्ण असल्याचा फोल देखावा करणे. खेळातली क्युब सोडवली होती खरी. पण आयुष्याच्या क्युबची एखाद बाजू तरी पूर्ण होईल का, ही शंका मनात घुटमळत होती. मग दुरून ती क्युब पहिली,आणि त्या अपूर्ण पण रंगीबेरंगी क्युब सुद्धा देखणी वाटू लागली. कदाचित,कुठलीच बाजू पूर्ण करण्याचे वांझोटे प्रयत्न सोडून द्यावे. आपल्या आयुष्याची क्युब आहे तशीच अपूर्ण पण वैविध्यपूर्ण आहे. एखादी रांग जमेल तशी पूर्ण करावी. नाही जमल्यास, विस्कटलेल्या रांगेतील वैविध्यतेचा स्वाद घ्यावा. पूर्ण असलेली क्यूबच श्रेष्ठ, हा अतिरेकी हट्ट सोडून दिला,तरच विविधरंगी क्यूबचे सौंदर्य जाणवेल. आयुष्यतला कुठलाच पैलू परफेक्ट नसतो. Happiness lies more in savoring the delectable imperfections rather than seeking it in an obsessive quest for perfection. ती अर्धवट रंगीबेरंगी क्युब त्या मुलाला परत देताना पराभव पत्करलयाची रुखरुख होती,पण जाणिवेची क्युब पूर्ण झाल्याचा आनंद सुद्धा होता.
Dr. Deepak Ranade.