असाध्याची साधना.
तो लहानपणा पासूनच चपळ आणि धडपड्या होता.सतत अस्वस्थ,आणि बेचैन.खोल कुठेतरी एक ऊर्जेचा वणवा पेटल्या सारखे.अस्वस्थतेचे कारण त्याला किंवा इतरांना सुद्धा उमजेना. ऊर्जा अनेक प्रकारच्या अस्तात. त्याची ऊर्जा जरा वेगळ्याच प्रकारची होती. त्या उर्जेमध्ये एक वेगळीच ताकद होती. ती ताकद,ती ऊर्जा त्याला स्वस्थ बसून देत नव्हती. त्याच्या पळण्यामध्ये एक वेगळाच डौल होता. पळणे,हे जात्याच त्याच्या नसानसात भरलेले होते. त्याची ती विलक्षण ऊर्जा,बेचैनी आणि अस्वस्थता समूहातल्या इतरांना जाचायची. समूहातील इतर समवयीन, काळाच्या ओघाने पळू लागलीं. त्यांचे पळणे,हे साचेबद्ध,कोष्टकात, शिकवणीतले,आणि प्रशिक्षित असे. कळपात सर्वांचे पळणे त्याच प्रकाराचे, आणि ह्याचे पळणे वेगळे. त्याची वेगळे पळण्याची शैली कळपातील इतरांना झेपायची नाही. त्यांच्या नजरेत एक प्रशचिन्ह असे-
तू सर्वांसारखा का पळत नाहीस? त्याला स्वतःला सुद्धा आपला वेगळेपणा जाणवत होता. सुरवातीला त्या वेगळेपणाचे कुतूहल वाटायचे इतरांना. पण ते वेगळेपण जेव्हा चौकटीत बसेना, तेव्हा ते वेगळेपण थोडे बोचरे वाटू लागले. त्याला स्वतःला आपल्या वेगळेपणाची जाणीव होत नव्हती. पण कळपातील इतर त्या वेगळेपणाची अवहेलना करू लागल्यावर त्याच्या मनात,हळू हळू न्यूनगंडाचे बी रुजले.
चार चौघांपेक्षा वेगळे असणे,म्हणजे एक विकृतीच अशी भावना कळपात प्रचलित होती. आपले वेगळेपण, हा एक शाप असल्याची भावना हळू हळू मनात घर करू लागली आणि त्या न्यूनगंडाच्या बिजाचे रोपटे दिवसेंदिवस वाढू लागले. कालांतराने,त्याची दौड आता सर्वांपेक्षा खूपच वेगळी झाली होती.
काही तर खूपच सरस दौडत होते.शर्यतीत दौडण्याची कला काही वेगळीच होती. त्याने आपल्या अनोख्या शैलीत स्पर्धेत दौडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण शर्यत जिंकण्यासाठी लागणारी कौशल्ये,ही वेगळी होती. स्पर्धेत उतरण्यासाठी,चार चौघांशी बरोबरी करून, त्यांच्यातील उणिवा अभ्यासणे,स्पर्धेचे नियम,अटी, पाळणे क्रम प्राप्त होते. स्पर्धा म्हंटली,की त्याच्या पळण्याची मजाच निघून जाई. सगळे रेसचे घोडे. एकाहुन एक आपल्या परीने खानदानी, नामांकीत तालमीत नियोजनबद्ध प्रशिक्षण घेऊन, स्पर्धेत उतरण्यास सज्ज. त्याला तसा खानदानी काहीच वारसा नव्हता. पळण्याच्या विश्वात बेवारस. आपल्याला जमेल,तसे आणि कुठल्याही शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब न करता शर्यतीत उतरायचे म्हणजे एक मूर्खपणाच होता. पण रेस चा घोडा म्हंटला,की स्पर्धेत पळणे अनिवार्य. स्पर्धा हेच आयुष्य. त्याला इतर घोड्यांची नावे देखील माहीत नव्हती. तसे पाहता, त्यांना नावाचा काहीच उपयोग नव्हता. त्या वर्तुळात, फक्त नंबर महत्वाचा. शर्यतीत, कितवा आलास, किंवा शर्यत चालू असताना कोणत्या क्रमांकावर पळतोय,हीच त्या घोड्याची ओळख. रेस संपायची,पण स्पर्धा अखंड चालूच. एखाद्या रेस मध्ये ह्या घोड्याला पहिला नंबर,तर दुसऱ्या रेस मध्ये दुसरा घोडा पहिला. पळणे,हे केवळ रेस जिंकण्यासाठी,आणि रेस जिंकणे, हेच आयुष्याचे उद्दिष्ट. हे रेसचे घोडे नुसते उभे राहिले असले तरी मनात,शर्यत चालूच. कधी दौड पायांची,तर कधी दौड मनाची. दौड चालूच. रेस जिंकण्याच्या ध्यासाने, पळण्याचा आनंद कुठेतरी हरपला होता. त्याला हे पळणे आणि रेस जिंकणे,हे फारच निरर्थक वाटू लागले होते.
काही घोड्यांनी,रेस जिंकण्याच्या पाठी न लागता, आपले शांतपणे टांग्याची बग्गी ओढणे पसंत केले. अशाच एका घोड्याशी ओळख झाली आणि गप्पा मारायची संधी मिळाली.
त्या घोड्याला त्याने विचारले-" तू स्पर्धेतून बाहेर का पडलास? "
तो घोडा म्हणाला- मला स्पर्धा नको वाटते. 8 तास कष्ट केले,की मालक पोटभर जेवायला देतो,आणि मग तबेल्यात शांतपणे उभे राहून,निवांत आयुष्य जगायचं. कोणाशी स्पर्धा नाही,की कुठलेच टेन्शन नाही. मस्त चाललंय आयुष्य."
त्याला हा युक्तिवाद पटेना. घोडा असून, पळायचे नाही,आणि केवळ टांगा ओढून आयुष्य काढायचे. छे छे. हे नाही जमणार. पळायला तर पाहिजेच. पण स्पर्धा नको झाली होती त्याला. का कोणास ठाऊक, पण स्पर्धेत जिंकलो तरी स्पर्धा पळण्याचा आनंद स्पर्धेमुळे हरवला होता. त्याला काहीच सुचत नव्हते.
पाळण्याचे दोनच प्रकार असू शकतात का? टांगा किंवा रेस ?
काही केल्यास त्याला या प्रश्नाचे उत्तर उमजत नव्हते.
एक दिवस, रेस दुसऱ्या गावी असल्यामुळे त्याला वाहनाने दुसऱ्या गावी नेण्यात येत होते. दोन तासाचा प्रवास होता. वाटेत छोटासा घाट लागला आणि तो चढून झाल्यावर, एक मोठे हिरवे गार पठार लागले. एकदम त्याची नजर दूरवर एका उमद्या घोड्यावर गेली. चॉकलेटी आणि पांढरा रंग होता त्याचा. तो सुसाट पळत होता. त्याच्या मानेवरचे पांढरे शुभ्र आयाळ वाऱ्या मध्ये प्रत्येक झेपे बरोबर लाटांसारखे डोलत होते.
त्याच्या धावण्यात एक धुंद बेफिकिरी होती. त्याचा डौल काही आगळाच होता. एकटाच त्या हिरव्या गार पठारावर मनमोकळा स्वैराचार करीत होता. त्याच्या प्रत्येक झेपेमध्ये एक लय होती. पळण्याच्या कृतीत एक कला होती. त्याचा सुडौल बांधा, भक्कम मजबूत पायाचे स्नायू त्या चकाकणार्या त्वचे खाली सळसळत होते. त्याच्या पाळण्यात एक विलक्षण सहजता आणि काव्य होते. त्याला कुठल्याही प्रकारची घाई नव्हती,की कुठलेही उद्दिष्ट गाठण्याचे वेड नव्हते.
त्याच्या पाळण्यात कुठलीच धडपड, आटापिटा,आकांत,नव्हता. त्याचे पळणे एक प्रकारचा चिदविलास होता. त्या पाळण्यात एक रांगडेपण होते, एक नजाकत सुद्धा होती,पण उन्मत्तपणाचा किंवा माजाचा लवलेश नव्हता. तो स्वतःच्या आनंदासाठी पळत होता कारण पळणे हा स्वधर्म होता. कुठल्याच प्रकारची कृत्रिमता नव्हती. त्या क्षणी, त्याला रेस,आणि टांगा, ह्या दोनच परिचित असलेल्या पळण्याच्या प्रकारांपेक्षा कित्येक उंचीचा तिसरा प्रकार बघायला मिळाला. स्वतःसाठी पळणे. शर्यत केलीच तर स्वतःची स्वतःशीच.
त्या घोड्याचे पळणे बघून तो मंत्रमुग्ध झाला होता. आणि मग त्याने एक महत्वाचा निर्णय घेतला.
आता तो जरी रेस मध्ये पळाला,तरी,तो स्वतःच्या आनंदासाठी पळणार होता. पळण्याचा पूर्ण मजा लुटणार . त्याला त्याचा स्वरूपाची जाणीव झाली होती. आता पळणे,ही केवळ कृती नसून,एक साधना आहे.
काहीच न साध्य करण्याची साधना.
Dr. Deepak Ranade.
No comments:
Post a Comment