डब्बे आणि सौंसार
"अगं, तुला पर्वा सुरळीच्या वड्या दिल्या होत्या ना,तो डब्बा जरा प्लीज दीपक बरोबर परत पाठव"
लहानपणी, मी शेंडेफळ असल्यामुळे असली किरकोळ कामे माझ्याच पदरी पडायची. मग सायकल वर टांग मारून त्या कुसुम सोसायटी मधल्या मावशिंकडे वाटचाल करायची.
तो प्लास्टिकचा 5 ईंची डब्बा आणायला माझा वापर केला गेला,याचे दुःख आणी त्याहून अधिक कमालीचे आश्चयर्य आणि थोडा संताप.
एवढे काय सोने लागले होते त्या डब्ब्याला? प्लास्टिकचा दीड दमडीचा तो डब्बा. आईसक्रीम चा कधीतरी आणलेला फॅमिली पॅक चा तो डब्बा. आईने तो धुवून पुसून तिच्या नेटक्या सौंसरात त्याला योग्य जागा नियोजित करून दिली होती. तसे आमचे कुटुंब खाऊन पिऊन सुखी,इतकेच. आईने टूकीने सौंसार केला होता. राहण्या खाण्याच्या गोष्टींमध्ये कुठलीही काटकसर नव्हती. मग ह्या प्लास्टिकच्या डब्ब्यात काय एवढा जीव अडकलेला होता तिचा?
स्वयंपाकघर म्हणजे आईचे साम्राज्य होते.
'Everything in its place, and a place for everything.'
अगदी क्वचित कळी आई बाहेर असली आणि बहिणीला काही नवीन रेसिपी करायला किचन मध्ये काहीतरी हवे असले,तर ती आईला मैत्रिणीकडे फोन करायची आणि मग आई तिला
"फ्रिजच्या बाजूचे कपाट उघड. डाव्या बाजूला,वरच्या कप्प्यात,कोपऱ्यातून तिसरी,हिंगाची छोटी डबी असेल. त्या डब्बीवर एक छोटी प्लास्टिकची डब्बी आहे. त्या डबीत खसखस आहे.
इतक्या छोट्या डब्ब्यांची तिला अचूक पॉझिशन, माहीत असायची.
हळदी कुंकू, भोंडला,डोहाळे जेवण,आशा बायकी
गेट टुगेदर सोहळ्यामध्ये बरेचदा छोट्या स्टीलच्या डब्या भेट म्हणून दिल्या जायच्या. मला ह्या छोट्या डब्यांविषयी खूप कुतूहल असायचे. पण, आईच्या सौंसरात त्या डब्यांचे जरा अधिकच महत्व आहे,याचे कारण उमजेना.
कधी कधी, शेजारच्या मावशी आईला छोट्या डब्यात कालवण द्यायच्या. त्या CKP होत्या,आणि बिरड्याचे कालवण म्हणजे आहाहा. त्या वयात ते आम्हाला पुरतच नसे. तरी, त्याचा स्वाद,आणि लज्जत काही औरच. मग,तो डबा धुवून,आमच्याकडे नारळ घालून पडवळाची भाजी,असेच काही खास बनवले,की त्या डब्याच्या माध्यमातुन cultural exchange व्हायचा.
डबा कधीच रिकामा नाही परत करायचा. हे डब्याच्या राजकारणातला अत्यन्त म्हत्वाचा नियम.
कधीकधी,आईने बाजूच्या जोशी काकूंकडे असाच एखादा खाद्य पदार्थ पाठवलेला असायचा. मावशिंकडून डबा परत करायला थोडा उशीर झाला,तर आईचा जीव वरखाली व्हायचा. मग एखाद दोन दिवस वाट बघून,दुपारी आईचा मावशिंकडे फेरफटका असे.
"अहो जोशी वहिनी,पर्वा सांडगे पाठवले होते तो जरा डब्बा द्याल का? अहो जाऊबाईना थोडे लोणचे पाठवावे असे म्हणते."
कसले लोणचे,आणि कशाला आई काकुला लोणचे देणार? पण तो डबा परत मिळाला नाही तर?
डबा. खरच किती छोटी गोष्ट.
आता, काही करणासत्व स्वतः किचन मॅनेज करतो. पर्वा, एक पॉटलक पार्टी ला गेलो होतो. मी, आमचा अंजना बाईने बनवलेली भाजी एका छोट्या डब्यात घेऊन गेलो होतो.
खूप धमाल अली पार्टीला.
निघताना,मी मैत्रिणीला म्हणालो-
"अंग जरा तो प्लास्टिकचा डबा विसळून देशील का? "काही भरू नकोस त्यात पण डबा प्लीज दे."
तिने जरा कुत्सित स्वरात विचारले
"एवढे काय मोलाचे लागले रे त्या डब्याला?
तेव्हा मला एकदम जाणवले.
काही गोष्टींचे मोल त्यांच्या किमतीवर अवलंबून नसते. त्यांची किंमत त्यांच्या उपयुक्तते नुसार ठरते. तो प्लास्टिकचा डबा होता अगदी दीड दमडीचाच. पण वेळेला,पटकन काहीतरी पॅक करून न्यायला लागते,तेव्हा त्या डब्याचे मोल जाणवते. सौंसरात पडल्यावर बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात.
त्यातला महत्वाचा एक चॅपटर म्हणजे डब्याचे महत्व.
मैत्रिणीने रीती प्रमाणे डब्यात शंकरपाळे दिले होते. ते तोंडात टाकत त्या डब्याला भरभरून आशीर्वाद देत, घराची वाट धरली.
Dr Deepak Ranade
No comments:
Post a Comment