Sunday, November 7, 2021

एकांत

 एकांत. 


नुकताच हिमालयात एक अवघड पण डोळ्याचे पारणे फिटणारा ट्रेक केला.

या ट्रेकचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, स्वतःला स्वतःचा  तंबू उभारावा लागायचा. हिमालयाच्या रौद्र पण अविसमरणीय रांगड्या सौंदर्यात,निसर्गाच्या कुशीत, अगदी थेट डोंगरावर तंबू ठोकून, दमलेले शरीर आणि डोंगराच्या मध्ये फक्त एक ग्राऊंडशीट. स्लीपिंग बॅग मध्ये शिरून मग एकटेच तंबूमध्ये विसावायचे. 

असेच एका रात्री एकाएकी पहाटे 3 ला जाग आली. लघुशंका उरकण्यासाठी तंबूतून बाहेर पडलो. ती रात्र मंत्रमुग्ध करणारी होती. चांदण्यात समोरची हिमशिखरे मंद प्रकाशात चकाकत होती. डोक्यावर अथांग अखंड आकाश आणि त्यामधील अगणित तारका. हलक्या मंद वाऱ्याची झुळूक चेहेऱ्याला कुरवाळत होती.

एकांत. स्वतःच्या श्वासोश्वासाचा आवाज ऐकू येत होता. टेंटच्या फ्लॅपच्या मधूनच फडफडण्याचा निनाद. 

या अथांग निसर्गात तो तंबू म्हणजे,सागरात एक छोटासा बुडबुडा असल्याजोगे. त्या एकांतात नात्यांचे,रुणानुबंधांचे भावनिक पापुद्रे गळून पडले होते. माझ्या नग्न अस्तित्वाची जाणीव होत होती. कोहम कोहम हा प्रश्न सतत डोके वर काढत होता. 

मी स्वतःला नेहेमीच नातेसंबंधाच्या चष्म्यातून बघत होतो. माझ्या आयुष्याचा अर्थ इतरांच्यावर अवलंबून असतो का? माझे विचार माझ्या आईच्या दिशेने वळले. तिने गेली 10 वर्षे माझ्या दिवंगत वडिलांसाठी झुरत आयुष्य ढकलले आहे.  ते गेल्यावर देखील ती ते नाते एक भावनिक कुबडी म्हणून वापरत होती. तिला कितीही समजावून सांगितले,तरी तिला बदललेले वास्तव कबुलच करायचे नव्हते. नाती,ही आयुष्यात किती महत्वाची असतात? वैयक्तिक माझ्या आयुष्यात नुकतेच नात्यांची उलथापालथ झाली होती. Do relationships define me? माझे आयुष्य नात्यांचे मिंध्ये आहे का?

 तंबू उभारताना 5 ते 6 लोखंडी पेग्स जमिनीत खोचून,मग त्या तंबूच्या कडांमधून 2 वाकणार्या फोल्डिंग रॉड्सची फ्रेम वापरवी लागायची. तेव्हा तो तंबू उभा रहायचा.  आपल्या अस्तित्वाला देखील असेच नात्यांचे टेकू देऊन आणि रुणानुबंधाची फ्रेम लावून उभे राहतो का आपण ? 

मन,बुद्धी,अहंकार,नाती,ऋणानुबंध,हे आयुष्यातील अविभाज्य घटक असतात. हे अस्तित्वाच्या तंबूचे पेग्स खोचून,मग स्वत्वाचा  तंबू ठोकायचा. एखादा पेग उचकटला,तर अस्तित्व धोक्यात आल्याचे भय. 

तंबूत असे पर्यंत सुरक्षित वाटते. तंबूच्या बाहेर पडल्यावरच भोवतालच्या अथांग अवकाशाची जाणीव होते. कोहम,या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळणार नाही, पण जेव्हा या स्वनिर्मित तम्बूचे सर्व पेग्स उखडून टाकता येतील, तेव्हा कोहम हा प्रश्न विचारणारा देखील नसणारे. बुडबुडा सागरात काहीच काळ आपल्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारू शकतो. त्याचे सागरात वेगळे अस्तित्व किती काळ राहणार? कधीतरी नकळत,तो सागरात विलीन होणारच. आत्मचिंतन करता करता गारठलो आणि त्या आनंतातून पुन्हा माझ्या सुरक्षित संकुचित तंबूत शिरलो. 

त्या विशाल पर्वताच्या कुशीत विचार करता करता कधी डोळा लागला कळलेच नाही. 

सकाळी टेंटचे पेग्स काढताना चेहऱ्यावर एक विलक्षण भाव होता, हे मात्र नक्की.


Dr Deepak Ranade.

No comments: