जास्वंदीचे रोपटे
माझ्या बाल्कनीला बाहेरून एक कप्पा आहे. ह्या जागी मागच्या वर्षी शिफ्ट झालो,तेव्हा तो कप्पा आवर्जून साफ करून घेतला. तिथे माझ्या आवडीची काही फुलझाडे,आणि तुळस इत्यादी ठेवायचे ठरविले. दोन वेगवेगळ्या रंगाची जास्वंदाची, एक तुळस,एक गुलाब,आणि एक रानजाईची रोपटी कुंड्यांमध्ये लावून त्या कप्प्यावर मांडून ठेवली. रोज सकाळी,बाल्कनीत चहा पिण्याचा आवडता प्रोग्रॅम. समोरच एक छोटेसे जंगल आहे. तिथे,बाभूळीचे वृक्ष आणि इतर झाडे अगदी हाकेच्या अंतरावर. ह्या बोभुळीच्या झाडावर सकाळी अनेक पक्षांचा चिचिवाट. आणि जवळ जवळ रोजच,भारद्वाजाचे दर्शन. ही बाल्कनी म्हणजे ह्या घराचा आणि कालांतराने माझा सुद्धा आत्मा. बाल्कनीत बसून तासन्तास वेळ कसा जायचा,कळतच नसे.
ती जास्वंदाची दोन्ही रोपटी माझी लाडकी. एकाला विकत घेताना तांबडी चुटुक फुले होती,आणि दुसऱ्याला गुलाबी रंगाच्या फुलांचे वरदान. अगदी मनोभावे त्या सर्व रोपट्यांना नित्यनियमाने सकाळी पाणी देण्याचे काम. मगच गरम चहाच्या घोटाचा मजा. काही महिन्यांत त्या रोपट्यांशी एक भावनिक नाते निर्माण झाले. नवी कळी अली,की खूप आनंद वाटे. ते रोपटे मला जणू माझ्या पाणी घालण्याचे, प्रेमाने पानांवरून हात फिरवण्याचा मोबदला देऊ पहात होते. ते उमललेले टवटवीत फूल काय लोभसवाणे आणि सुंदर दिसे. त्या प्रत्येक पाकळीची रचना,तो रंग,सारे त्या परतत्वाची अभिव्यक्तीच जणू. आयुष्य नव्याने सुरू केले होते,आणि मनात एक नवी उर्मी जागी करण्याचे सतकृत्य ते रोपटे अगदी सहजपणे नकळत करीत होते. असेच काही महिने कधी उलटले,कळलेच नाही. आयुष्य पुन्हा रुळावर येत होते. पवना काठी स्वतःच्या घराचे काम देखील जोरात चालू होते.
आणि एके दिवशी, त्या लाल चुटुक फुले असलेल्या जास्वंदच्या रोपट्याची पाने झडू लागली. जवळून निरीक्षण केले,तर धक्काच बसला. त्या पानांच्या आणि देठाच्या बऱ्याच भागावर अळ्यांचा मुक्त संचार चालू होता.
खूप दुःखी झालो ते बघून. माझे लाडके रोप. आपल्या जवळचा कोणी नातेवाईक आजारी पडलतासारखे वाटत होते. ती सारी पाने त्या अळ्यांमुळे विकृत आणि वेडी वाकडी झाली होती. मी अत्यन्त दुःखी मनाने कात्री घेऊन आलो आणि ती सर्व पाने देठापासून कापून टाकली. अगदी खालची 3 ते 4 पाने सोडून शेवटी फक्त 2 फूट उंच रोपट्याची काडी शिल्लक राहिली होता. ती कापलेली पाने, केविलवाणी कुंडीत पडली होती.
नुकतेच आयुष्यात घडलेले काही प्रसंग आठवले. नात्यांचे सुद्धा असेच असावे. अपेक्षांची, स्वार्थाची, अहंकाराची कीड लागली की मग स्वाभिमानाच्या कात्रीने ती नाती कापून टाकावी लागतात. मग आयुष्य त्या पाने नसलेल्या काडी सारखे निष्पर्ण होते. पण अशा वेळी डोके शांत ठेवून त्याच निष्पर्ण रोपट्याला रोज पाणी घालत राहिलो. आयुष्याच्या रोपट्यावर नात्यांची पाने असावी,आणि काही अगदीच अर्थपूर्ण नाती फुलांसारखी उमलावीत,अशी काहीशी कल्पना मनात असे.आयुष्याच्या निष्पर्ण काडीला प्रेम,सहृदयता चे पाणी,निरपेक्षतेचे कीटकनाशक फवारत होतो. स्वाभिमानाचे खत,घालणे सुद्धा खूप उपयोगी ठरते. आणि मग, एके दिवशी त्या निष्पर्ण काडीला पोपटी रंगाची नाजूक, इवलीशी पालवी फुटले.
खूप आनंद झाला ते पाहून. आणि मग अक्षरशः पुढच्या काही दिवसात ती पालवी प्रत्येक कापलेल्या डेखा पाशी उगवली.
आज, पाणी घालताना त्याच काडीवर मोजून 13 कळ्या उमलल्या होत्या.
ती काडी चैतन्याने लडली होती.ह्या प्राणशक्तीची काय कमाल असते. प्राणशक्ती,चैतन्य,काही म्हणा,पण ती नवी पालवी म्हणजे एक साक्षात्कारच. चराचरात ओसंडून भरलेले असतेच ते चैतन्य,ते परतत्व, ते परब्रह्म.
त्या काडीला त्या कापलेल्या पानांची आठवण येत असेल का? कदाचित,जिथे ते पान कापले होते,त्याच वणातुन नवे पान उगवले होते. मनात नवी पालवी उमलायला, प्रथम मन निष्पर्ण करणे गरजेचे. निष्पर्ण मन. त्या निष्पर्ण मनात अनंत पाने उमलवण्याची क्षमता असते.
The Last Leaf, ह्या O Henry ची गोष्ट आठवली. निसर्ग,आणि आयुष्य यात किती साम्य असते आणि दोन्ही खूप काही शिकवून जातात.
Dr Deepak Ranade.
No comments:
Post a Comment