Sunday, November 7, 2021

आयुष्याचे गणित

 आयुष्याचे गणित.


सकाळचे 9.30 वाजले होते. नानांची पूजेची वेळ. त्यांची लगबग चालू होती. जानवे पाठीवर चोळत ते फुले  ताम्हनात घ्यायला ओट्यापाशी पोचले. 52 वर्ष संसार केलेली त्यांची पत्नी त्यांना बघत होती. त्या माउलीला श्वास घेणे जड जात होते. अर्धांगवायू झाला होता तिला,आणि ती अंथरुणाला खिळूनच होती. फुफुसांचा विकार असल्यामुळे,तिला सतत ऑक्सिजन मास्क मधून घ्यावा लागायचा. तिला सकाळपासूनच  श्वास घ्यायला त्रास होत होता. छातीचा भाता, जमेल तेवढे जोर लावून ती माऊली दमली होती.  येणारे मरण आता पुढच्याच वळणावर थांबले आहे,याची जाणीव होती. 

  गेल्या 2 वर्ष,अंथरुण धरल्या पासून नानांनी तिची सर्व शुश्रूषा अगदी अचूक केली होती. रोज रात्री,वेळी अवेळी उठून,डायपर बदलणे, पाणी आणून देणे, ही नित्याची ड्युटी ते चोख बजावायचे. नाना हे अत्यन्त कर्तृत्ववान. घरच्यांशी भांडण झाल्यावर, बायको आणि 2 मुली सोबत घेऊन त्यांनी 2 छोट्या खोल्यांमध्ये संसार थाटला. अपार कष्ट,कामात अतिरेकी प्रामाणिक,एकही दिवस सुट्टी न घेणारे आदर्श अकाउंटंट. त्यांनी अथक 33 वर्ष चाकरी केली,आणि रिटायर झाल्यावर त्यांच्या मालकांनी रीतसर सर्व ग्रॅचूईटी, फंड सर्व देऊन पुन्हा दुसऱ्या दिवसापासून ऑनररी नेमणूक केली. त्यांच्या प्रमाणिकतेची किंमत अनमोल होती. नानांना एकदा जवाबदारी दिली की विषय संपलाच. त्यांच्या आयुष्यात त्यांनी खचितच कधी  चूक,अथवा हलगर्जीपणा केला नसेल. आपल्या प्रमाणिकतेचा,कर्तबगारीची,आणि सरळ पडणाऱ्या पाउलचा त्यांना प्रचंड अभिमान. अभिमान,की अहंकार? कोणास ठाऊक. पण सगळी नातेवाईक मंडळी त्यांचा खूप आदर करत.  2 पोळ्या आणि भाजीचा डबा, तीच स्कुटर,तोच रस्ता,तीच बॅग,आणि तीच ठरलेली वेळ. 33 वर्ष. आयुष्याचे ठोकताळे अगदी गणिती. कोणाकडून कधीच काही घेतले नाही,ह्या आत्मनिर्भरतेचा प्रचंड अभिमान. नानांना कधीच रिकामे बसलेले कोणीच बघितले नाही. दिनचर्येत प्रत्येक क्षणाला काय करायचे,हे पूर्वनियोजित.अगदी रोबॉटीक आयुष्य. रुमालाची घडी कशी घालावी,इथ पासून,ते स्टेपलेर च्या क्लिप्स हॉल मधल्या लाकडी कपाटाच्या उजव्या बाजूच्या वरच्या ड्रॉवरच्या डाव्या कोपऱ्यात प्लास्टिकच्या डब्बीतच. त्यांच्या आयुष्याचे मूलभूत तत्व-

A place for everything and everything in its place. 

साचेबंद आयुष्य.  काही साच्या बाहेर असू शकतच नव्हते. नानांच्या या गणिती आयुष्यात भावनांना जागा नव्हती. भावना,ओलावा,लवचिकता,सहृदयता ह्या गणितात बसवणे शक्य नाही. गणित या विषयाला कोरडेपणाचा शाप असतो. थोडेफार इकडे तिकडे, तेवढं समजून घ्या, हा अघळपघळपणा गणितात वर्ज. नानांनी घर सोडले, त्याचे मूळ कारण त्यांच्या पत्नीवर केलेले खोटे आरोप. आईनेच आपल्या पत्नीवर केलेले नानाविध आरोप सर्रास खोटे आहेत हे ठाऊक होते नानांना. त्यांच्या अहंकाराला ठेच लागली. पण आपल्या सहचरिणीची बाजू घेऊन घरच्यांना तोडीसतोड उत्तर न देता, त्यांनी सामान आवरून परत त्या घरची वाट धरली नाही. 

अपमान त्यांच्या पत्नीचा झाला,हे महत्वाचे नव्हते. त्यांचा अपमान झाला होता. नानांच्या पत्नीला बोलले होते घरचे. घोर अपमान. 

त्या माउलीने एकही शब्द न बोलता पोटच्या 2 मुली आणि तुटपुंजा संसार खकोटीला घेऊन नानंबरोबर तिने घर सोडले. तिचा अपमान झाला होता हा विषय कधीच चव्हाट्यावर आला नाही.

नानांनी पुनश्च अगदी सुतातून संसार सुरू केला. खाऊन पिऊन सुखी आशा थाटात पुढची अनेक वर्षे लोटली.

नानांची नियमावली, त्यांची गणिते,त्यांचं मोजून मापून जगलेले आयुष्य. त्यांनी त्यांच्या बहिणीच्या संसारात आलेल्या अडचणी अनेकदा सोडवल्या. त्या सोडवण्यात देखील,त्यांच्यावर बेजबाबदरीचा आरोप कोणी चढवू नये,हा गणिती हेतू. चौकटीतील नियमावली ही महत्वाची. कालांतराने मुलींची रीतसर लग्ने लावून दिली. त्याचे गणिती प्रयोजन त्यांनी करून ठेवलेच होते. 

आयुष्यातल्या परीक्षेत पडलेले सगळे प्रश्न त्यांनी अचूक उत्तरे देत सोडवले. आयुष्यतली गणिते  नीती आणि रितीचे फॉर्म्युले वापरून नानांना पैकी च्या पैकी मार्क मिळाल्याचा अभिमान त्यांच्या वर्तणुकीत आणि डोळ्यात ठासून भरलेला स्पष्ट दिसायचा. 

      आता वर्धक्यात सुद्धा,स्वतःची कामे स्वतः करण्यात ते व्यस्त असायचे. बायकोच्या आजारपणात त्यांनी तिची पूर्ण देखरेख केली होती.

कोणी कुठलाच आक्षेप घेणार नाही, असा चोख कारभार. रात्री वेळी अवेळी नुसती त्या माउलीने हाक द्यायची खोटी. नाना ताडकन उठून तिच्या सेवेस हजर. 

    एकदा त्या माउलीने सहज नानांना सुचविले,की मी देह सोडल्यावर तुम्ही आपल्या थोरल्या मुलीच्या घरी मुक्कामाला जा. हे ऐकताच नानांनी तिला फैलावर घेतले.

"तुला अक्कल आहे का? मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही. मला कोणाचीच मदत लागत नाही. माझं मी बघून घेईन."

त्या माऊलीच्या डोळ्यच्या कडा ओलावल्या.

म्हंटले,तर तिच्या नवऱ्याने तिची अहोरात्र सेवा केली होती. नाव ठेवायला कुठेच जागा नव्हती. कधी कधी तिला ह्यांनी जवळ बसून केसातून हात फिरवावा, एवढी क्षुल्लक अपेक्षा तिने केली होती. पण ते होणे नाही,याची त्या माउलीला जाणीव होती. तिने ते सत्य स्वीकारले होते. गणिताच्या रुक्ष कोरडेपणात भावनांचा ओलावा कधीच नसणार हे तिला माहीतच होते. 

आता, ती शेवटचा श्वास घ्यायच्या मार्गावर होती. 

तिला बोलणे देखील अवघड होते. नाकावर ऑक्सिजन चा मास्क होता. तिने खुणावून नानांना बोलावले. नाना त्यांच्या पूजेत गर्क होते. त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. पूजेत व्यत्यय झालेला त्यांना अजिबात खपेना. मना विरुद्ध ते ताम्हन खाली ठेऊन तिच्या जवळ आले. 

तिच्या डोळ्यातुन आसवे ओघळत होती. तिला त्यांचा अखेरचा निरोप घ्यायचा होता. तिने हात वर करीत नानांचा हात हातात घ्याचा होता.

नानांनी हातात बेलाची पाने आहेत, असे खुणावून दाखवले.

त्या माऊलीने उचललेला हात पुन्हा हळूच खाली ठेवला. आणि पुढच्या क्षणी,तो हात निश्चल झाला होता. 

नानांनी तिच्या नाकाजवळ  बेलाची पाने असलेला हात नेऊन,ती श्वास घेत नाही हे तपासले. 

पूजेत खंड झाला होता. 

बेलाची पाने त्यांनी परत फुलांच्या ताम्हनात ठेवली. 

आता,गणिती पद्धतीने तिचे पुढील सोपस्कार नाना अचूक बजावण्या मागे लागले. 


Dr Deepak Ranade.

No comments: