नीर गाठ
पर्वा एक कमरेच्या मणक्याचे जरा अवघड ऑपरेशन करत होतो.
त्या बाईंच्या मणक्याचे एक हाड (vertebra) खालच्या हाडावर सरकून त्यांच्या नसांवर प्रेशर देत होते. त्या सरकणार्या हाडाला लायनीत आणून मग दोन्ही हाडांमध्ये screws घालून त्यामध्ये रॉड घालून भक्कम फिक्स करायचे होते.
सगळे सुरळीत चालले होते. तिच्या हाडाचा काही भाग नसांवर खूपच जास्त दाब देत होता. टणक,दगडासारख्या त्या हाडाला ड्रिल करण्या शिवाय पर्याय नव्हता. हाय स्पीड ड्रिल वापरत होतो. त्या हाडाला अगदी चिकटून खाली dura होता. Dura म्हणजे मजा तंतू एका कापडी पिशबी सारख्या आवरणात बंदिस्त असतात त्या आवरणाचे नाव. ह्याच पिशवीत csf म्हणजे एक पाण्यासारखे पोषण करणारे द्रव्य भरलेले असते. ड्रिल करत करत ते अत्यन्त कडक हाड झीजवण्याचे काम चालू होते. खूप कमी जागा असते हे सर्व करायला.
ड्रिल करणे ही एक कलाच असते. ड्रिल करताना छातीत धडधडते. थोडे नियंत्रण गेले तर मज्जा तंतूंना थेट इजा.
ड्रिल करत करत त्या हाडाला झीजवत झीजवत शेवटचा पापुद्रा उरला होता. ड्रिल वेळीच वर घेणार,इतक्यात एक छोटेसे भोक पडले त्या dura मध्ये. . क्षणात, पाण्याचे कारंज उडले आणि गांडूळा सारखी roots बाहेर पडली. Roots म्हणजे नसा.
चर्रर्र झाले काळजात. आता ती सगळी गांडुळं पुनः त्या छोट्याश्या विवरातून आत घालून मग एक टका मारणे,हाच उपाय.
ते छिद्र छोटे होते. ते बंद करायला तिथे अगदी रेशमी पातळ 4 zero size चा धागा वापरावा लागणार होता. मग त्या छिद्राच्या कडा नीट तपासून ते नाजूक 4 zero suture material उघडले. खूप नाजूक सुवित ते गुंफलेले होते. ती अर्धगोल सुवी needle holder मध्ये धरून दोन्ही कडांमधून आरपार एक टाका घेतला.
अजून सगळ्यात अवघड भाग पुढेच होता.
आता मला ते छिद्र बुजवायला त्या रेशमी धाग्याची गाठ मारायची होती.
जागा जेमतेम 3 चौरस इंच. जवळ जवळ 5 इंच खोलीत हे साधायचे होते.
एक टोक needle होल्डर ने धरले आणि दुसरे टोक एक forceps मध्ये पकडले.
गाठ मारायला पहिल्यांदा दोन्ही टोके एकत्र आणून मग एक टोकाला दुसऱ्या टोकाच्या खालून काढायचे होते. त्या छोट्या जागेत एका टोकाला दुसऱ्या टोकाच्या खालून काढणे कर्म कठीण. पण त्या शिवाय गाठ मारणे शक्यच नाही.
कसे बसे ते आटापिटा करून जमवले. पण जर नीर गाठ मारायची असेल तर पुन्हा त्या वरती असलेल्या टोकाने आता ह्या वेळी दुसऱ्या टोकाच्या खालून जाणे गरजेचे होते. घाम काढला ह्या कसरतीने.
अखेर, नीर गाठ मारून झाल्यावर ती दोन्ही टोके ओढून ती गाठ घट्ट केली. मग शेवटी ती दोन्ही लांब टोके गाठी जवळ कापून टाकली. हुश्श झाले.
सर्व मनासारखे झाल्यावर closure करत असताना गाठीं बद्दल विचार करत होतो. नात्यांच्या गाठीचे ही असेच असते. सहवास असल्यामुळे भावनिक जागेची दाटीवाटी होतेच. कधी एका टोकाने दुसऱ्या टोका खाली जावे लागते. मग दुसऱ्या टोकाने गरज पडल्यास पहिल्या टोका खालून जावे लागते. प्रतिकूल परिस्थिती या टोकांना ताणून ती गाठ घट्ट करण्यात हातभार लावतात. आणि ती दोन्ही टोके पूर्ण खेचून गेल्यावर गाठ घट्ट होते. काळाच्या ओघाने शेवटी अहंकाराची लांब टोके प्रेमाच्या कात्रीने कापून टाकावी लागतात. मग त्या गाठी मध्ये ती दोन्ही टोके विलीन होतात आणि त्यांचे वेगळेपण ओळखणे जवळ जवळ अशक्य. आणि मग ती टोके हाती लागत नसल्यामुळे, ती नीर गाठ सोडवणे किंवा सुटणे नाही.
त्या एका गाठीवर ते एवढे मोठे ऑपरेशन आणि त्या रुग्णाच्या भविष्य काळात काही complication न होणे अवलंबून होते.
कुठल्याही नात्याचा कणा देखील ह्या नीर गाठीवरच विसवलेला असतो.
Dr. Deepak Ranade.
No comments:
Post a Comment