Tuesday, August 4, 2020

प्राजक्ताचा सडा

प्राजक्ताचा सडा

प्राजक्त. हे केवळ फुल नाहीये. एक ठेवा आहे. बालपणाच्या आठवणींचा. एक वारसा आहे सौंस्कृतीचा. एक पावित्र्याचे निर्मलतेचे प्रतीक. भौतिकतेतुन अधिभौतिकते कडे वाटचाल. एक निशाणी निरागस निष्पाप,बालमनाची.आमच्या लहानपणी,आमच्या घराच्या मागच्या बाजूला एक मोठ्ठ पारिजातकाचे झाड होते. सकाळी ,आज्जी  फुलं वेचायला बरोबर घेऊन जायची. पावसाळ्याचे दिवस,तो प्राजक्ताच्या फुलांचा सडा, किंबुहना गालिचाच म्हणावा लागेल. ओली चिंब पण टवटवीत, मोतीपोवळ्याचा चुराच जणू. आज्जी सांगे "अरे जरा हळू हळू बघून चाल. ती फुलं पायदळी जाऊ देऊ नको." त्या इवल्याश्या पावलांनी मग फुलं चुकवत चुकवत एक एक फूल टिपून आज्जीच्या परडी मध्ये भरायचं.
शुभ्र पांढऱ्या पाकळ्यांचे ते नाजूक फूल,आणि त्याचे ते केशरी गडद देठ. अल्पायुषी,पण त्या अल्पावधीत त्या फुलांचा मोहक सुवास मोहिनी टाकल्या प्रमाणे असर करतो.  अजिबात दर्प नसलेला,पण हळुवार पणे सर्वत्र पसरणारा निर्मळ,सात्विक,पवित्र सुगंध. परडी भरली की आज्जीच्या मागे मागे धावत घरी जायचं.
मग आज्जी म्हणायची,आता त्या फुलांचा हार कर. ती एक बारीक सुई घेऊन त्याच्यात दोरा ओवून द्यायची. आणि मग, त्या फुलाच्या मधोमध ती सुवी घालून थेट त्या केशरी देठातून,हळुवार पणे बाहेर काढायची. एका पाठोपाठ एक अशी 25 ते 30 फुलांचा हार झाला,की मग आज्जीकडे धावत जायचं. ती कौतुकाने माझया कलाकृतीकडे बघून, दोन्ही टोकांची नीर गाठ मारून द्यायची. मग, भूक भूक करत आईकडे हट्ट करत नाष्टा करायचा.  तोवर आज्जीची अंघोळ,पूजा उरकलेली असायची. शाळेत जाण्यापूर्वी देवाला नमस्कार करायला गेलो,की माझया हातानी केलेला तो हार  देव्हाऱ्याच्या चौकटीवर सजवलेला असायचा.
नमस्कार केल्यावर,आज्जी म्हणायची, देवाला तुझा हार खूप अवडलाय. त्याने तुला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. दप्तर खांद्यावर चढवून मग, शाळेकडे कूच. परमेश्वराच्या आणि आज्जीच्या आशीर्वादानेच कदाचित, डॉक्टर होण्याचे सौभाग्य लाभले. पुढे,कर्म धर्म संयोगाने surgeon झालो. प्रत्येक वेळी,टाके घेतो,तेव्हा त्या प्राजक्ताच्या फुलातूनच सुवी घालतोय हा भास होतो. त्या प्राजक्ताच्या फुलनानेच टाके घालण्याची नजाकत शिकवली. हाताला  हळुवार पणाचे वरदान दिले असावे. त्या फुलाची शुभ्रता,त्याचे पावित्र्य, आणि त्याचा सुवास सतत आयुष्यात राहावी,ही प्रार्थना.

डॉ दीपक रानडे.

No comments: