Tuesday, August 4, 2020

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही

लॉकडाउन, करोना वायरस चा वाढता प्रादुर्भाव, पॉझिटीव्ह रिपोर्ट्स, quarantine, ICU, व्हेंटिलेटर. गेले 5 महिने रोज उठावे,तर आज काय बातमी कानावर पडणार आहे,याची धाकधूक. जीवनातले चैतन्य,उभारी,ऊर्जा,आनंद, तेज,हुरूप,सगळेच या किटाणू मुळे हरपून गेले आहे. आयुष्यातली सहजता,स्वभावीकता, उत्कटता गायब झालीये. सम्पूर्ण मानव जात हतबल होऊन शरणागत झाली आहे या अनाकलनीय आजारापायी. हे वायरस  सगळ्यांवर हवी झाले आहे. काहींच्या फुफुसात,काहींच्या मनात,काहींच्या  अंतःकरणात. मानव जातीला वेठीस धरले आहे या सूक्ष्म किटाणूने. या विषाणू कणाने आयुष्य भरभरून जगण्याचे - मरमरून जगण्यात रूपांतर केले आहे.
प्रत्येकजण अक्षरशः पुढचा श्वास देखील भीतभित घेतोय.  कुठल्या क्षणी, कुठल्या रूपाने, हा यमदूत शरीरात प्रवेश करेल या भीतीने आयुष्य ढकलतो आहे.
मी डॉक्टर असल्यामुळे बरेच जण मला " पुढे काय होणार? ह्या शापातून आपण मुक्त होणार तरी का ? असे अवघड प्रश्न विचारतात.
      माझे उत्तर शास्त्रोक्त(scientific),राजकारणी,(politically correct)आध्यत्मिक (spiritual), तत्वज्ञानी(philosophical) या वेगवेगळ्या सदरात मोडते.
शास्त्रोक्त उत्तर  herd immunity, vaccine, co morbid factors, cytokine storm, etc,यांचे विश्लेषण सोप्या भाषेत सांगणे.
 राजकारणी(politically correct) उत्तर म्हणजे मानव जातीवर इतिहास काळापासून अनेक संकटे आली( Spanish flu pandemic of 1918, plague, HIV, SARS 1, etc) आणि त्यावर मानवाने अखेरी विजय मिळवला. तसेच,ह्यावर सुद्धा आपण विजय मिळवू.
अध्यात्मिक उत्तर जरा वादास्पद आणि अशास्त्रोक्त. दैव,कर्म,नियती,आशा अनाकलनीय आणि हाताबाहेर असलेल्या सांकल्पना मांडून आपले अज्ञान झाकायचं.खरोखर,प्रत्येक व्यक्ती ह्या वायरस ला कसा प्रतिकार करतो, काहींना केवळ मामुली सर्दी पडसे, काहींना ताप, श्वासोश्वासला अडचण,तर काही अक्षरशः 4 दिवसात देवाघरी. असे का होते, हे अगम्य आणि गूढ.
तत्वज्ञानी (philosophical) उत्तर जास्त समर्पक आणि पोक्त.
आपण आपल्यापरीने काळजी घेणे हे महत्वाचे. पण जगणे थांबवण्या इतकी क्षमता त्या सूक्ष्म किटाणूला अजिबात बहाल करू नये. आशावादी राहून, ही संधी स्वतःची उत्क्रांती होण्यासाठी आहे,असा ठाम विश्वास ठेवून,वाचन,चिंतन,आत्मपरीक्षण,पुढील आयुष्याचे नियोजन करणे हेच योग्य. गर्भगळीत,लाचार,निराश होऊन काहीच साध्य होत नाही. ह्या वायरस पासून शरीराला जपणे जेवढे महत्वाचे,तेवढेच मनाला सुद्धा जपणे गरजेचे आहे. भयभीत मनावस्था रोग प्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम करते,हे नक्की. मानसिक रोगप्रतिकार वाढवणे महत्वाचे. मानसिक दुरबलता सुद्धा कदाचित या किटाणूला शरीरात प्रवेश करायला पूरक ठरत असेल. प्रतिकारशक्तीची सकारत्मक ऊर्जा प्रत्येक पेशीत पोचते ह्याची अनुभूती मला कित्येक रुग्णांमध्ये आली आहे. लस ही जशी प्रयोगशाळेत बनवली जात आहे,तशीच आपल्या मनात तयार करणे गरजेचे आहे.
          अभय इथले संपत नाही...........

डॉ दीपक रानडे.

No comments: