अनासक्त प्रेम.
श्रीकृष्ण भोमे ह्यांना स्वरूपसाक्षात्कार झाल्याबद्दल काहीच शंका नव्हती. त्यांच्या बरोबरच्या पहिल्याच भेटित त्यांच्या प्रतिभेची, वात्सल्याची,गुरुतत्वाची प्रचिती आली. काही ऋणानुबंध,हे खरोखर विधिलिखित असावेत. नाहीतर,त्यांचा आणि माझा संपर्क होण्याचे वास्तविक काहीच औचित्य नव्हते. पण तो योग जुळून आला आणि आमची भेट नियतीने घडवून आणली.
त्यांच्या घेरी पोचलो,की त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण निरागस असलेले प्रेम दिसायचे. त्यांचा माझ्या वर इतका जीव कशामुळे होता, हे मला समजत नव्हते. पण त्यांना भेटण्याची आंतरिक ओढ मात्र जाणवायची. भेटल्यावर त्यांच्या पाया पडायचो. ते थोडेसे अवघडल्या सारखे व्हायचे,आणि मला जवळ बसवायचे. मग, अत्यंत प्रेमाने,मायेचा हात माझ्या पाठीवरून फिरवत,माझी चौकशी करायचे. त्यांच्या चौकशीत माझ्याबद्दल असलेली काळजी, कौतुक,उत्कंठा त्यांच्या स्पर्शातून आणि डोळ्यातून जाणवायची. त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज, मायेचा ओलावा,आणि एक कमालीची निश्चलता जाणवायची. मी बऱ्याच दिवसांनी भेटायला गेल्यामुळे,मलाच जरा अपराधी वाटत असे. त्यांनी कधीच मला त्याबद्दल विचारले नाही. उलटे, मी जर सारवासारव करायचा प्रयत्न केला,तर ते समजूत काढत म्हणायचे"अरे तू मोठा सर्जन आहेस. तुझ्या धावपळीत मला भेटायला वेळ मिळणे अवघड आहे,हे माहीत आहे मला.
त्यांच्या प्रेमात काहीतरी वेगळेपण जाणवायचे. प्रेमाला दूषित करणाऱ्या स्वार्थ,असुक्षितता,परावलंब,अपेक्षा,अहंकार,कुठल्याच छटा त्यांच्यात नव्हत्याच. त्यांचे प्रेम म्हणजे एका विलक्षण निखळ,निरागस,निरपेक्ष,निस्वार्थ भावनेची,ओलाव्याची अभिव्यक्ती होती. एकदा मी जवळ जवळ 3 ते 4 महिने भेटलो नाही. मग भेट झाली,तेव्हा मला खूप ओशाळगत होत होतं. मी नेहेमी प्रमाणे,त्यांच्या पाया पडलो आणि मग त्यांच्या जवळ बसलो. त्यांनी सुद्धा तेवढ्याच प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि लगबगीने माझी विचारपूस केली. माझ्या प्रदीर्घ बेपत्ता असण्याची कारणे सांगायला सुरुवात केली.
तेव्हा,त्यांनी मला प्रेमाच्या पारमार्थिक औंशा बद्दल थोडे विवेचन केले.
"दीपक,तू मला भेटलास,की मला परमानंद होतो. खूप प्रसन्न आणि छान वाटतं. तुझ्या बरोबर गप्पा, तू केलेल्या शस्त्रक्रिया, तू वाचलेली पुस्तक,तुझे छापलेले लेख,अशा अनेक विषयांचा स्वाद असलेली बौद्धिक मेजवानीच असते मला. पण तुझी भेट झाली नाही,तरी मला काही त्रास किंवा चुटपुट लागत नाही. तुझ्या बद्दलच्या माझ्या भावना ह्या नित्य,अविरत आणि शाश्वत आहेत. आपले मूलस्वरूप,आपल्यातील चैतन्य, हे एकच आहे. तुला भेटण्याच्या आनंदाचे कधीही आसक्तीत पर्यवसन होणे नाही. भेटल्याचा आनंद काय सांगू तुला. पण भेटलो नाही तर भेटण्याची इचछा, ओढ मला अगतिक नाही करू शकत. ही अगतिकता म्हणजेच आसक्ती. पारमार्थिक प्रेम हे आपल्या मनाला सकारात्मक ऊर्जा देते. ते प्रेम मन,बुद्धी,अहंकार याच्या पलीकडे वावरते. त्या प्रेमाला द्वैताचा दौंश झालेला नसतो. ते प्रेम अद्वैताच्या परमतत्वाची अनुभूती असते. त्या प्रेमाला अनासक्तीचा आशीर्वाद असतो."
त्यांचे शब्द अजूनही कानात स्पष्ट दरवळतात.
त्यांनी देह ठेवल्याचा आदल्या दिवशी मात्र अनाकलनीय वर्तणूक केली. त्यांचा पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मी त्यांच्या कडे पोचलो,तेव्हा सौ. भोमे मला म्हणाल्या
"ह्यांनी मला काल रात्री त्यांचा खोलीत अजून एक अंथरूण घालायला लावले. ते तूझी चातकासारखी वाट पहात होते आणि मला म्हणाले,दीपक मुक्कामी येणार आहे. ते तुझयावर पोटच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करायचे." मला गहिवरून आले. ऋणानुबंध रक्ताचे मिंध्ये नसतात. गुरुतुल्य व्यक्तीचे शिष्यावर प्रेम हे पारमार्थिक उंचीचे असते. त्या निर्गुण निराकार परमात्म्या सारखेच अबोध, अव्यक्त, अनासक्त असते. गुलजारजींचे ते काटा आणणारे शब्द स्मरले.
"हमने देखी है इन आंखो की मेहेक्ती खुशबू
प्यार को प्यार ही रेहेनेदो कोई नाम ना दो
सिर्फ एहसास है रूह से मेहेसूस करो
"हाथ से छु के इसे रिशतो का ईलजाम न दो.'
हे प्रेम अनुभवण्याचे सौभाग्य मिळाले,यासाठी मी त्या परमेश्वराचा सदैव ऋणी राहीन.
मी त्यांना भेटायला गेलो नाही,याचा जीवाला खूप घोर लागला.
कदाचित, तो अनासक्त जीव मला शेवटचा पारमार्थिक संदेश देण्यासाठी व्याकुळ झाला असावा. मला आसक्तीतून मुक्त करणारा संदेश देण्याची दैवी आसक्ती.
डॉ दीपक रानडे.