Friday, January 15, 2021

बाप माणूस

 बाप माणूस 


ते दिवस खूपच कठीण होते. मी माझे 50 बेड हॉस्पिटल बंद करायचे ठरवले होते. मला खूप डोके दुःखी होत होती. सर्व सुविधा युक्त CT स्कॅन, ICU,2 व्हेंटिलेटर, सोनोग्राफी मशीन, सी आर्म, लॅमीनर एअर फ्लो असलेले अद्यावत ऑपरेशन थिएटर, लिफ्ट असलेलं तीन मजली माझे स्वप्न. माझे काही निर्णय चुकले,ह्यात शंका नव्हती.  2006 मध्ये जवळ पास 75 लाख खर्चून नूतनीकरण करण्याचा अति धाडसी निर्णय अंगाशी आला होता. 

एक हाती युद्ध लढत होतो. बँकेचे हप्ते,70 कर्मचाऱ्यांचे पगार, maintainance चा खर्च,नवीन घेतलेल्या 2000 sqft घराचे हप्ते, दोन गाड्या........

पिळून निघत होतो. काहीच सुचत नव्हतं. कुठलीही बँक टॉपअप लोन देण्यास तयार नव्हती. आयुष्यात एखादा निर्णय चुकीचा ठरतो, आणि त्या निर्णयाने आयुष्याची दिशाच बदलून जाते. पण माझी आर्थिक विवंचना  माझ्या आयुष्याची दिशा बदलण्याचे कारण नव्हते. त्या भौतिक विवंचने मागे एक सुप्त पण अमौलीक आधिभौतिक तत्वाशी परिचय होऊन,एक महत्वाचा धडा शिकण्याचा योग आला.

आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टी,संपत्ती बद्दल आसक्ती असणे, हे अगदीच स्वाभाविक असते. मला त्रास होत होता,तो या आसक्तीचा. माझे वडील, हे तसे self made. स्वतःच्या कष्टाने त्यांनी त्यांचे साम्राज्य उभे केले होते. नित्य नियमाने पहाटे 5 ला उठून, भसरीका करत. मग morning jog, लगेच अंघोळ आणि गडी 8.30 ला बाहेर पडायचा. सतत हसत मुख, सदैव मदतीचा हात पुढे करणारा, आणि अत्यन्त energetic. पूर्ण पुरुष होते माझे वडील. त्यांच्या सानिध्यात आल्यावर एक सुरक्षिततेच्या पांघरुणात शिरल्या सारखे वाटे. ते काहीही करू शकतात, हे लहानपणा पासून बघितले होते. 

रुंद खांदे, 6 फूट उंच,व्यायाम केलेले भरभक्कम शरीर, डोळयात चैतन्याची विलक्षण चमक. देव आनंद सारखाच समोरचा एक दात थोडा वाकडा. खूपच रुबाबदार व्यक्तिमत्व. मला बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद. त्यांच्या डोळ्यातला आनंद ओसंडून वाहायचा. सद्गुरू, शेट, महाराज,राजे,ह्यापैकी त्या क्षणाला त्यांच्या इच्छे प्रमाणे वाटेल,त्या टोपण नावाने मला सम्बोधून वात्सल्य पूर्ण नजरेने बघत. 

एखाद्या पूर्ण पुरुषाचे वात्सल्य आणि प्रेम काय असते, हे शब्दात वर्णन करणे अशक्य. सर्व दुनिया माझ्या ताब्यात असल्याचा आत्मविश्वास,आणि मी कुठल्याही अडचणीला सामोरे जाऊ शकतो हे आत्मबळ मिळायचे. 

         माझ्या आर्थिक विवंचनेने मला आता जगणे अवघड करून सोडले होते. माझ्या वडिलांना याची पूर्ण जाणीव होती. त्यांनी कधीच मला कोसले नाही. ते भेटल्यावर नेहेमी उत्साह वाढवणारे चार शब्द बोलून, आपण नक्की काहीतरी मार्ग काढू. तू हतबल होऊ नकोस असा धीर द्यायचे.

मी माझ्या प्रॉपर्टी,आणि शून्यातून निर्माण केलेल्या स्वप्नात अडकलो होतो याची जाणीव त्यांना होती. खरा प्रॉब्लेम होता, तो त्या बद्दल असलेल्या आसक्तीचा आणि अपयशाची नामुष्की स्वीकारण्याचा. 

माझे वडील एक अलेशान 3 बेडरूम दोन मजली रो हाऊस मध्ये रहायचे. पुढे मोठे गार्डन,मागे lawn, गाडी पार्क करायला पोर्च. राजा सारखे जगत होते ते. माझी मनाची अवस्था त्यांना कदाचित जाणवली असेल. 

मी उभे केलेले साम्राज्य हातातून निसटत चालले आहे, याची खंत माझ्या डोळ्यात त्यांना दिसत होती. मग अशा परिस्थितीत ते मला आर्थिक मदत करणे शक्य नव्हते. पण, आपल्या प्राणाहून प्रिय 'महाराजांचे' सांत्वन करायचे तर होते. 

त्यांनी एके दिवशी मला बरोबर घेतले आणि त्यांच्या एका  दूरच्या आत्ये भावा कडे घेऊन गेले. 

माझ्या वडिलांचे नाव मुकुंद. श्री कृष्णच जणू. त्यांनी मला त्यांच्या भावाची ओळख  'मुकुंद केळकर', अशी करून दिली. मुकुंद हा व्यवसायाने chartered accountant. 

इकडच्या तिकडच्या गप्पा आणि चहा झाल्यावर वडील एकदम मुकुंदाला म्हणाले " अरे मुकुंदा, दीपकला थोडी पैशाची गरज होती, पण आता बँका काही मदत करू शकत नाहीयेत. माझे घर विकून किती पैसे मिळतील रे?"

  त्यांचे शब्द ऐकून मी हादरलो. मुकुंद सुद्धा दोन मिनिटे शांत झाला. मग तो वडिलांना म्हणाला

'बाळासाहेब, तुम्ही काय बोलताय?"

वडील म्हणाले,"अरे, पैसे,प्रॉपर्टी, ह्या गोष्टींचं मला फार काही आकर्षण नाहीये. घर हे घरात रहाणाऱ्या व्यक्तींपेक्षा कधीच महत्वाचे असू शकत नाही. दीपक ह्या संकटातून बाहेर निघाला,तर अशी 3 घरे घेऊ शकेल."

त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही आसक्ती नव्हती. होती ती केवळ, माझा प्रॉब्लेम सोडवण्याची आंतरिक ओढ.

  मुकुंदा म्हणाला आपण बघू. काहीतरी मार्ग काढू. 

कालांतराने, घर विकण्याची परिस्थिती अली नाही. 

पण त्या दिवशी, माझी माझ्या हॉस्पिटल बद्दलची आसक्ती निश्चित कमी झाली. आणि त्याहून पुढे, मी स्वकष्टाने विकत घेतलेले 4 बेडरूम चे घर सोडताना काहीच दुःख झाले नाही. वडिलांनी मुकुंदाकडे नेऊन मला जी शिकवण दिली, ती अनमोल. अडचणीच्या काळी, कुठलाही निर्णय घ्यायला न घाबरण्याची. कुठल्याही  परिस्थतीला अधीन व्हायचे नाही.  माझ्या मनातील असुरक्षिततेचे भय कायम घालवून टाकले. नुकसान होऊ शकते,पण पुरुषार्थाचा  कधीच अस्त होऊ द्यायचा नाही. व्यक्ती ही कुठल्याही प्रॉपर्टी पेक्षा मोठी असते. प्रॉपर्टी पुन्हा विकत घेता येऊ शकते. नुकतेच माझ्या नातेवाईकांनपैकी एका चुलत चुलत बहिणीने बरोबर याच्या उलट वर्तणूक करीत, प्रॉपर्टीच्या हव्यासापायी नात्याची आहुती दिली. कदाचित त्यांच्यावर माझ्या वडिलांचे सौंस्कार म्हणावे तितके असर करू शकले नाहीत. काही माणसे फक्त biologically बाप नसतात.  नात्याने, कर्तृत्वाने, काळजाने आणि प्रतिभेने सुद्धा. 


दीपक रानडे.

No comments: