Friday, January 15, 2021

वसंत उर्फ बाळ्या - एक वेड

 वसंता उर्फ बाळ्या नावाचे वेड.

      दोन दिवसांपूर्वी बाळ्याचा फोन आला. 'अरे उद्या वेळ झाला की जरा चक्कर मार. थोडे तुझ्या कडून 'हारले डेविडसन' मोटरसायकल बद्दल चर्चा करायची होती.'

मी मनात म्हंटलं"आता ह्या माणसाच्या डोक्यात मोटरसायकल विकत घेण्याचे प्लॅन्स चालू झाले की काय? हा माणूस काहीही करू शकतो,याची प्रचिती अनेक वेळा आली होतीच. "कुछभी करने का पागलपन  और दम रखनेवाला अवलिया' असेच  मनात बाळ्याचे वर्गीकरण केले होते. 

   IIT मधून शिक्षण घेतलेल्यां पासून जरा दबकून रहातो मी. अत्यन्त बुद्धिमान,पण सनकी मंडळी.म्हणजे डॉक्टर होणे एक वेळ सोपे,पण JEE क्रॅक करणे,हे मला ह्या जन्मी तरी शक्य नाही,हे नक्की. चायला, इंजिनिर माणूस  डॉक्टरला मोटरसायकल बद्दल विचारणार. कुछ बात जम नही रही थी.

सांगितलेल्या वेळेला मी बाळ्याच्या गडावर मोटरसायकलने पोचलो. प्रवेश करता क्षणी,आपण काळाचा उंबरठा ओलांडून पेशव्यांच्या दरबारी आलो आहोत,असेच काहीसे वाटते. दगडी पायऱ्या,ते सागवानी नक्षीदार दरवाजे,आत शिरल्यावर पेशवेकालीन गृहरचना असलेला भव्य दरबार.मी आसनस्थ झालो.

थोड्या वेळात,बाळ्या त्याच्या खास 'लिमये' शैलीत, प्रवेश करत माझ्या समोर येऊन बसला. लिमये शैली म्हणजे नेमके काय रे भाऊ? 

मी आहे हा असा आहे. औपचारीकता रहित,चेहऱ्यावर आयुष्य आपल्या पद्धतीने जगणारी बेफिकीरी असलेला अविर्भाव, सकॅनिंग करणारे बुद्धीमान घारे डोळे, आणि पाहुणे येणार,म्हणून पोशाखापासून भावनांपर्यंत कुठेही बदल न करणारे attitude. 

    थोड्याच वेळात, प्रवीणजी तरडे सुद्धा आमच्यात सामील होणार होते. तत्पूर्वी, 15 मिनिटे ये,अशी सूचना मला आगाऊ देण्यात आली होती. 

"अरे तू मला जरा हारले डेविडसन या मोटरसायकल बद्दल माहिती सांग. कुठलं मॉडेल आहे तुझे? किती cc चे इंजिन आहे? भारतात मिळते का? काय किंमत असते साधारण? एअर कूल्ड इंजिन असते की कसे? 

    मी विचारले " तुला विकत घ्यायची आहे का ?"

मग त्याने उलगडा केला.

माझया नवीन कादंबरीतल्या नायकाला मोटरसायकल विकत घेण्याचे प्रयोजन आहे. त्याच्या व्यक्तिरेखेला साजेशी आहे का ही बाईक? हे जरा जाणून घ्यायचे होते.

मी क्षणभर जरा स्तब्ध झालो. ह्या माणसाचा मेंदू कसा काम करतो? 

कादंबरी लिहिणे,पात्र किती सखोल विचार करून आणि रिसर्च करून रेखाटायची असतात? बापरे.कमाल ह्या माणसाची. मी त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना, तो काही मुद्दे लिहून घेत होता. 

आमचे सेशन चालू असतानाच प्रवीणजी तरडे आमच्यात सामील झाले. 

मग कादंबरीतल्या तिसऱ्या chapter चे वाचन बाळ्याने त्याच्या शैलीत सुरू केले. त्याच्या आवाजातले चढउतार, त्याची अति सूक्ष्मात जाऊन बारीक बारीक गोष्टींची सुरेख मांडणी, खरच खूप कौतुकास्पद होते सारे. 

मी रोज काहीतरी नवीन आत्मसात करण्याची धडपड करतो. माझा आजचा दिवस त्या दृष्टीनें सार्थकी लागला. बरेच काही शिकलो. कुठल्याही कामात झोकून देणें, एखाद्या उद्दिष्टाने झपाटून जाणे, माहिती नसलेल्या विषया बद्दल जमेल तेवढ्या मंडळींकडून माहिती जमवणे. हा बाळ्या म्हणजे मित्र नसून, एक वेड आहे.

एक होऊ घालणाऱ्या बेस्ट सेलर कादंबरीची रचना कशी होते,आणि त्यामध्ये आपला खारीचा वाटा आहे, ह्या विचाराने मन सुखावले. कादंबरी लिहिताना, चित्रकार जसे हळुवार पणे एक एक रंग आपल्या ब्रशच्या अलगद स्ट्रोक्स ने  भरत जातो, तसेच काहीतरी शब्दाच्या माध्यमातून एक विलक्षण चित्र डोळ्यासमोर उभे राहत होते. पात्रात शिरून,किंबुहना त्या वर्णनात आपण actually सहभागी झालो,याची जाणीव होत होती. "वाह. क्या बात है' 

बाळ्याची माझया पोस्टवर नेहेमीची कंमेंट त्याला व्याजासाहित परत देत मी माझ्या हारलेवर बसून परत निघालो. 

Dr Deepak Ranade.

No comments: