Friday, January 15, 2021

सर्वात मोठे ऋण

 सर्वात मोठे ऋण


6 वर्षांपूर्वी,हॉस्पिटल बंद करायचा निर्णय घेतला. खूपच डोके दुःखी होत होती.देणेकरी,बँकांच्या रिकव्हरी एजेंटचे सतत फोन,कुठेच लक्ष लागत नव्हते. हैराण झाला होता जीव.

वैतागलो होतो ह्या सर्व कटकटींना. 

मी शस्त्रक्रिया करण्या व्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये व्यस्त रहात होतो. हॉस्पिटल चे नूतनीकरण करण्याचा निर्णय अंगावर येत होता. काही गणिते व्यावसायिक तत्वावर मांडायची असतात.भावनिक निर्णय काही वेळा व्ययसायिक मूर्खपणाचे ठरतात. कर्जाचा डोंगर उभा राहीला होता. आता परतफेड करण्याची अवघड, किंबुहना अशक्य कामगिरी आवाहन करीत होती.

मुलगा 18 वर्षाचा होता. देणेकऱयांचे सतत येणारे फोन,माझी चिडचिड,हे सर्व नित्याचे झाल्यामुळे तो जरा काळजीत पडला होता.

"बाबा,किती देणी आहेत रे तुझी?"

मी त्याची समजूत काढत सांगितले "You dont worry. I will take care of it"

सर्जन असल्यामुळे सर्जरी मधले एक खूप महत्वाचे तत्व मनात पक्के होते.

"A good surgeon Is not one, who has no complications. A good surgeon is one who can take care of the complications competently if they arise."

 हॉस्पिटलचा घाट घातला होता. प्रॉब्लेम आले आणि आता ते निस्तरायचे. स्वप्ने बघून ती खरी करताना हरणे, हे स्वप्ने न बघण्यापेक्षा नक्कीच उमदे. 

"देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए" आता सिलसिला सोडवायचा. ठरवलं ते प्रत्यक्षात होतंच असं नाही. आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतंच असंही नाही. यालाच कदचित आयुष्य म्हणतात.

कर्ज बरेच होते. मध्यम वर्गीय कुटुंबातल्या,व्यवसाय कशाशी खातात,याची काहीच जाण नसलेल्या academic पार्श्वभूमीचा  असलेला मी. असो.

मग सगळी कर्ज,ऋणे फेडण्याचा मागे लागलो.

जी सर्व मंडळी माझ्या यशाचे गुणगान करायची,तीच सारी आता मी किती मूर्ख आणी बेअकली आहे, असे भाष्य करू लागले. मदत कोणाचीच नसते पडत्या काळात.

सद्य परिस्थियीत बऱ्याच मंडळींची आर्थिक वाट लागलेली पाहिली, की त्यांची मानसिक परिस्थिती कशी होते,याची पूर्ण जाणीव आहे मला. खूप अवघड असतं आणि खूप एकटे असल्याची पदोपदी जाणीव होते.

 अपयश,हे एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे आणि झटक्यात बदललेल्या परिस्थिती मुळे सुद्धा पदरी पडू शकते. 

 हळू हळू, कर्जाचा डोंगर पोखरत पोखरत, योग्य वेळी हॉस्पिटल विकण्याचा निर्णय घेतला. खूप मानसिक त्रास होतो. एक एक कष्टाने जमवलेल्या गोष्टींवर पाणी सोडून द्यायचे. निरासक्त होणे,हाच इलाज. पण अखेरीस, तब्बल 5 वर्षांनी सारे आटोक्यात आले होते.

असाच थोडा विसावा घेत असताना,चिरंजीवाने विचारले" बाबा,आता तुमच्यावर कुठलेच कर्ज किंवा कुणाचेच ऋण शिल्लक नाही ना? "

मी त्याला सांगितले-" अजून सगळ्यात मोठे कर्ज फेडायचे रहायले आहे"

तो घाबरला. परत देणेकर्यांचे फोन, पीडा,कटकट. त्याने पटकन विचारले " किती रक्कम आहे बाकी अजून आणि काय तारण ठेवले आहेस ? आणि कोणा कडून घेतले आहेस हे कर्ज? "

      मी त्याला उत्तर दिले-"5 वर्षात मी नवीन दीपक झालो आहे. ह्या नवीन दीपक ने 5 वर्षांपूर्वी च्या जुन्या दीपक कडे त्याची अस्मिता, त्याचा स्वाभिमान गहाण ठेवले आहे. ते परत मिळण्यासाठी परतफेड करावी लागणार आहे. ते नव्या दीपकवर मोठे कर्ज आहे."

माझ्यावर असलेले आणि मलाच मला परतफेड करावयाचे ऋण. हे ऋण फेडणे  सर्वात अवघड आहे.

    बँकांना पैसे परत करून ऋण मुक्त होता येते.

मलाच माझे ऋण फेडायचे असले,तर पैश्याव्यतिरिक्त बरीच मोठी किंमत मोजावी लागणारे. आणि कदाचित माझ्या हायातीत हे ऋण फेडू शकणार नाही. हे ऋण नेमके किती आहे,आणि ते फेडण्याचे नेमके चलन, कसे आणि किती,ह्याचा काहीच अंदाज नाही रे. 

रोज थोडे थोडे परत फेडतोय माझ्या परीने. बघू, एखाद दिवशी जुना दीपक म्हणेल, "आता कर्ज संपले. तू तारण ठेवलेला तूझा स्वाभिमान परत घे" त्या दिवसाची वाट बघतोय."


दीपक रानडे.

No comments: