Friday, January 15, 2021

तो पारिजातक

 तो पारिजातक


बालपणापासूनच पारिजातकाचे प्रेम खूप. त्या नाजूक फुलाचा गंध म्हणजे बालपणीचा अनमोल ठेवा. त्या फुलातल्या  साधेपणात, नाजूकपणात आणि सात्विक सुगंधात परतत्वाचा औंश जाणवतो. पवना धरणाच्या कुशीत  ( God Particle) हे माझे छोटेखानी घरकुल. 

      अनंत अडचणी आणि कटकटीतून मार्ग काढत असताना देवानेच हा कण माझ्या पदरात टाकला,असेच म्हणावे लागेल. त्याकरता मी त्या परमेश्वराचा शतशः ऋणी आहे. ह्या जागेने प्रचंड सुख, समाधान आणि आनंदाचे अनमोल क्षण दिले. ह्या माझ्या माहेरी पारिजातकाचे रोप लावणे, हे क्रमप्राप्त. तसेच एक छानसे 4 फूट वाढलेले रोप दोन वर्षांपूर्वी , सहज दर्शनी पडेल,आशा ठिकाणी अत्यंत प्रेमाने भूमातेच्या गर्भात खोचले. त्या बारीक असलेल्या रोपट्याला त्याच्या जवळच एक लांबशी काठी खोचून त्या काठीला हलक्या हाताने बांधून आधार दिला. मग दर वेळेला जायचो,तेव्हा जातीने त्या परिजातकाची निगा राखायचो. खूप जीव होता त्या इवल्याश्या रोपट्यावर.

      मग ह्या वर्षी मार्च महिन्यात, प्रचंड पावसाळ्या पूर्वीचे वादळ आले. मला तिकडचा कारभार बघणाऱ्या अतुल  चा घाबरून फोन आला. "साहेब,ते पारिजातकाचे उंच होत चाललेल्या रोपट्याचे देठ वाऱ्यामुळे तुटलं."

मला खूपच दुःख आणि आत्मक्लेश झाले. काय करू,सुचत नव्हतं. लागेच दुसऱ्या दिवशी गाडी काढली आणि थेट पवना गाठले. पोचता क्षणी त्या जखमी पारिजातकापाशी धावलो. ते देठ तुटून आडवे झाले होते आणि मान टाकली असल्या सारखे निपचित, निर्जीव पडले होते. मनाला खूप यातना झाल्या. 

त्या दुःखातून सावरत होतो, आणि खिन्न मनाने  त्या रोपाला न्याहाळत होतो. आणि एकदम मला,त्याच्या मुळापाशी एक अगदी बारीक पालवी फुटलेली दिसली. हिरवे कोमल देठ असलेली तीन पाने,जी पृथ्वीच्या गर्भातून अजून पूर्णपणे deliver झाली नव्हती. 

ती नाजूक हिरवी गोंडस पालवी केवळ पाने नव्हती. अतिभीषण वादळात सुद्धा जगण्याची जिद्द, उमेद, आणि  आशा होती. इवल्या इवल्याश्या त्या छोट्या पानात प्रचंड survival instinct होती. 

मी अतुल ला बोलावून त्याला सांगितलं, की ही पालवी नक्की जगणार. त्या पालवी भोवती एक भक्कम आढे बनवले,आणि त्याला रोज त्या अर्भकाची प्रगती कळवायला सांगितली. ते रोपटे हळू हळू वाढू लागले. 

आता ते जवळ जवळ 3 फूट उंच झाले होते. 

आज सकाळी कालच्या जोरदार पावसामुळे त्या परिजातकाची काळजी वाटू लागली. 

गाडी काढली पहाटे 5.30 ला आणि पवनाला कूच केली.

    जेमतेम उजाडायला लागत असताना पोचलो. भीत भीत gate उघडून त्या रोपट्यापाशी पळत गेलो. दम लागला होता. रोपटं ठीक दिसत होतं. मी हुश्श करत होतोच, की एकदम माझी नजर एका फांदीवर गेली. त्या फांदीवर, चक्क एक नाजूक,केशरी देठाच्या,पांढऱ्या पाकळ्यांचा अविष्कार दिसला. मी स्तब्ध होऊन बघत राहिलो. मला गहिवरून आले. माझ्या भावना व्यक्त करण्याजोगे शब्द नाहीत. वादळात अहंकाराचे ताठ देठ,मोडेन पण वाकणार नाही,हाच ताठरभाव त्याच्या  जीवावर बेतला.  वादळाला त्या देठाचे अस्तित्व तरी जाणवलं का? वादळाला काहीच फरक पडला नाही. 

पण स्वाभिमाम आणि अस्मितेची ही गोंडस अभिव्यक्ती त्या वादळाला पुरून उरली आणि स्वतःला कित्येक ताकदवान समजणाऱ्या त्या देठाला धूळ चाटावी लागली. 

परमेश्वर मला त्या फुला मार्फत आणि त्या रोपट्याचा माध्यमातून  एक संदेश देत होता. त्या पूर्वीच्या 4 फूट उंच झालेल्या रोपट्यावर कधीच कळ्या आल्या नाहीत.अहंभावाचा शाप स्वतःचा कधीच विसर पडू देत नाही,आणि त्यामध्ये फुलाच्या रुपातली परतत्वाची अभिव्यक्ती कधीच होणे नाही. आपले 'देठ' पण विसरले,तरच आपल्यातील  दैवी फुलाची, परिपकवतेचि, जाणीव  होऊ शकते.

वादळे सगळ्यांच्या आयुष्यात येतात. त्या इवल्याश्या जिवाने मी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवून ते दैवी फूल कृतज्ञाता स्वरूपात माझ्या झोळीत टाकले. मी खूप भारावून गेलो. आयुष्यात कितीही वादळे आली, तरी समोरे जाण्याची ताकद,स्फूर्ती,आणि सकारत्मकतेचा तो जणू दैवी संकेत होता. त्या प्राजक्ताच्या निमित्ताने अनंताच्या रोपावर  ही दोन गोजिरवाणी फुले डुलत होती,आणि रातराणी तर फुलांनी ओसंडून वाहत होती. ती आपल्या लहान भावंडावर खुश होऊन आपल्या परीने त्याचे कौतुक करीत होती.  ते गोंडस फुल अलगदपणे वेचून मनाच्या देव्हाऱ्यात बसलेल्या स्वरूपाला वाहिले आणि त्या रोपट्याने दर्शविलेली चिकाटी, आत्मबळ,आणि धैर्य आपल्या अंगी आत्मसात होण्याची प्रार्थना करत परतीच्या वाटेला लागलो. 


दीपक रानडे.

No comments: