Friday, January 15, 2021

तिन्ही सांजा

 कातर वेळ. 

तिन्ही सांजा, सखे मिळाल्या 

देई वचन तुला


संध्याकाळ मला नेहेमीच त्रासदायक वाटते.

जीवाला हुरहूर लावणारी, थोडी थकलेली, थोडे औदासिन्य, थोडे आत्मपरीक्षण करणारी, का कोणास ठाऊक. आज सकाळी टेकडी चुकली म्हणून संध्याकाळी जाण्याचे ठरवले. 

आकाशात सूर्यास्ताच्या वेळी नारंगी,तांबूस,केशरी,रंगांची उधळण होत होती. तो सोन्याचा गोळा एकाएकी ढगांच्या मागे लपला आणि थोड्याच वेळात क्षितीजाच्या खाली अदृश्य झाला. आणखी एक दिवस लोटला. 

भा. रा. तांबे यांचे गीत गुणगुणत टेकडी उतरत होतो. 

काय प्रतिभावान कवी होते. मराठी भाषेचे सौंदर्य, अभिव्यक्ती,प्रतिभा किती अफाट आहे याचे दर्शन घडविणारे हे गीत.

1902 साली लिहिली गेली होती ही कविता.

मग मला रहावे ना आणि लगेच गूगल सर्च करून ह्या कवितेतले बारकावे जाणून घेतले. 

त्या कवीची प्रतिभा,त्यांचे विचार, त्यांची मांडणी,सर्व काही अद्भुत,विलक्षण आणि ह्रदयस्पर्शी. 


Dr. Deepak Ranade.


खलील  विचार नेटवर मिळालेल्या माहितीवर आधारित आहेत. 


तीनी सांजा सखे मिळाल्या

तीनी सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला

तीनी सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला

आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला

तीनी सांजा सखे मिळाल्या

कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा

चक्रवाल हे पवित्र, ये जी शांत गभीर deep निशा

त्रिलोकगामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा

साक्षी ऐसे अमर करुनी हे तव कर करी धरिला

तीनी सांजा सखे मिळाल्या

नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत

गंध जसा सुमनांत,

रस जसा बघ या द्राक्षांत, पाणी जसे मोत्यांत

मनोहर वर्ण सुवर्णांत,

हृदयीं मी साठवीं तुज तसा जीवित तो मजला

तीनी सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला

तीनी सांजा सखे मिळाल्या

गीत : भास्कर रामचंद्र तांबे १८ जुलै १९०२ | संगीत : हृदयनाथ मंगेशकर | स्वर : लता मंगेशकर |

राग : मिश्र यमन | गीत प्रकार : भावगीत


भा. रा. तांबे हे एक अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानचे ’राजकवी’ होते. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येतं.  तिनि सांजा हे गीत  १९०२ मधलं. म्हणजे ११८ वर्षांपूर्वीचं ! म्हणजे आगदी पहिला मराठी चित्रपट येण्याआधीचं. तो आला १९१३ मध्ये आणि त्यानंतर जेव्हा सिनेमा वयात आला त्यानंतरचं प्रेमी युगुल हे बरचसं चित्रपट प्रभावित. परंतु या गाण्यातील प्रियकर हा त्याही पूर्वीचा. एवढ्या जुन्या काळातलं. या गाण्यातील प्रियकर, आपल्या प्रियेला वचन देतो आहे. तो म्हणतोय,


आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला

तीनी सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला..

तू मला माझ्या जीवा पेक्षा अधिक आहेस. असं वचन मी तुला या संध्याकाळी देतो. तो प्रियकर तिन्हिसांज किंवा संध्याकाळ झाल्यावर असे नाही म्हणत. वेळ जरी संध्याकाळचीच सुचवायची असली तरी त्याला त्याहूनही अधिक काही सुचवायचं असावं. तीनी – सांजा मिळाल्या असे म्हणतो आहे. मराठी शब्द तिनिसांज आणि तिहिसांज मिळून बोली भाषेत तिन्हीसांज असा झाला असावा कदाचित. दोन्हीचा अर्थ संध्याकाळ. संस्कृतमध्ये संध्या-काल. किंवा दिवस आणि रात्र यांचा संधि काल. पण तांबे तिनि सांजा असं म्हणतात. आणि त्या देखील मिळाल्या असं म्हणतात. आणि आशावेळी हा प्रियकर त्याच्या सखीला हे वचन देतो आहे. पहिली सांज उन्हे उतरू लागल्यावर होते, दुसरी सूर्य मावळल्यावर, तर संधिप्रकाशाची वेळ म्हणजे तिसरी सांज. अशा तीनही सांजा मिळण्याची वेळ, म्हणजे मधली सांज, अर्थात सूर्य मावळतानाची. ही तीनही सांजा मिळण्याची वेळ, संधिकाल अर्थात बोली भाषेत संध्याकाळ. संध्याकाळ ही प्रेमी युगुलांची आवडती वेळ. कुणी लांबून पहिलं तर ओळखू येणार नाही पण एकमेकांना मात्र दोघेही स्वच्छ पाहू शकतात, नाही का? म्हणून आवडती. प्रेम विव्हल करणारी, हळवेली वेळ. अशा वेळी प्रेमी युगुलांच्या आणाभाका चालतात.

ही कविता ही अशीच एक आणाभाकेची, प्रेयसीला वचन देणारी. ही कविता १९०२ मधली तर तांबे यांचा जन्म, ऑक्टोबर २७, १८७३ चा. म्हणजे वय २९ वर्षे. पाहिल्याच कडव्यात आलेल्या “आजपासूनी” या शब्दामुळे कवितेखालच्या तारखेला महत्व येते. जे (फार थोडे कवि) आपल्या कवितेखाली तारीख लिहितात त्यापैकी राजकवी तांबे हे एक.  १८९७ मध्ये त्यांचा विवाह वारुबाई जावडेकर यांच्याशी झाला, १९३७ मध्ये “ग्वाल्हेरचे राजकवी” हा बहुमान त्यांना मिळाला आणी साधारण १९०० साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला, ही माहिती मिळाली. 

नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत

गंध जसा सुमनांत,

रस जसा बघ या द्राक्षांत, पाणी जसे मोत्यांत

मनोहर वर्ण सुवर्णांत,


तर, या कडव्यातून ते सांगतात, ‘हृदयीं मी साठवीं तुज तसा, जीवित तो मजला’. जीवित म्हणजे जिवाचाच भाग, माझ्या जीवात, आत्म्यात, वेगळा न काढता येण्या इतका अंगभूत. बासरी मध्ये नाद, काव्यात काव्यरस, फुलांत गंध, द्राक्षात रस, मोत्यात पाणी, तर सुवर्णाचा सोनेरी रंग या अंगभूत गोष्टी आहेत. त्या त्यांच्यापासून वेगळ्या काढल्या तर त्यांचे स्वरूपच नष्ट होईल. 


कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा

चक्रवाल हे पवित्र, ये जी शांत गभीर निशा

त्रिलोकगामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा

साक्षी ऐसे अमर करुनी हे तव कर करी धरिला


मरिचिमाली म्हणजे सूर्य, कनक म्हणजे सोने, चक्रवाल म्हणजे क्षितिज.  त्रिलोकगामी म्हणजे तिन्ही लोकात संचार करणारा मारुत, म्हणजे वारा, तसंच निर्मल दाही दिशा. या सार्‍यांना स्मरून मी तुझा हात हाती घेतला आहे. या सार्‍या वर्णीलेल्या गोष्टी चिरंतन आहेत.

 या कवितेतील “सखे” हे संबोधन आपल्या प्रतिभेला उद्देशून उच्चारलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. निसर्गातील चिरंतन घटनांना साक्षी ठेवून, संध्याकाळसारख्या, जणू प्रेमीयुगुलांनी आणा-भाका घ्याव्यात यासाठीच घडत असलेल्या हळव्या, अंतरिक, अशा चिरंतन घटने समयी, कवीने आपल्या प्रतिभेला “आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला” असे म्हणणे अधिक समर्पक वाटते.

No comments: