Friday, January 15, 2021

निरपेक्ष

 निरपेक्ष.

खूपच वजनदार शब्द. 'अपेक्षा,ही सर्व दुःखांची जड असते' किंवा' प्रेम निरपेक्ष असावे', 'आई वडिलांचे प्रेम खरे निरपेक्ष'. निरपेक्षते बद्दल प्रचंड आदर आणि कुतूहल बाळगून होतो मनात. खरी निरपेक्ष कृती,प्रेम, असते का? 

  भगवद्गीतेत खुद्द परमेश्वराचा उपदेश. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहणे. काय उदात्त विचार आणि तत्वज्ञान आहे. अपेक्षा न ठेवता खरच आपण काम करू शकतो का? म्हणजे उद्दिष्ट किंवा लक्ष  ठेवून काम करणे ह्या ब्रह्मस्त्याचे उल्लंघन करण्याजोगेच आहे. 

अपेक्षा ठेवणे. मग ती आपण केलेल्या कामात यश मिळण्याची,असो,किंवा केलेल्या कामाचे कौतुक होण्याची, नाही म्हणता निदान कृतज्ञतेची. अपेक्षा. 

गेल्या बाजरी,ज्या व्यक्ती करता आपण काही केले असेल,त्याची कमीत कमी त्या व्यक्ती कडून निदान जाणीव तरी असवी? ही एक मूलभूत अपेक्षाच. 

        ह्या लोकडोउन च्या काळात अनेक प्रकारचे अनुभव,अनुभूती झाल्या. ह्या काळात, खरे निरपेक्ष कृत्य करण्याचा योग देखील साधला.

त्याचे असे झाले. 

माझी विद्यार्थी मंडळी opd सांभाळायची. कॉम्प्लिकेटेड केसेस चे mri, अथवा ct स्कॅन मला व्हाट्सअप्प वर पाठवायचे. मग मी त्यांना त्या केस बद्दल पुढील मार्गदर्शन करायचो. अशाच एका केस चे स्कॅन मला पाठवले. एका 65 वर्षाच्या बाईंची केस.मणक्यातली उशी सरकली होती आणि ह्या बाईंना एक पाऊल देखील ठेवणे म्हणजे अशक्य होतं होते. प्रचंड वेदना होत होत्या आणि त्यांना झोपून राहण्या शिवाय पर्याय उरला नव्हता.

तिला शस्त्रक्रियेशिवाय काहीच पर्याय नव्हता.

तिला लगेच दुसऱ्या दिवशी पोस्ट करायला सांगितले.

   दुसऱ्या दिवशी,मी 10 ला ot मध्ये पोचेपर्यंत माझ्या विद्यार्थ्यांनी पेशंटला पोझिशन देऊन पेंटिंग, ड्रेपिंग करून  सर्व तयारी केली होती. मी प्रत्येक केस करण्यापूर्वी नतलगांसोबत पूर्ण माहिती देऊन,counselling करून मगच ऑपरेशनला घेतो. पण या covid काळात  शक्य तो कमीत कमी लोकांशी संपर्क ठेवणे उचित असल्यामुळे मी ह्या केस मध्ये कोणाशीही काहीही न बोलता थेट शस्त्रक्रिया करणार होतो.

थोडी किचकट,पण अत्यन्त समाधान कारक अशी 2 तास ही शस्त्रक्रिया करून,त्या दबलेल्या नसेला पूर्ण रिलॅक्स केले. मग माझे काम झाल्यावर,विद्यार्थ्यांनी उरलेले closure केले आणि रुग्णाला post op वॉर्ड मध्ये शिफ्ट केले.

मी त्या पेशंटला पहिलेच नव्हते. Covid मुले, फक्त क्रिटिकल केसेस बघत होतो.

आठवडा गेला,आणि ततपश्चात मी ऑफिस मध्ये बसलो होतो. एक गृहस्थ बाजूला opd मध्ये वाद घालत होते.जरा आवाज चढल्यामुळे मी आवाज देऊन माझ्या विद्यार्थ्याला बोलावले. तो आला आणि म्हणाला,

"सर,त्या 65 वर्षाच्या बाईचा,जिचे मणक्याचे ओपरेशन गेल्या आठवड्यात केले होते,त्यांचा हा जावई. 

त्या बाई पूर्ण बऱ्या झाल्या आहेत,चालतात फिरतात,आणि काहीच प्रॉब्लेम नाहीये."

मग आरडाओरडा कशापायी? मी विचारले.

"त्या बाईंना ऑपरेशन झाल्यापासून शौचाला झाले नाही आणि त्याचे म्हणणे आहे,की हा त्रास ऑपरेशन मुळेच झाला आहे. त्यांना ऑपरेशन केलेल्या डॉकटर ना भेटायचे आहे.

मी त्या बाईला किंवा त्या जावयाला ओळखत नव्हतो.

मी त्यांना माझया कबिन मध्ये बोलावले.

त्यांना नीट समजावून सांगितले,की ऑपरेशन खूप छान झाले आहे. ऑपरेशन करणारे डॉकटर रजेवर आहेत. 

मला तुम्हाला झालेल्या गैरसोयीची जाणीव आहे. त्यासाठी मी तुम्हाला औषध लिहून देतो. त्या दोन दिवसात ठीक होतील.' 

त्यांना मी पोट साफ होण्याची गोळी लिहून दिली.त्या बाईंचे दर्शन झाले. एकदम व्यवस्थित चालत होत्या. 

          आपण केलेल्या शस्त्रक्रिये बद्दल ही व्यक्ती पूर्ण अनभिज्ञ होती. माझे नाव देखील माहीत होते का तिला? ठाऊक नाही. काही व्यक्ती,काही नाती,काही ऋणानुबंध हे अपेक्षेच्या दायऱ्यातून मोकळी करायला लागतात. कदाचित,गेल्या जन्मातील ऋणांची परतफेड असेच ह्या देण्याचे वर्गीकरण करून साफ विसरून जाणे. मनाला असे समजावून सांगितले,की मग ते मन उगाच छळत नाही. सुटसुटीतपणा ठेवला,तर मनस्ताप होत नाही. 

कुठल्याच नात्यात खरी निरपेक्षता असणे हे केवळ शाब्दिक किंवा बौद्धिक स्तरावर शक्य आहे. 

मनुष्य प्राणी, स्वतःच्या स्वार्थाचा सर्वप्रथम विचार करतो, आणि त्याचे वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. सगळीच नाती, ही परस्परातील स्वार्थ साधण्यावर अवलंबून असतात. नात्याची कालावधी स्वार्थाच्या अधीन असते. स्वार्थ संपला,की नाते तसे संपतेच. औपचारिकता आणि सौजन्याच्या धाग्यादोऱ्यांवर लोम्बकाळत कसेबसे फरफटत जाणाऱ्या नात्याला काय अर्थ?

मागच्या जन्माचे काही ऋण असणार ह्या बाईंचे माझ्यावर. ते ऋण उतरवण्याची संधी देवाने दिली.

त्याचे शतशः आभार मानत मी त्या दोघांचा निरोप घेतला.


डॉ दीपक रानडे.

No comments: