Sunday, November 7, 2021

कभी खुद पे कभी हालात पे

 'कभी खुद् पे कभी हालात पे रोना आया'


     एका 11 वर्षाच्या मुलाचा बाप समोर येऊन बसला होता. त्याच्या मुलाची मान जन्मताच एका बाजूला वळलेली होती. आता तो 11 वर्षाचा होता तो आणि अलीकडे त्या मुलाला चालायला आणि पळायला त्रास व्हायला लागला होता. तो बाप बर्याच लांबुन आला होता मला भेटायला. बरोबर मुलाचे CT स्कॅन घेऊन आला होता.

  CT स्कॅन बघितल्यावर लक्षात आले की त्याच्या मुलाला एक फार विचित्र craniovertebral junction वैगुण्य होते. मानेच्या नंबर 2 मणक्याचा दाता सारखा एक खुंट,ज्यावर पहिला मणका आणि डोके फिरते, वर  सरकला होता आणि माने मधल्या मज्जातंतूंवर दाब देत होता. कवटी मधून spinal cord मणक्यात उतरतो,तिथेच तो खूप जास्त प्रमाणात चेपला गेला होता. त्या बाळाची मान खरच खूप अवघड परिस्थितीत होती. 

     मी त्याला ट्रीटमेंट बद्दल थोडे फार समजवून सांगितले आणि थोडी जुजबी चौकशी केली. तो बाप गॅरेज मध्ये कामाला होता. आर्थिक दृष्ट्या खूपच हालाकि परिस्थिती होती. मी त्याला धीर दिला आणि सांगितले की ट्रीटमेंट क्लिष्ट आणि ऑपरेशन धोक्याचे आहे. 

     पुढच्या प्रश्नांची उत्तरे त्या बापाला देता येत नव्हती. तो हुंदके देत होता. त्या बापाची त्याच्या मुला करता काळजी,धडपड,जाणवत होती. त्याची ती अवस्था बघून माझे डोळे सुद्धा पाणावले. 

   आशा,अडचणीच्या केसेस ट्रीट करताना डॉक्टर असल्याचा शाप जाणवतो. परिस्थिती आपल्या हाताबाहेर आहे,हे लक्षात येते,पण सर्व क्षेम आहे,आशा अविर्भावात आपल्या भावना,भीती,हतबलता दडवून, पुढचे पाऊल उचलायचे. हृदयात भावनांचा कल्लोळ चालू असतो,कधी कधी हृदय पिळवटून जाते. विशेष करून,तरुण पेशंटना काही जीव घेणा आजार असल्यास, त्यांच्या पालकांच्या जीवाची घालमेल,बघवत नाही. वैद्यकीय शास्त्राच्या अभ्यास करता करता या शास्त्राच्या मर्यादा देखील माहिती असतात. त्या मर्यादांनी आपले हात बांधून टाकलेले असतात,आणि तरी देखील समोर बसलेल्या रुग्णनातेवाईकांना मोठ्या आत्मविश्वासाने धीर द्यायचा. आशा वेळी रफीचे ते अजरामर गाणे मनाच्या रेकॉर्ड प्लेयर वर वाजू लागते.

     "कभी खुद् पे कभी हालात पे रोना आया"

आपल्याला ठाऊक असते,पुढचे चित्र स्पष्ट दिसत असते,आणि तरी,त्या विव्हलणार्या नातलगांची समजूत काढायची.

एका मुलाखतीत नुकतेच मला हा सतत भेडसावणारा प्रश्न विचारला गेला होता. पेशंटला ट्रीटमेंट करताना तुम्ही भावनिक दृष्ट्या त्या केस मध्ये अडकता का? 

     Natgeo च्या एका प्रसिद्ध wildlife फोटोग्राफर ची काही वर्षांपूर्वी पाहिलेली मुलाखत आठवली. हा फोटोग्राफर केनिया मध्ये फोटोग्राफी करीत होता. जीप गाडीतून खोल जंगलात वाट काढत असताना,त्याला एकदम एका झाडाखाली एक नवजात हरणाचे पिल्लू दिसले. त्या पिल्लाची आईपासून फारकत झाली असावी. त्या पिल्लाला काहीच उमगत नव्हते. सैरभैर अवस्थेत,ते इकडे तिकडे चाचपडत फिरत होते. आणि मग थोड्या अंतरावर त्या फोटोग्राफर ला झुडपात एक चित्ता दिसला. पुढचे चित्र अगदी स्पष्ट दिसत होते. त्या नवजात हरिणाच्या पिल्लाचे काहीच क्षण आयुष्य उरले होते हे उघड होते. त्या फोटोग्राफर च्या मनाची अवस्था आणि घालमेल कमालीची होती. एक मन त्याला सांगत होते,पटकन त्या बछड्याला उचलून जीप मध्ये घेऊन सुरक्षित ठिकाणी पोचवावे. दुसरे मन सांगत होते की निसर्गाच्या,नियतीच्या नियमांचे उल्लंघन करू नये. फोटोग्राफर आणि फोटोग्राफी, ही बघ्याची भूमिका घेणे.

 अत्यन्त जड अंतःकरणाने तो तिथून काहीही न करता पुढचे सारे अनिवार्य प्रसंग कॅमेरा मध्ये टिपतो. प्रथम दर्शनी ह्या गृहस्थाला पाषाण हृदयी,असंवेदनशील,क्रूर असे समजू शकतो,पण थोडा खोलवर विचार करता, त्यानी त्याच्या भावनांवर अंकुश ठेवत, त्याचे काम चालू ठेवले. तसे केले नाही,तर रफी साहेबांच्या गाण्यातल्या पुढल्या ओळी सारखी अवस्था व्हायची. 


बात निकली तो,हर इक बात पे रोना आया...........


भावनावंश होऊन काहीच साध्य होत नसते. संवेदनशीलता ही कर्तव्यदक्षते मध्ये कधीच अडथळा बनु  नये. त्या कर्त्याकरवित्याच्या मनात काय आहे,कोणास ठाऊक आणि त्याने जसे निर्मिले, ते आपण स्वीकारून त्याची कारण मिमौंसा न करता, जमेल तसे आपले कर्म करीत रहाणे,हाच उचित मार्ग. दया, सहृदयता, करुणा, ह्या भावना जर आपल्याला कमजोर करणार असल्या,तर त्यांना चार हात लांब ठेवलेलेच बरे.

तो बाप त्या मुलाला ऍडमिट करायला घेऊन येणार आहे दोन दिवसात. सगळ्या भावना आवरून मनाच्या  कुठेल्यातरी खोल कपारीत पुरून टाकायच्या आणि कामाला लागायचे.


Dr Deepak Ranade.

No comments: