Sunday, November 7, 2021

श्रद्धास्थान

 श्रद्धास्थान


रुग्णाच्या नातेवाईकांबरोबर संवाद साधणे,हे सर्जनचे शस्त्रक्रियेच्या अगोदरचे एक महत्वाचे काम असते. 

मेंदूची शस्त्रक्रिया,म्हणजे सर्व नातेवाईकांची चांगलीच तंतरलेली असते. 

आमच्या पेशंटला ऑपरेशन नंतर नॉर्मल आयुष्य जगता येईल का? ऑपरेशन नंतर शुद्धीत यायला कितीवेळ लागेल? ऑपरेशन करण्यात किती धोका आहे?

ऑपरेशन यशस्वी होण्याची काय गॅरंटी आहे? 

अनेक प्रश्न. काहींची उत्तरे देऊ शकतो,काहींची उत्तरे देणे अशक्य. गॅरंटी वगरे मुद्दे काढले,की मग,मी शांतपणे त्यांनाच उलट प्रश विचारतो.

" मी उद्या सकाळी जिवंत असून, ऑपरेशन करायला वेळेत पोचेन, याची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का?"

प्रश्न विचारणाऱ्या व्यक्ती एकाएकी शांत होतात. गॅरंटी. पुढच्या श्वासाची शाश्वती नसताना, मग 5 तास चालणाऱ्या, मेंदूच्या अवघड ठिकाणी असलेल्या गाठ काढण्याच्या ऑपरेशनची गॅरंटी देणारा मी कोण? 

मी देव,हा anthropological (व्यक्तिसापेक्ष,सगुण साकार) असल्याचे मानत नाही. व्यक्तिसापेक्ष देव म्हंटला,की मग त्या देवाला खुश ठेवणे,त्याला आमीष दाखवून,सौदेबाजी करणे, तो शब्द न पाळल्यास त्याचा कोप होणे, हे सारे ओघाओघाने आलेच.

काही नातेवाईक ऑपरेशनच्या दिवशी कडक उपास करतात, नवस बोलतात,अखंड जप चालू ठेवतात. 

परमेशवर हा खरोखर इतका अहंकारी असेल का? श्रद्धा म्हणजे त्या व्यक्तिसापेक्ष देवाला खुश ठेवणे, त्या देवाचा अखंड जप करणे, असेच का? 

कदाचित, हा सारा खटाटोप मनाला शांत ठेवण्यास उपयोगी पडत असेल. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक आशेचे निरंजन तेवत ठेवायचे. 

श्रद्धा,ही कुठल्यातरी ठोस व्यक्तिसापेक्ष देवावर असल्यास,त्या दैवताशी संभाषण साधता येते. हट्ट करता येतो. मनातील इच्छा बिनधास्तपणे व्यक्त करता येतात. 

   मी ऑपरेशन सुरू करायच्या अगोदर hands scrub करताना मनात एक छोटीशी प्रार्थना म्हणतो.

माझ्या हातात नसलेल्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणारी ती अधिभौतिक शक्ती, त्या शक्तीला अभिवादन करतो. त्या शक्तीला माझ्या हातावर वास करण्यासाठी आमंत्रित करतो. ती अज्ञात शक्ती,माझ्या कल्पनेच्या पलीकडची आहे, याची जाणीव असते. मी सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेऊ शकतो, ऑपरेशन 100 टक्के यशस्वी करणे हे सर्वस्वी माझ्या हातात असण्याचा उन्मत्त फाजील अहंकार न बाळगणे, हे ऑपरेशन चांगले होण्यासाठी खूप महत्वाचे. 

माझ्या दृष्टीने श्रद्धा ही माणसाचा अहंकारावर अंकुश ठेवण्याचे एक अमौलीक साधन. केवळ स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर आत्मविश्वास बरेच वेळा घातक ठरू शकतो. 

माझी श्रद्धा,-  मी चूक करू शकतो , माझ्या हाता बाहेर बऱ्याच गोष्टी असतात, याचा भान राखणे. ऑपरेशन करण्यापूर्वी थोडी भीती असतेच. ही भीती देखील श्रद्धेचीच अभिव्यक्ती असते. अनेकदा, ओव्हरकॉन्फिडेन्स मुळे, अडचणीत सापडलेले,पाहण्यात आहेत. श्रद्धा म्हणजे कुठेतरी नतमस्तक होणे. नतमस्तक कोणाला होता,हे महत्वाचे नसते. शस्त्रक्रिया करताना प्रत्येक स्टेप ही केवळ माझ्या बुद्धीतून ठरवली जात नसते. बरेचदा, instinct च्या आधारे,शस्त्रक्रियेतील काही भाग करावा लागतो. एखाद्या महत्वाच्या रक्तवाहिनी जवळ चिकटलेली गाठ सोडवताना नकळत देवाचे नाव ओठांवर आपोआप तरंगायला लागणे, ही श्रद्धा. ऐन वेळेला सुचलेली एखादी स्टेप, विशिष्ट ठिकाणी ठराविक instrument वापरण्याचा निर्णय,आकस्मित होणारा रक्तस्राव काबूत आणण्यासाठी ती रक्तवाहिनी अचूकपणे coagulate करता येणे,आणि हे सर्व करीत असताना, भूलतज्ञानकडून रक्त दाब, ऑक्सिजन saturation व्यवस्थित नियंत्रित होणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे. असल्या  बऱ्याच गोष्टी जेव्हा व्यवस्थित घडतात, आणि रुग्ण बरा होतो,नातलग मनपूर्वक आभार प्रदर्शन करतात. आशा वेळी, ती  शस्त्रक्रिया यशस्वी होण्यामागे त्या अज्ञात शक्तीचे समरण करून, काहीही अनपेक्षित अघटित घडले नाही, यासाठी त्या शक्तीचे आभार मानून, नम्रपणे त्यांचे कौतुक कबूल करणे,म्हणजे श्रद्धा. 

आयुष्यात काही कडक नास्तिक मंडळी सुद्धा भेटली. त्या व्यक्तींच्या अविर्भावातून, आपण नेहेमीच बरोबर असतो, एक कुत्सित self righteousness त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवतो. ही मंडळी बरीच यशस्वी सुद्धा असतात. त्यांच्या यशाचा,त्यांच्या गुणांचा त्यांना सार्थ अभिमान असतो.  त्यांच्या वागणुकीत,"आपल्या हातून कधीच चुका होऊ शकत नाही" चा दर्प असतो. 

त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिल्यास, ते मोठ्या शिताफीने,त्यांची बाजू मांडतात आणि आपणच कसे बरोबर होतो,हे पुनःश्च सिद्ध करतात. असल्या मंडळींच्या बद्दल नेहेमीच कुतूहल वाटते. They wear an armour of infallibility. अचूकतेचे कवच. 

ह्यांना कुठलेतरी श्रद्धास्थान असते का? ह्यांना त्यांच्या चुका समजतच नाहीत का?  की त्या समजल्या,तरी कबूल करण्याचा मोठेपणा नसतोच? नाही मला या प्रश्नाचे उत्तर सापडले अजून. चुकलेल्या निर्णयामुळे, चुकलेल्या वागणुकीमुळे झालेले नुकसान पेलण्याचे सामर्थ्य असते या मंडळींमध्ये. कोणाचेच कोणा वाचून अडत नसते,हे तर ब्रह्मसत्य आहेच. त्यामुळे असल्या मंडळींचे आयुष्य अगदि व्यवस्थित चालू राहते. 

आपल्याकडे त्रयस्थपणे बघणे,ही श्रद्धा. आपल्या वागणुकीत किंवा बोलण्याने जवळचे दुखवले जाऊ शकतात, ही जाणीव म्हणजे श्रद्धा. 

श्रद्धा,म्हणजे केवळ कुठल्या दैवतावर असलेला दृढ विश्वास नाही. श्रद्धा म्हणजे,आपण परफेक्ट नाही,आपल्या हातून सुद्धा चुका होऊ शकतात, ही जाणीव. श्रद्धा म्हणजे माणसाला माणूस असण्याची  असलेली जाणीव.श्रद्धा म्हणजे  माणसाचा माणुसकीत असलेला विश्वास. 


Dr Deepak Ranade.

No comments: