Sunday, November 7, 2021

रीसेट बटन

 रीसेट बटण


मोबाईल वर सकाळपासून काम करत होतो. प्रेझेंटेशन करायचे होते डिपार्टमेंटचे. स्लाइड्सवर काम चालू होते. आणि एकाएकी मोबाईल  हँग झाला. काही केल्या डिस्प्ले वर काहीच दिसत नव्हते. सर्व करून पाहिले. फोन स्वीचऑफ करून पाहिले,पण काहीच केल्या तो चालू होईना. 

शेवटी एका मित्राला विचारले आणि त्याच्या सल्ल्याने "रीसेट टू कंपनी सेटिंग" बटन दाबले. 

बराच डेटा डिलीट झाला. पण त्याला पर्याय नव्हता. फोन चालू करायचा तर स्टोर केलेला सर्व डेटा साफ होणार होता. पुन्हा पहिल्यापासून  प्रेझेंटेशन वर काम सुरू केले.

जेमतेम काम उरकले आणि हॉस्पिटल मध्ये निघालो. 

गाडीत विचार करत होतो. 

मोबाईल मध्ल्या डिलीट केलेल्या डेटा बद्दल आणि रीसेट बटणाबद्दल. डेटा गेला,पण तो किती गरजेचा होता? 

डिलीट झाल्यामुळे माझे नेमके किती नुकसान झाले? पाच सहाशे फोटो, कॉन्टॅक्टस, काही फाइल्स, आशा स्वरूपचा डेटा. ई-मेल तर सर्व क्लाऊड वर होते, बरेच फोटो देखील क्लाऊड वर synch झाले होते. 

     रीसेट बटणाने मोबाइल पुन्हा नव्याने चालू झाला. 

आयुष्यात सुद्धा काही वळणावर रीसेट बटण दाबावे लागते. आपल्या भावना,आठवणी,आवडी -निवडी,जवळच्या व्यक्ती, सर्व डेटा साठलेला असतो. काही परिस्थितींमुळे समीकरणे बदलतात आणि लक्षात येते,की डेटा corrupt झाला आहे,आणि मन हँग होते. 

काहीच केल्या मनाची हार्ड डिस्क काम करायचे बंद करते. 

'रीसेट टू कंपनी सेटिंग" चे बटण दाबावे लागते. 

सर्व डेटा डिलीट करावा लागतो. क्लेश होतात. 

काही डेटा जो क्लाउड वर sync केलेला असतो,तो retrieve करता येतो. 

रीसेट बटण दाबून टाकायचे बिनधास्त. जोपासून ठेवलेला डेटा अनावश्यक आहे, हे डिलीट केल्यावर जाणवते. कारण काहीच अडत नाही आणि उलटे, आयुष्य जास्त सुटसुटीत होते. 

रीसेट बटण दाबायला थोडे मन घट्ट करावे लागतेच.

डेटा कुरवाळायची सवय लागलेली असते. डेटा डिलीट झल्यावर थोडा वेळ, हार्ड डिस्क रिकामी रहाते. 

हार्ड डिस्कवर डेटा नाही??अरे बापरे. मग काय करू? मनाची हार्ड डिस्क रिकामी राहूच शकत नाही.

Corrupted डेटा असला तरी चालेल, पण डेटा हवाच. 

हार्ड डिस्क रिक्त करायला थोडे धारिष्ट,थोडा कठोरपणा,थोडी निर्दयता लागते. पण हँग झालेल्या मनाला पुन्हा चालू करायचे असेल,तर रीसेट बटणाला दाबावे लागतेच. रीसेट बटण दाबले,की डेटा गेला,तरी त्या जुन्या पुरण्या डेटावर आधारित दृष्टिकोन,अभिप्राय,नाती,आभास,सर्व काही डिलीट होतात. नवा गडी,नवा राज. क्लाऊड वर बॅकअप केलेला डेटा सुद्धा रिस्टोर करताना खूप विचार करून करावा. 

काही क्लाऊडवरचा डेटा सुद्धा डिलीट करावा लागतो. उगाच भावना प्रधान न होता, विवेक बुद्धी वापरून सिलेक्टिव्ह डेटा रिस्टोर करावा.

मोबाईल ची स्पीड वाढते, तसे मन सुध्दा चपळ होते. उगाच corrupted डेटा मध्ये रेंगाळत बसत नाही. 

चला तर मग. 1,2,3........

"रीसेट टू कंपनी सेटिंग."


Dr Deepak Ranade

No comments: