अठरावा हत्ती.
आयुष्यात आत्ता पर्यंत केलेल्या प्रवासाचा मागोवा घेण्याची संधी मिळाली परवा. पवना धरणाच्या किनाऱ्यावर निसर्गाच्या कुशीत एक छोटेखानी टुमदार घरटे बांधले होते. तिथे डेकवर पहाटे बसल्यावर समोरच पौर्णिमेचा चंद्र क्षितिजात बघता बघता विरघळून जात होता. बागेतल्या रातराणीचा गंध मावळता चंद्र आपल्या सोबतच घेऊन जात होता. पक्षांचा किलबिलाट नुकताच सुरु झाला होता. वातावरण खूपच प्रसन्न आणि चिंतनास पूरक होतं.
आपल्या आयुष्यात भेटलेली माणसे, व्यक्ती, वेगवेगळे प्रसंग, आजपर्यंत केलेली वाटचाल, सारे काही मनाच्या पडद्यावर एखाद्या चित्रपटासारखे उलगडत होते.
गेल्या 20 वर्षात आयुष्यातले बरेच ऋणानुबंध अनपेक्षितपणे, अकस्मित, एकाएकी तुटले. मनात कुठेतरी खोल, त्या मृत नात्यांच्या अस्ति पुरून टाकल्या होत्या. व्यक्ती गेल्यावर जरी अस्ति विसर्जन केले तरी आठवणींचा भार आयुष्यभर पेलावा लागतोच. तसेच काहीसे नात्यांचे असते.
मेरा कुछ सामान........ तुम्हारे पास पडा है......
खूप जास्त सामान घेऊन मनावरचे ओझे आता पेलेनासे झाले होते.
त्या समानत सर्वात जास्त वजन होते "असे का झाले?"
"ती व्यक्ती माझ्याबरोबर अशी का वागली?"
ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आलीच कशाला?
माझे काही चुकले का? माझा रागीट स्वभाव तर या साऱ्याला जवाबदार आहे का?" शास्त्र शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे कार्यकारण भावावर असीम श्रद्धा. पण सर्व प्रयत्नाती उत्तरे काहीच हाती लागेना.
या असल्या वांझोट्या विचारांच्या बोज्याने मन पूर्ण दबून गेले होते. उत्तर न सापडणाऱ्या प्रश्नांचा पाठलाग करणे, हे सगळ्यात वाईट व्यसन. मी पूर्वी व्यसनाधीन होतो. त्या मद्याच्या व्यसनावर विजय मिळवला होता. पण निरर्थक प्रश्न आणि न सापडणारी उत्तरे या मानसिक क्रिडेच्या व्यसनातून काही मुक्ती नव्हती.
आणि एकाएकी, काही दिवसांपूर्वी वाचलेली एक गोष्ट मनात डोकावली. 18 व्या हत्तीची गोष्ट.
एक राजा होता आणि त्याला 3 पुत्रे होती. त्याच्या देहांतांची वेळ जवळ आली तसें त्यांनी आपल्या संपत्तीची वाटणी करायचे ठरविले. त्याच्या राज्याची, खजिन्याची, सर्वांची वाटणी एका विशिष्ट प्रमाणात करावयाचे होते त्याला.
ज्येष्ठ पुत्राला निम्मा वाटा, मधल्या पुत्राला एक त्रितीउंश आणि कनिष्ठ पुत्राला एक नवमाउंश भाग देण्याचे राजाने ठरविले होते. कालांतराने राजाचा देहांत होतो आणि पुत्रांना त्यांच्या हक्काची वाटणी द्यायची वेळ येते.
सर्व वाटण्या ठीक झाल्या. पण एक मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. राजाचे लाडके 17 हत्ती होते. त्यांची वाटणी ठरवलेल्या प्रमाणात कशी करायची?
कोणालाच काही मार्ग सुचेना. खूप तर्क वितर्क करून देखील हा प्रश्न काही केल्या सुटेना.
शेवटी, गावाच्या वेशीवर राहत असलेल्या एका अत्यंत बुद्धिमान ऋषीची मदत घ्यायचे ठरले. तिन्ही राजपुत्र आणि राजाचे विश्वासू 2 सरदार त्या ऋषीकडे गेले आणि सर्व परिस्थिती समजावून सांगितली.
ऋषीनी त्यांची अडचण समजून घेतली आणि थोड्या विचारांती त्यांना ते 17 हत्ती घेऊन बोलावले.
दुसऱ्या दिवशी ते 17 हत्ती आणि ते राजपुत्र त्या रिशिंच्या घरी पोचले.
त्या ऋषीनी त्यांना थांबवून ठेऊन घरामागे असलेला त्यांचा स्वतःचा एक हत्ती घेऊन आले.
त्यांच्या हत्तीला त्या 17 हत्तीच्या कळपात मिसळून टाकले. आता हत्तीची संख्या अठरा झाली.
मग त्यातील निम्मे म्हणजे 9, मोठ्या राजपूत्राला, एक त्रितिउंश म्हणजेच 6 मधल्या राजपूत्राला, सर्वात धाकट्या राजपूत्राला एक नवमाउंश म्हणजेच 2. एकूण सतरा हत्ती देऊन टाकले. आता उरला होता एकच हत्ती जो ऋषीचा होता. त्या हत्तीला परत घरा मागे नेऊन बांधले आणि त्या मंडळींना निरोप दिला. हत्तीच्या.......
अठरावा हत्ती.
म्हंटलं तर हिशोब करताना त्याची गरज होती. पण हिशोब संपल्यावर कुठेही वाटणीचा भाग न होता, त्रयस्थाप्रमाणे बाजूला झाला.
आणि हीच गोष्ट का मनात आली हे एकाएकी स्पष्ट झाले. आपल्या सर्वांच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात असेच अठरावा हत्ती असणाऱ्या व्यक्ती येतात.
आयुष्याचे, आपल्या भोगाचे, न सुटणाऱ्या गणितातल्या गोळा बेरीज, वजाबाकी, सहजतेने सोडवणारे. आयुष्याचे वर्तुळ पूर्ण करणारे. गणित सुटल्यावर, हिशोब चोख बजावल्यावर,त्यांचे काम संपते आणि ते आपल्या मार्गी निघून जातात. तेवढेच तीळ -तांदूळ घेऊन आलेले ते सहाप्रवासी. कधी गाडी थांबली आणि कधी ती व्यक्ती उतरली, हे समजण्याच्या आताच पसार.
का, कसे, कधी ह्या प्रश्नांची उत्तरे न देता आणि कुठलाही प्रश्न न विचारता. आपली तर्कप्रज्ञा ह्या नियतीच्या खेळपुढे लोटांगण घालते.
बालपणीतला एखादा अगदीच निरागस पण भेडसावणारा प्रश्न विचारून आपण आईला छळतो. ज्या प्रश्नाची उत्तरे आईला सुद्धा माहित नसतात. ती वैतागून शेवटी उत्तर देते......
" हो. देवाने तसें केले म्हणून "
असेच उत्तर देऊन मनाची समजूत घालावी लागते.
आपल्या कर्माचे गणितच आपल्याला तरी कुठे माहित असते. ते सोडवणे दूरच राहिले.
अठरावा हत्ती या संकल्पनेने मन एक्दम हलके झाल्यासारखे वाटत होते. म्हंटले तर तो सहभागी झाला, पण खरे पाहता, केवळ एका आकड्याला पूर्णत्वाचा संभ्रम निर्माण करून नाहीसा झाला. आपले आयुष्य हा देखील सर्वात मोठा भ्रम आहे. त्या अपूर्णतेच्या भ्रमात पूर्णत्वाचा भ्रम निर्माण करणाऱ्या व्यक्ती. कोडे थोडेसे उलगडू लागले होते.
अठराव्या हत्तीची किमया काही औरच. खरोखरीच निर्लेप, कुठेच न गुंतून, तरीही सर्वात अवघड आणि क्लिष्ट गणित सोडवून,होतो की नव्हतो असे वागून आपल्या मार्गी चालू पडतो. आपण सुद्धा अनेकांच्या आयुष्यात अठरावा हत्ती होतो हे जाणवले. दुसऱ्याच्या आयुष्यात आपण का आलो, या प्रश्नाचे उत्तर सापडले.
कर्मिक गणिते सोडवण्यासाठी. कर्मिक हिशोब चुकवण्यासाठी. आणि गणित या विषयाला भावना नसतात. फक्त आकडेमोड असते.
अठराव्या हत्तीची गोष्ट, तीच माझ्या मनाचे कोडे सोडवणारा अठरावा हत्ती.
एव्हापर्यंत सूर्याची कोवळी किरणे चेहऱ्यावर पडू लागली होती. तीच किरणे माझ्या बुद्धीला उजळून काढत होती. अठराव्या हत्तीचा साक्षात्कार.
Dr. Deepak Ranade.
No comments:
Post a Comment