Wednesday, February 21, 2024

लुप्त होत जाणारी मूल्ये

 लुप्त होत जाणारी मूल्ये


वृन्दाला सांगितलं मी उषा मावशीला बरोबर सकाळी 7 वाजता घ्यायला येतो. तुम्ही खाली येऊन थांबा.

म्हंटल्याप्रमाणे मी 7च्या ठोक्याला वृन्दाच्या सोसायटी बाहेर गाडी उभी केली. आणि वृन्दा त्या माऊलीचा हात धरून तिला माझ्या गाडीत बसवले. 

उषा मावशी सुंदर सिल्क साडी घालून, हातात पर्स,आणि एक छोटीशी पिशवी घेऊन माझ्या गाडीत आसनस्थ झाली. तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रा होती. सतत हसतमुख, आणि प्रेमळ स्वभावाची उषा मावशी माझ्या आईची बालपणाची मैत्रीण. वयाच्या 17व्या वर्षा पासून त्या दोघींची ओळख. हिंदी राष्ट्रभाषेच्या वर्गात प्रथम ह्या दोघी एकाच बाकावर बसायच्या. आई आमची अबोल. उषा मावशी सांगत होती,की 3 महिने एकाच बाकावर बसून देखील एकही शब्द बोलल्या नाहीत दोघी जणी. 

पुढे, j j school of arts मध्ये परत एकत्र आल्यावर कुठे वाचा फुटली. पण त्या नंतर, दोघींचे खूप जिव्हाळ्याचे नाते उलगडत गेले.

     उषा मावशीचा संसार मुंबईत झाला. मी 7 वर्षाचा असताना आई बरोबर तिच्या घरी गेल्याचे आठवते. तेव्हा तिने प्रेमाने आमचे आदरातिथ्य करून, मला खेळायला भोवरा दिला. काही आठवणी कारण नसताना अगदी स्पष्टपणे आठवतात. तिचा तो प्रेमळ चेहरा, तिने केलेले लाड, तोंड भरून कौतुक, काळजात कुठेतरी खोलवर अजून जोपासून ठेवले आहे.

      उषा मावशी आणि माझी त्यानंतर गाठभेट कमीच. तिचे यजमान उत्तम ज्योतिषशास्त्र जाणत. आई माझ्या पत्रिकेबद्दल बरेचदा त्यांच्या कडे चौकशी आणि विचारपूस करत. कालांतराने उषा मावशीची कन्या पुण्यात वास्तव्यासाठी आल्यामुळे तिच्या घरी माझे येणेजाणे व्हायचे. काही वर्षांपूर्वी उषा मावशीचे यजमान कैवल्यवासी झाले. मुलगा आणि सून अमेरिकेत स्थायिक,त्यामुळे आपल्या 75 वर्ष वास्तव्य केलेल्या घरी ती एकटीच.

तिला मुलीने पुण्यात शिफ्ट होण्यास आग्रह केला,पण तिने त्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. 

आज बऱ्याच दिवसानंतर उशा माउशीला भेटण्याचा योग आला. ती मुलीकडे काही दिवस मुक्कामाला आली होती. मी ठरवले,की तिला गाडीत घालून माझ्या आईकडे घेऊन जाईन. बाल मैत्रिणींची गाठ घालून देण्याचे पुण्य. 

  गाडीत बसल्यावर आमच्या गप्पा चालू झाल्या. 

तिच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने एक स्वावलंबता जाणवत होती. तिच्या व्यक्तिमत्वात एक सुडौलता,आणि ग्रेस होती. बोलताना,कुठेही आग्रही,हट्टी किंवा कोणाबद्दल टीका नव्हती. दैवाने जे काही तिच्या पानात वाढले होते,ते अत्यन्त चवीने आणि कुरकुर न करता ह्या माउलीने शांतचित्ताने ग्रहण केले. तिच्या व्यक्तिमत्वात एक ठेहेराव,स्थैर्य, तृप्त सम्पन्नता जाणवत होती. कुठेही,एकटेपणाचा त्रास किंवा कंटाळा नव्हता. तिच्या बरोबर विरोधी पावित्रा माझ्या आईचा. आपला साथीदार जीवनाचा प्रवास अर्ध्यात सोडून 11 वर्षे उलटली,तरी ती त्या दुःखातून बाहेर आली नव्हती. तिला तिचे आयुष्य कसे जगते असे विचारता तिने काही अमौलिक सल्ले दिले.

"आयुष्य सुटसुटीत ठेव रे. आपणच आपल्या आयुष्याचा फापट पसारा वाढऊन ठेवतो. भावना,आठवणी,ऐहिक गोष्टी,पैसालत्ता या साऱ्याचे वजन डोक्यावर बाळगून आयुष्य जगलो,तर मग ते कारण नसताना कष्टाचे बनवून टाकतो. मी माझ्या एकटेपणाचा कधीच स्तोम माजवला नाही. हे गेल्याचे दुःख निश्चित उरात बाळगते आहे,पण शेवटी,आयुष्याचे पुढचे पान उलटावे लागतेच. नव्या पानावर स्वतःची उत्क्रांती कशी होणार, यावर चिंतन करते. माझे छंद जोपासते,तब्येतीची काळजी घेते. स्वतःशीच मैत्री करणे,हे खूप महत्वाचे. मित्र परिवाराच्या गोतावळ्यात स्वतःचे स्वतःशी नाते कुठेतरी लुप्त होते. सगळे जण शेवटी आपापल्या संसारात व्यस्त होतात. भावनिक दृष्ट्या आपण कधीच कोणावर परावलंबी नसावे. त्याची खरंतर गरजच नसते. आपल्या मनाचे ते सारे खेळ असतात. "

उषा मावशी खरच खूप हलक्या, शुद्ध अंतःकर्णाची असल्याचे जाणवत होते. तिच्या मध्ये वात्सल्य,प्रेम,ममत्व भरभरून होते,पण, जेव्हा इतरांना मोकळे सोडून द्यायची वेळ आली, तिने तिच्या रुणानुबंधांतील अपेक्षांच्या साखळ्या काढून टाकल्या आणि स्वतःला आणि इतरांना मुक्त केले. तिच्यात कुठेच कोरडेपणा नव्हता. इतरांवर माया नक्की करावी,पण स्वत्व विसरून नाही. शेवटी स्वतःवर असलेली माया,हीच आयुष्य सुखी आणि समाधानी करते. 

त्या दोघी जिवलग मैत्रिणीची गाठ घालून देताना एक आगळाच आनंद झाला. कित्येक दशकांच्या त्यांच्या नात्याचा सुगंध त्यांच्या डोळ्यात दिसत होता. तो दरवळणारा सुगन्ध मनमुराद लुटत मी माझ्या वाटेला लागलो. आजकालच्या व्यवहारी नातेसंबंधांकडे पहाता,उषा मावशी आणि तिची विचार सरणी त्यांच्या पिढीबरोबर लुप्त होत चालली की काय, ही शंका मनात कुठेतरी येऊन गेली. 


Dr. Deepak Ranade.

No comments: