स्थित्यानंतर
आयुष्याच्या प्रवासाचा वेग नकळत वाढतोय असे जाणवू लागले आहे. आयुष्य तसे क्षणभनगुर असते याची व्यवसायमुळे पदोपदी जाणीव होत होतीच. पण आयुष्य एखाद्या कॅलीडोस्कोप सारखे झटक्यात बदलते याची प्रचिती वारंवार आली. आपल्या आयुष्याची स्क्रिप्ट आपल्या मित्र मंडळीनसारखी किंवा थोडी कमी अधिक प्रमाणात तत्सम असेल असे कुमार वयात असताना वाटे. उच्चशिक्षण,उच्चभ्रू कुटुंबात आपला जन्म, अंगाखांद्याने भक्कम आणि सामान्यांहून थोडी अधिक बुद्धीमत्ता असे सर्व काही असताना आपण समाजात अपेक्षित असलेले सर्व ठोकताळे वेळेनुसार गाठू, असा आत्मविश्वास.
चाकोरीतल्या आयुष्याहुन थोडे वेगळे आयुष्य जगावे एवढी इचछा मनात सतत होती.
चाकोरीतल्या आयुष्याच्या बाहेरचे म्हणजे नेमके काय? याचा काहीच विचार नव्हता.पण कदाचित आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवायचा हट्ट ही देखील अहमकाराचीच अभिव्यक्ती. नाहीतर वेगळेपण हे आयुष्याचे उद्दिष्ट असू शकत नाही. वेगळे वेगळे म्हणजे काय?तोच समाज, तेच चारचौघे त्याच साऱ्या प्रथितयश मंडळींची कथा पुन्हा गिरवायच्या. फार फार तर गिरवण्याची पद्धत थोड्या फार प्रमाणात वेगळी.
व्यवसायात नाव,पैसा, सम्मान, पैसा अडका, जग प्रवास, बंगले, गाड्या वगैरे वगैरे............
मग आयुष्य उलगडत गेले.........
प्रत्येक 5 ते 7 वर्षात आयुष्याची उलथापालट करून टाकणारी स्थित्यंतरे. नवीन नाती, नवा पत्ता, नवे रूटीन, सारे काही अकस्मित रित्या बदलून जात. सारेच अनाकलनीय. आयुष्यात काहीच शाश्वत नसते हे माहित होते. नाती शाश्वत नसली तरी औपचारिकता पाळण्या एवढी कमी जास्त प्रमाणात टिकून असावी. अगदी परत तोंड बघणे नाही हे जरा पचायला कठीण.The only certain thing in life is the uncertainty. अगदी कबूल. पण...... तरीही एवढी कमालीची उलथापालट?. बरे नवीन नाती, लागे बांधे ओघाओघाने स्वाभाविकच जुळतात. ह्यात काही वाईट नाही. पण त्याआधी जुनी सर्व नाती पूर्ण संपुष्टात आणायची. नवीन वर्गात प्रवेश करताना मागच्या वर्षातली सगळी पुस्तके वह्या रद्दीत टाकून देतो, अगदी तसेच काहीतरी. एक प्रकारचा शापच म्हणावा लागेल. अतिरेकी विचारसरणी, टोकाची भूमिका घेणे,संतापी स्वभाव, अति समवेदनशीलता, तडका फडकी निर्णय घेण्याचा हट्ट हे स्वभावातले कंगोरे याला जवाबदार असतील कदाचित.
बऱ्याचदा मी स्वतःला विचारतो की माझ्या जागी दुसरे कोणी असते तर त्या व्यक्तीने काय निर्णय घेतला असता?
माझा निर्णय हा माझ्या परिस्थितीचा आढावा घेण्याशी खूप निगडित असतो. परिस्थितीचा आढावा घेण्यात आपण चुकतो का? शेवटी आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून असते.
रिचर्ड बाख या प्रसिद्ध लेखकाचे एक अविस्मरणीय पुस्तक फार वर्षांपूर्वी वाचले होते. One असे नाव होते.
त्याची थीम ह्याच विषयावर होती.
मी डॉक्टर व्हायचे ठरविले त्या वेळी इतर पर्याय देखील होते. वकील, इंजिनीर असे इतर करीयर.
मी डॉक्टर व्हायचे ठरविले. पण त्या वेळी जर मी इंजिनीर झालो असतो आणि त्या दीपक ला आज भेटलो असतो तर...........
प्रत्येक वेळी आयुष्यात निर्णय घेताना आपल्या पुढे किमान दोन तरी रस्ते असतात. आपण एक रस्ता निवडतो. जर दुसरा रस्ता निवडला असता तर आपले आयुष्य आज कुठे असते? आयुष्यात आपण निर्णय घेताना कोणत्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतो?खरोखर आपणच निर्णय घेतो का? की आपले दैव आपल्याला निर्णय घेण्यास भाग पाडतात ? निर्णय घेणे जरी आपल्या हाती असले तरी त्या वेळची परिस्थिती, इतरांची वर्तणूक, ह्या गोष्टी आपल्या हातात तर नक्कीच नसतात. म्हणजे दैव हे परिस्थिती निर्माण करते आणि आपल्या फ्री विल ने आपण निर्णय घेतो, असे असेल का?
निर्णय घेणारी यंत्रणा कोणती? निर्णय भावनिक, विवेकी, अविवेंकी, प्रॅक्टिकल, स्वार्थापोटोचे,निस्वार्थी, टोकाचे की मोजून मापून केलेले? निर्णय घेताना भावना प्रधान न होणे, हे तरी आपल्या हातात असते का? कित्येकदा टोकाचे निर्णय ततक्षणी घेताना निर्णयाच्या परिणामचा विचार करतो का आपण? आपल्या आयुष्यातल्या किती निर्णयांचा आपल्याला पश्चाताप होतो? होत असेलच अनेकांना. पण हा सारा दैवाचा खेळ आहे असे म्हणत पुढचा प्रवास चालू ठेवायचा. आपण खरे तर केवळ साक्षी असतो हेच खरे.
प्रत्येक आत्म्याचा प्रवास किती भिन्न आणि unique असतो नाही?
आयुष्यात येणारी मंडळी, सखेसोयरे त्यांच्याशी आपले नाते, मतभेद, वितुष्टता, प्रेम, सारे काही क्षणात बदलू शकते.
एकांतात बसल्यावर या प्रश्नांची उत्तरे शोधू लागते मन. उत्तर काही केल्या सापडत नाही. नाते तुटले तर तेवढेच तीळ तांदूळ होते अशी मोघम समजूत काढायची. मागच्या जन्माचे देणे अथवा घेणे संपले असावे. कोणास ठाऊक. स्थितयंतरे ही आपल्याला आयुष्यात बरेच काही शिकवण्यासाठी घडतात. हे मात्र नक्की .
मी आयुष्यात खूप काही शिकलो. नाती तुटणे , परत कदाचित कधीच भेट न होणे, हे सारे मनाला पटायला जरा अवघडच. असेल काही पूर्वजन्माचे देणे घेणे. आपला कार्मिक अकौंट जरा कॉम्प्लिकेटेड असेल. किंवा कदाचित त्या इतर व्यक्तींचे शिक्षण होत असावे.
स्तित्यंतरे होणे याला आपणच जवाबदार आहोत असे मानायचे बंद केले आता. आपले दैव. पुढचा निर्णय घेताना सर्व काही त्यावर सोडून देणे. शिक्षण शेवटच्या श्वासा पर्यंत चालूच राहणार हेच खरे.
डॉ दीपक रानडे
No comments:
Post a Comment