जेव्हा एक स्वर, एक जागा एखाद्या गाण्याला अमर करते........
काल संध्याकाळी, दिवस भराच्या धावपळी नंतर थोडा शांत विसावा घेत बाल्कनीत बसलो होतो कातर वेळ, आकाशात तांबूस, नारंगी, भगवे, तांबडे.... अवरणीय रंग आणि हलकीशी गुलाबी थंडी, गरमागाराम चहाचा घोट कंठातून मार्ग शोधित पोटात पोचे पर्यंत जिभेवरच रेंगाळत होता. इतक्यात हेडफोन्सवर
'ये दिल तुम बिन कही लगता नही...... हम क्या करे.... ' सुरु झाले.
लताबाई, रफी, साहीर आणि लक्ष्मी-प्यारे यांनी घडविलेला चमत्कार. प्रत्येक स्वर, अक्षरशःहा कानात अमृताचा थेंबच. काही गाणी अनाहूतपणे आपल्या आयुष्याचाच भाग बनून जातात. काही कारण नाही पण असे होते हे खरे. त्यातलेच हे गाणे.
तस्व्वर हा उर्दू शब्द, पण लताबाईंची काय नजकात, आणि उचचार. अगदी मन लावून गाणे ऐकत होतो आणि प्रत्येक स्वर, प्रत्येक शब्द, प्रत्येक जागा अगदी काळजाला भिडत होते.
आणि मग,
तुम्ही केहेदो अब ऐ जानेवफा हम क्या करे.......
एक्दम अंगावर काटा आला......
हम क्या....... एक दैवी क्षण होता त्या जागेत.
एक शब्द, एक क्षण, एकच जागा पण त्या जागेत, त्या क्षणात पूर्ण ब्रह्माण्ड आत्मसात झाले होते. किती सूक्ष्म आणि तरल होती ती तान, ती जागा. आपलं आयुष्य वेचून टाकावे अशी जागा ऐकण्यासाठी. ती जागा ऐकताना नेमके काय होते, ते शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य. लताबाईंना ती जागा लक्ष्मी प्यारेनी अशी घ्या असे सांगितले नसावे. कारण ती जागा कोणाच्या कल्पना शक्तीच्या पलीकडची. नाहीच. काही जागा, काही क्षण, काही सुर कधी कधी जेव्हा जुळतात, तेव्हा ते त्या परतत्वाची झलक असतात. देवत्वाचे अधीशठान असते त्या जागेला. कदाचित ती जागा परत कोणाच्याच कंठातून येणे नाही. एकदाच येणाऱी गानदेवतेच्या आशीर्वादाची अभिव्यक्ती.
केवळ ती जागा पुन्हा पुन्हा ऐकावी. आणि प्रत्येक वेळी
"रोमटे खडे हो जाते है".
काय झाले असेल रेकॉर्डिंगच्या वेळी? कोणत्या देवतेची आराधना करत होत्या लतादीदी? सारेच अनाकलनीय.
कुठल्याच मानवी कंठातून ती जागा येणे थोडे अशक्यप्राय.
आणि मग एक्दम स्मरते न्यूरोसर्जरी करताना एखाद्या क्षणी एखादी स्टेप, एखादे दिस्सेक्शन केले जात नाही, ते आपोआप होते. कार्यकारणभावाच्या खूप पलीकडे. कैवल्यात कुठेतरी, मानवाच्या भौतिक कक्षेच्या परे. अधिभौतिक, अध्यात्मिक विश्वातून, थेट त्या परमतत्वाची अनुभूती. आपण केवळ त्या निर्गुण, निराकाराला सगुणात साकार करणारे एक साधन.
ये दिल तुम बिन कही लगता नही...........
रात्रभर ते स्वर कानात घुटमळत होते. त्या तत्वाच्या शोधात.
दीपक रानडे.
No comments:
Post a Comment