Wednesday, February 21, 2024

संगीतातून परमर्थ

 "संगीतातुन परमार्थ "


         काल संध्याकाळी राहुल देशपांडेंच्या 'दिवाळी भाऊबीज सूर संगम:कार्यक्रमाला गेलो होतो.आईकडून मिळालेला संगीताचा वारसा यामुळे मराठी शास्त्रीय संगीताबद्दल प्रचंड प्रेम.  संगीताच्या दरबारात घराण्याला खूप महत्व असते. मला संगीताच्या घराण्यांची विशेष जाण नाही.राहुलचे अजोबा वसंतराव यांच्याबरोबर  माझ्या बालपणात अगदी आकस्मित घडलेली भेट स्मरते. मी ६वी इयत्तेत असेन. आदल्याच दिवशी त्यांचा प्रोग्रॅम टीव्हीवर पाहिला होता आणि लगेचच दुसऱ्या दिवशी डेक्कन जिमखाना भागात बाबांचे काही काम होते. मी माझी बहीण आणि आई गाडीतच बसून होतो,आणि बाबा बँकेत गेले होते. गूडलक चौकातून समोरून वसंतराव चालत चालत ब्रिटिश काऊन्सिल लायब्ररी च्या दिशेने जात होते. त्यांना बघून मी एकदम भारावून गेलो आणि आईला विचारले "मी त्यांना भेटायला जाऊ का?" आई म्हणाली जा. मी थोडेसे सावरत सावरत दार उघडुन रस्ता ओलांडून जाईपर्यंत ते बरेच पुढे निघून गेले होते. मी धापा टाकत टाकत त्यांना गाठले. त्यांनी अगदी प्रेमाने माझी चौकशी केली. मग थोडी शांतता. संभाषण पुढे कसे न्यावे? मी त्यांना म्हंटले " माझी आई सुधा गाते. ती गाडीत बसली आहे आणि तिला तुम्हाला भेटायचं आहे."

वसंतराव थोडे संभ्रमात पडले असावे. दोन मिनिटे विचार करून ते म्हणाले "चल बाळा.आपण जाऊन भेटू तुझ्या आईला." आम्ही दोघे उलटे चालत चालत गाडी पाशी  पोचलो आणि आईला वसंतरावांना माझ्या सोबत बघून दातखीळ बसली. तिने लगबगीने दार उघडुन त्यांना नमस्कार केला आणि मी केलेल्या वाह्याद पणा बद्दल त्यांची माफी मागितली. वसंतराव थोडेसे हसले,आणि आईशी थोडीशी हितगुज करून पुन्हा मार्गस्थ झाले. किती नम्र,विनयशील,गुणी कलाकार होते वसंतराव,हे नंतर आईचा ओरडा खाल्ल्यावर समजले. मग पुढे तरुणपणात त्यांच्या गायकीचा मी मोठा चाहता झालो.  मधल्या काळात 'मी वसंतराव,हा चित्रपट पाहिला आणि त्यावेळी समजले की वसंतरावांची गान शैली,ही कुठल्याच घराण्यात बसत नव्हती. किंबुहना त्यामुळेच त्यांना सुरवातीच्या कारकीर्दीत खूप अवहेलना आणि समिक्षेला सामोरे जावे लागले. त्यांचा सांगीत शिकण्याचा प्रवास,त्यांची अफाट जिद्द,त्यांची असाधारण चिकाटी,आणि अखेरीस मिळालेले यश.  बालपणात घडलेल्या प्रसंगातून त्यांची नम्रता अधिकच काळजाला भिडली.

 राहुलचे गाणे ऐकता ऐकता त्यांच्या गायकीची वारंवार आठवण येत होती.

       राहुलच्या गाण्यात प्रचंड आत्मविश्वास जाणवतो.त्याच्यातला सच्चेपणा काळजाला भिडतो. प्रत्येक कलाकाराची एक खास शैली असते. राहुल बरोबर मधे मधे  शरवरी गप्पा मारत होती. त्या गप्पांच्या ओघात राहुलने एक खूप मोठी गोष्ट सांगितली. संगीतकार म्हणून त्याने लावलेली चाल,या बद्दल बोलत असताना तो म्हणाला,की आपण नवीन काहीतरी रचले आहे,हा अहंभाव फक्त अज्ञानातून निर्माण होतो. सूज्ञ व्यक्तीला निर्माण केलेल्या,किंवा सादर केलेल्या चीजेच्या मूळ गाभा ठाऊक असतो.आपण नवीन काहीच करत नसलो,तरी प्रत्येक कलाकार आपापल्या कक्षेत प्रत्येक गाण्याला आपल्या पद्धतीने  सादर करतो. 

किती प्रगल्भ विचार मांडत होता हा कलाकार. त्याच्या गाण्याला कुठेतरी परतत्वाचा स्पर्श जाणवत होता.जेव्हा कलाकाराच्या अंतःकरणात अहंकाराचा लवलेश नसतो,तेव्हा तो सगुणातून निर्गुणाचे दर्शन घडवून देत असतो. कुठलेही कौशल्य, कला, शिकत असताना साधनेची गरज असतेच. मी न्युरोसर्जरी गेली २५ वर्षे करतोय आणि ती सुधा एक साधनाच म्हणावी लागेल. साधना करत करत एक वेळ येते,जेव्हा अहंकार बळावतो. कदाचित एक प्रकारची सिद्धी प्राप्त होते. ती मिळालेली सिद्धी,मग प्रसिद्धी शोधू लागते. सिद्धीतून प्रसिद्धीची हाव सुटते. आपल्या सिद्धिंचे आगाऊ प्रदर्शन न करणे,आपल्या गुणांचे,कौशल्याचे स्तिमित,संयमित दर्शन समर्पकपणे द्यायला शिकणे, ही देखील एक साधनाच. वसंतरावांच्या शब्दात,गायक हा एक रंगारी असतो.भडक,उग्र,दर्प असलेले रंग योग्य प्रमाणात वापरण्याचे तारतम्य, अत्मनियंत्रण,एकाच रांगतल्या बारीक छटा,उमजून त्या अलगदपणे मांडणारा कलाकार.

     प्रसिद्धीच्या पलीकडे जेव्हा व्यक्ती  जाण्याचा प्रयत्न करते,तेव्हाच त्या सिद्धीला परतत्वाचा स्पर्श होतो. त्या अवस्थेत,व्यक्ती उरतच नाही. उरते,ती  फक्त अभिव्यक्ती.त्या क्षणी करतेपणाचा भाव लुप्त होतो. सगुण साकार त्या क्षणी  निराकारनिर्गुणात विलीन होते. त्या क्षणाची अनुभूती म्हणजेच परब्रह्माची अनुभूती.

     राहुलने कैवल्य या  गाण्याने कार्यक्रमाची सांगता केली. आणि मग उमगला वसंतरावांनी राहुलला दिलेला सगळ्यात मोठा वारसा. त्यांनी निर्माण केलेले स्वतःचे एक घराणे. विनम्रतेचे,शालीनतेचे घराणे. आयुष्यातले आरोह अवरोह  तेवढ्याच सहजतेने आणि स्थित प्रज्ञतेने गाण्याच्या सामर्थ्य असलेले  घराणे.  कंठातून उमटणाऱ्या स्वरांचे स्वामित्व न बाळगणारे घराणे . शेवटच्या श्वासापर्यंत साधक राहणारे घराणे.

सगुणातून निर्गुणाचे दर्शन घडविणारे घराणे . वसंतराव,तुम्ही एवढे प्रतिभासंपन्न कलाकार असून  माझ्या बालहट्टाला मान दिलात आणि राहुलच्या गाण्यातून मला काल पुन्हा त्या नम्रतेची, देवत्वाची, त्याच्या सुरातून एका आगळ्या वेगळ्या  परमार्थाची प्रचिती झाली. 


दीपक रानडे.

No comments: