Friday, June 9, 2023

करुणरसाचा वारसा......


📘📙📗📕📘📙📗📕


        मदनमोहनने चाल लावलेली गाणी ऐकायला मोठे धाडस  लागते . ऑपेरेशन थिएटर मध्ये गाण्याशिवाय मी सर्जरी करूच शकत नाही. आज मणक्याची थोडीशी जटील शस्त्रक्रिया करत होतो आणि सहजच स्पोटिफाय मध्ये मदनमोहनची प्लेलिस्ट लावली होती.📘

अगर मुझसे मोहोबत है, मुझे सब अपने गम दे दो पासून सुरुवात झाली. त्या थोर कलाकाराच्या अगदी आत्म्याच्या देठापासून उमटली, सात स्वरांच्या माध्यमातून अंगावर शहारा आणणारी चाल. त्या कलाकाराची काय मनोवस्था असेल जेव्हा त्याला अशी चाल सुचली ? त्या कलावंताची संवेदनशीलता, त्याची भावनिकता, त्याच्या आत्म्याची तळमळ हे सारे औरच असणार. त्या शिवाय असे सूर जुळवणे शक्यच नाही. कदाचित त्या काळात समर्पण, त्याग, सहनशीलता असले फाजील गुण समाजात प्रचलित होते. मीना कुमारी या सर्व गुणांची प्रतीक होती. त्यांच्या तोंडी अशी गाणी शोभून गेली असावीत. 📘

  त्या कलाकाराची कृद्ध, उद्विग्न मानसिकता प्रत्येक स्वराला चिंब भिजवून टाकते. स्वराला सुद्धा जीव असतो आणि कधी कधी तो जीव घेतो सुद्धा. त्या गान सरस्वतीच्या मुखातून जेव्हा स्वर प्रकटतात तेव्हा जीव ओवाळून टाकावा असे वाटते.  डोळ्याच्या कडा नकळत ओलावतात. हृदय पिळवटून टाकणारी ही कलाकृती. संगीतात केवढी ताकद आणि प्रतिभा आहे. लताबाईंचे स्वर म्हणजे निशब्द करणारेच. काय असेल त्या देवीची किमया? शब्दाला जिवंत करून ते सुर अक्षरशः काळजाला चिरून टाकतात. ती स्वर सम्राज्ञी आपल्या भावांनावर राज्य करू लागते. शस्त्रक्रिया करताना perfection कसे असते याची पदोपदी जाणीव करून देणारी.📘 

 काही वर्षांपूर्वी यशराज स्टुडिओज मध्ये मदनमोहनवर केलेली एक डोक्युमेंटरी बघायला गेलो होतो.

मदनमोहनच्या मुलाने ( संजीव कोहली) हा लघुपट बनवला होता आणि त्या लघुपटाच्या प्रायव्हेट स्क्रीनिंगला  जाण्याचा योग आला होता. छोटेसे डबिंग थिएटर होते. आम्ही मोजके २० जण होतो. संजयने सगळ्यांचे स्वागत करून सगळ्यांना आसनस्थ केले. मग तो जरा दूर एकटाच जाऊन बसला.📘

तो लघुपट बघताना त्या कलाकाराच्या आयुष्यात उलगडलेले विविध प्रसंग आणि दुःखद अनुभव याची थोडीशी प्रचिती आली. त्या महान प्रतिभा संपन्न व्यक्तीच्या अंतःकरणात दडलेला शोक, खेद, दुःख अगदी जाणवत होते. ह्या कलाकाराला दुःख सहन करण्यासाठी मद्याची मदत घ्यावी लागली. अत्यंत लायकी आणि गुणी कलावंताला शेवटच्या श्वासापर्यंत फिल्मफेअर अवॉर्ड न मिळण्याची खंत होती.

जो हमने दासता अपनी सुनायी, आप क्यू रोये?📘

   अरे तुझी कला, आणि त्याची झालेली अवहेलना आणि तुझी हतबलता बघून रडू नाही आले तरच नवल.

लघुपट संपल्यावर सहजच विचारले की संजीव ( मदनमोहचे चिरंजीव ) जरा दूर का बसले होते?

माझ्या मित्राने हळूच जवळ येऊन सांगितले की तो लघुपट बघताना ओक्साबोक्शी रडतो.

मदनमोहच्या प्रत्येक गाण्यामध्ये हृदयस्पर्शी,मनाला हेलावून टाकणारा एक सांगित्यिक वारसा दडलेला आहे.📘

उस्ताद रईसखान साहेबांनी तर सीतारीतून सुरांचा अत्यंत अनमोल खजानाच लुटलाय. ही सर्व मंडळी कुठल्या ढाच्यातून बनवली होती परमेश्वरानी? कदाचित त्या कर्त्या करवित्याला सुद्धा ही मंडळी अशा काही रचना आणि कलाकृत्या करतील याची कल्पना नसावी. 📘

   मन हल्लक होते थोडे. काही काळ शांत बसून राहावे असे वाटते. ते स्वर बराच वेळ आत्म्याच्या खोल कुठल्या तरी कपारीत घुमत राहतात. भावनांच्या लाटा हळुवारपणे मनाच्या किनाऱ्यावर आदळत राहतात. परत जाता जाता अंतःकरणाच्या रेतीत कोरलेल्या आठवणी  पुनश्च ताज्या होतात. समवेदनांचे वेदनेत रूपांतर अगदी नकळत होते. त्या वेदना कुठेतरी म्हंटले तर सुखद आणि म्हंटले तर दुःखद. मनाला चुटपुट लागते. मीराबाईची विरहिणी जशी मनाला आकंठ विरह भावात नाहून काढते तशीच काहीशी हुरहूर लावून जाते. 📘

     वो भूली दासता, लो फिर याद आ गयी......

     भावना व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडतात. मनात काहूर माजते. लताबाईंचा आवाज हृदयाचे पाणी पाणी करून सोडतो. दुःखाची अभिव्यक्ती इतकी सुरेल आणि तरल. पाषाणला देखील पाझर फुटेल. हा प्रवास केवळ सांगित्यिक अनुभूती पर्यंत मर्यादित ठेवणे शक्यच होणे नाही. कुठेतरी एक गंभीर औदासीन्य, मधेच कधीतरी लताबाईंनी घेतलेली एक थक्क करणारी जागा, उस्ताद रईसखान चे मंत्रमुग्ध करणारा interlude, आणि मग एकदम अनपेक्षित वळण घेणारी चाल. 

बेताब दिलकी तमन्ना यही है.......

        तुम्हे चाहेंगे, तुम्हे पूजेगे.......

तुम्हा सर्व कलाकारांची पूजाच करावी. 

मदनमोहनची गाणी ऐकायला धाडसच लागते.

📘📙📗📕📘📙📗📕

No comments: