Sunday, November 7, 2021

आयुष्याची रुबिक क्युब

 आयुष्याची रुबिक क्युब


1980 साली रुबिक क्युब नावाचा एक विलक्षण आविष्कार एक हंगेरियन शिल्पकार आणि वास्तुविशारद असलेल्या Erno Rubik याने डिझाइन केला. या क्यूबनी जगात खळबळ उडवून दिली.  सर्वात जास्त खपणारा खेळ म्हणून प्रसिद्ध झाली ही क्युब. ही क्युब म्हणजे खूपच युनिक होती. 6 बाजू असलेल्या ह्या क्युबच्या प्रत्येक बाजू मध्ये 9  वेगवेगळ्या रंगाचे चौकोन होते. ती क्युब म्हणजे एक प्रकारचे कोडे होते. त्या क्युबची वरची,खालची आणि दोन्ही बाजूच्या रांगा फिरवणे शक्य होते. त्या फिरवल्यावर सर्व 6 रंगांचे छोटे चौकोन विखरून जात. कोडे सोडवण्यासाठी सर्व एकच रंगाचे 9 चौकोन एकत्र आणून 6 बाजूचे 6 रंग पूर्ण करायचे. 

सर्व तरुण,वयस्कर,गृहिणी,विद्यार्थी ह्या क्युबच्या मागे वेडे झाले होते. अगणित combinations होऊ शकत होती त्या क्युबची. 

मी कॉलेज मध्ये होतो आणि कर्म धर्म संयोगाने,मी ती क्युब 8 ते 10 मिनिटात पूर्ण करत होतो. वर्गातले सगळे खूपच आश्चर्यचकित होत असे. ती क्युब पूर्ण करण्याचे एक टेकनीक होते. एकेक रांग स्टेप बाय स्टेप पूर्ण करत हळू हळू ती क्युब पूर्ण करावी लागे. पुढे पुढे ,त्या क्यूबला पूर्ण करताना त्रेधातिरपीट उडायची. एक बाजू पूर्ण केली की इतर बाजू विस्कटून जायच्या. अखेर मार्ग सापडायचा पण खूप प्रयत्न करावे लागले. 

वय होत गेले,तशी ती क्युब विसरून गेलो. पर्वा,एका मित्राच्या घरी गेलो होतो आणि त्याच्या 12 वर्षाच्या पुतण्याच्या हातात ती क्युब दिसली. 

का कोणास ठाऊक,पण ती क्युब त्याच्या कडून मागितली आणि 10 मिनिटात पूर्ण करून दाखवतो,आशा फुशारक्या मारत कामाला लागलो. पाऊण तास गेला,पण ती क्युब पुर्ण तर सोडा,एक बाजू देखील पूर्ण करू शकलो नाही. नाद सोडून दिला आणि अहंकाराचे झालेले तुकडे एकत्र करीत ती क्युब परत केली.

आणि मग एक विचार सहजच मनात आला.

आयुष्याची देखील रुबिक क्युब असते. 6 रंग म्हणजे आयुष्यातील  6 पैलू. तब्येत,पैसा, प्रसिद्धी,कुटुंब,व्यवसाय आणि अध्यात्म. ह्या 6 पैलूंचे चौकोन एकमेकात मिसळून, ती क्युब पुर्ण विस्कळीत होती. कुटुंबाची बाजू पूर्ण करायला गेलं,की इतर बाजू अपुऱ्या. मग एक रांग तरी पूर्ण करायचा प्रयत्न. ती रांग पूर्ण होताच बरोबर मागे असलेली अध्यात्माच्या बाजूची रांग बिघडली. अवघड होतं. एक रांग देखील एकाच रंगाची पूर्ण करू शकलो नाही. 

इतरत्र नजर फिरवली,तर काही मंडळींची एखाद बाजू पूर्ण दिसायची. काहींची कुठली बाजू पूर्ण असली,तरी कुठलीच बाजू इतर बाजूंपेक्षा श्रेष्ठ नसते. आयुष्याची क्युब दुसरीकडून पहिली,तर बाकीच्या बाजूंची बोंबच दिसायची. सगळ्यांची सगळ्या बाजू पूर्ण करायची धडपड. पण कुठली तरी बाजू अपूर्णच. मग जाणवले,की वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या बाजू काही काळा करता पूर्ण दिसत. काही काळ गेल्यावर दुसरी बाजू,पूर्ण करण्याच्या नादात पूर्ण झालेली बाजू पुन्हा विस्कळित. एकाच वेळी सगळ्या बाजू पूर्ण होणे नाहीच. 

मग विचार आला, सगळ्या बाजू काही औंशी पूर्ण करायचा प्रयत्न करत राहणे,एवढेच आपल्या हातात. बऱ्यापैकी पूर्ण असलेली बाजू तेवढ्यापुरतं चांगली दिसते. पण दुसऱ्या बाजू बघण्याचा प्रयत्न केला,की त्यांची अपूर्णता जाणवायची. 

कुटुंबाच्या बाजूत थोडे पैशाचे चौकोन घुसून ती बाजू विस्कळित. तब्येतीच्या बाजूत प्रसिद्धीचे चौकोन घुसून ती बाजू बिघडवायची.सगळीच गुंतागुंत. कुठलीच बाजू धड किंवा पूर्ण नाहीच.कोणाचीच क्युब पूर्ण नसतेच. त्यातल्या त्यात पूर्ण असलेली बाजू प्रथमदर्शनी ठेवून, सगळी क्युब पूर्ण असल्याचा फोल देखावा करणे. खेळातली क्युब सोडवली होती खरी. पण आयुष्याच्या क्युबची एखाद बाजू तरी पूर्ण होईल का, ही शंका मनात घुटमळत होती. मग दुरून ती क्युब पहिली,आणि त्या अपूर्ण पण रंगीबेरंगी क्युब सुद्धा देखणी वाटू लागली. कदाचित,कुठलीच बाजू पूर्ण करण्याचे वांझोटे प्रयत्न सोडून द्यावे. आपल्या आयुष्याची क्युब आहे तशीच अपूर्ण पण वैविध्यपूर्ण आहे. एखादी रांग जमेल तशी पूर्ण करावी. नाही जमल्यास, विस्कटलेल्या रांगेतील वैविध्यतेचा स्वाद घ्यावा.  पूर्ण असलेली क्यूबच श्रेष्ठ, हा अतिरेकी हट्ट सोडून दिला,तरच विविधरंगी क्यूबचे सौंदर्य जाणवेल. आयुष्यतला कुठलाच पैलू परफेक्ट नसतो. Happiness lies more in savoring the delectable imperfections rather than seeking it in an obsessive quest for perfection. ती अर्धवट रंगीबेरंगी क्युब त्या मुलाला परत देताना पराभव पत्करलयाची रुखरुख होती,पण जाणिवेची क्युब पूर्ण झाल्याचा आनंद सुद्धा होता. 


Dr. Deepak Ranade.

किंमत

 किंमत.

    त्याला वेदना असाह्य होत होत्या. हात डोक्यावर ठेवावा लागत होता. चेहऱ्यावर त्याची व्यथा स्पष्ट वाचता येत होती. खांद्या पासून कळा थेट उजव्या हाताच्या बोटांपर्यंत अक्षरशः विजेच्या झटक्या प्रमाणे दोन दोन मिनिटाने त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. मानेच्या मणक्या मधल्या 6व्या आणि 7व्या vertebrae च्या मधली उशी सरकली होती आणि उजव्या बाजूच्या नसेला पूर्ण आवळून टाकत होती. शस्त्रक्रियेला पर्याय नव्हता. कष्टचं काम करत होता. डोक्यावर वजन वाहून वाहून बिगारी काम करून त्या मानेवर अनंत अत्याचार झाले होते. 

सोबत त्याची बायको आणि तिच्या कडेवर त्यांचे तिसरे मूल. पोटा पाण्यासाठी धडपड करून जेमतेम दोन वेळचे पोटभर जेवण नशिबी. बायको सुद्धा दिवस भर त्या कोवळ्या जीवाला झोळीत ठेवून राबत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजीने वीणकाम केले होते.  स्वस्तात मानेचा  MRI करून घेतला होता आणि MRI मध्ये सर्व परिस्थिती स्पष्ट दिसत होती. 

          शस्त्रक्रिया म्हणजे खर्च आलाच. त्यांनी त्याबद्दल चौकशी केली. पोट भरण्या पुरते पैसे कमावणारी ही मंडळी. शक्यच नव्हते त्यांना पैशाची व्यवस्था करणे. 

माझ्या फीज सांगायला सुद्धा मला ओशाळल्या सारखे झाले. मी काय मागू आणि ते काय देणार?गणित जुळणे अशक्य. त्यांना काही शासकीय योजने अनतर्गत काही रक्कम मिळणे शक्य होती. अगदीच तुटपुंजी होती ती रक्कम. माझी शस्त्रक्रिया करण्याची फी, त्या रकमेच्या काही पट असते. ही शस्त्रक्रिया करायला शिकण्यासाठी,मी किती कष्ट घेतले,किती अडचणी आणि प्रयत्न केले होते, ती शस्त्रक्रिया करताना मी काय रिस्क घेतो,केवढी जबाबदारी अंगावर घेतो, हे सारे त्यांना समजणे शक्यच नव्हते. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला,आणि त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेता, आपण आपल्या कामाची काय किंमत सांगायची? 

आपण कुणासाठी काही प्रेमाने करतो,तेव्हा कित्येकदा समोरच्या व्यक्तीला त्याची किंमत कळते का? केलेल्या कामाची किंमत कोणी ठरवायची? मदत करणार्याने,की मदत घेणार्याने? मदत घेणाऱ्याची आपण केलेल्या मदतीची किंमत देण्याची दानत असते का? आणि दानत असून देखील त्या व्यक्तीला केलेल्या मदतीचा भाव  करण्याचे तारतम्य असते का? किंमत. कोणत्या currency मध्ये  होतो हा व्यवहार? 

   समोर बसलेल्या त्या बिचाऱ्या कडून काय मागणार मी?

त्याला सांगितलं की तूला माझ्यावर विश्वास आहे ना? म्हणजे ही शस्त्रक्रिया करताना तुझ्या जीवाला धोका आहे. स्वरपेटीच्या पडद्याची  हालचाल करणाऱ्या नसा खूप जवळ असतात आणि त्यांना धक्का लागला,तर तुझा आवाज कायमचा घोगरा होऊ शकतो. भूल देताना 2 टक्के लोकांचा रक्तदाब एकाएकी पडू शकतो.हे सारे तुला सांगितले आहे आणि त्यावर तुला स्वाक्षरी करावी लागेल.(consent)

         तो म्हणाला "साहेब,माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही बिनधास्त ऑपरेशन करा.काय झाले तर तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. पण मला ह्या त्रासातून मोकळे करा. मला जमेल तेव्हढे पैशाची व्यवस्था मी करेन.म्हेवण्या कडून, कंत्राटदारा कडून advance घेईन,पण प्लीज माझे ऑपरेशन करा. 

   त्याला मी म्हणालो "उद्या ऍडमिट व्हायला ये. हॉस्पिटल मध्ये तुला योजने अंतर्गत मदत मिळते. तूझा माझ्यावर असलेला विश्वास हीच माझी फी. 

बऱ्याच किमती, पैशात मोजता येत नाहीत. मी माझ्याकडून सर्व नीट  करेन आणि तुला तुझ्या व्यथेतून मुक्त करायचा प्रयत्न करेन."

माझ्या कन्सलटिंग मध्ये नेहेमीच गाणी ऐकत काम करतो मी. नेमके तो निघत असताना मदनमोहनजी यांच्या एका अविसमरनिय गाण्याची सुरवात झाली.  त्या पेशंटचा निरोप घेत, उस्ताद रईस खानच्या सतारीचे डोळ्यात पाणी आणणारे स्वर कानी पडले. सतारीचे स्वर इतके बोलके आणि काळजाला भिडणारे. मग त्या स्वरसम्राज्ञी देवतेचा आवाज कानी पडला.


"हम है मताये कुचा,बाजार की तरह 

उठती है हर निगाह खरीदार की तरह"


 गाणे डोळे मिटून 5 मिनिटे शांततेत ऐकत बसलो. मजरूह सुल्तानपुरी यांची शब्द रचना. काटा येतो ऐकताना.प्रत्येक जण खरीदारच असतो. किंमत आपआपल्या कुवती प्रमाणे देतो. सर्व गोष्टींची किंमत मोजावी लागतेच.स्वतःला,किंवा इतरांना. आपल्या कष्टाची,स्वातंत्र्याची,निर्णयांची. सौदा पटला,तर व्यवहार होतो. मग कधी कधी किंमत आपण केलेल्या मदतीची जाणीव. ती देखील किंमतच असते.होतो तो व्यवहारच असतो. किंमत चुकवण्याचा.

गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्राचे देणे

 गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्राचे देणे. 


माझी एक मैत्रीण खूप वर्षानंतर भेटली. तिची कहाणी काही औरच होती. 

तिला तिची चूक लग्नाच्या काही महिन्यातच लक्षात आली होती. पण, तो पर्यंत दिवस गेले होते. खऱ्या अर्थाने. वर्षाच्या आतच मूल झाले आणि मग सर्व चित्रच बदलून गेले. आता, अंगावर आणखी एक जबाबदारी पडली होती. तिला चूल, मूल,आणि पैसे कमवणे,सर्वच गोष्टी एकटीला कराव्या लागत होत्या. पण,अत्यन्त धारिष्टाने,कसोशीने,आणि धीटपणे,तिने सौंसाराचा गाडा सामर्थ्याने ओढला. काळ लवकर सरत होता. मुलगी 18 वर्षाची झाली. सासर कडच्यांनी मुलीचे कान भरले. 

"तुझी आई तुझ्याकडे नीट लक्ष देत नाही. तिला फक्त पैसे कमवणे, एवढे एकमेव उद्दिष्ट."

 बाप काहीही अर्थाजन, कामधंदा करत नव्हता. घरी फाक्या मारत बसून राहायचा. बापजाद्यांची इस्टेट आहे, आणि त्या जोरावर आयुष्य भर काहीच केले नाही. आता एकटीनेच सर्व कुटुंबाचा भार पेलायला तिला अवघड जात होते. नवऱ्याकडून काहीच मदत,आधार नव्हता. एवढे सगळे करून सावरून कोणालाच त्याची जाणीव नव्हती. त्या कुटुंबात रहाणे आता तिला अशक्य झाले होते . एके दिवशी,तिने सरळ गाशा गुंडाळला आणि आयुष्य एकटीने लढायचे ठरवले. मुलगी वयात आली होती,पण तिचे कान भरण्यात आले होते आणि तिला आई बद्दल तिरस्कारच होता. मुलीच्या शिक्षणाची पूर्ण व्यवस्था माझ्या मैत्रिणीने करून ठेवली होती. 

माझ्या मैत्रिणीने ठरवले,मुलीला सत्य परिस्थिती सांगितली,तर ती सासरकडच्यांपासून सुद्धा दुरावेल. माझ्या अहंकारपोटी तिला अधांतरी ठेवण्यापेक्षा तिला सासरी सोडून, दोष स्वतःचा आहे,असे सांगून, ही नायिका बाहेर पडली आणि सासर कडून कुठलीच अपेक्षा न ठेवता,तिने आपले छोटे का होईना, स्वतःचे साम्राज्य निर्माण केले. तिच्या चुकलेल्या निर्णयाची किंमत तिला स्वतःला मोजावी लागली. ती अलीकडे भेटली. हसतमुख, आनंदी, कुठलेही किल्मिश कटुता अभिनिवेश,न्यूनगंड,न बाळगता ती तिच्या आयुष्यात सुखी दिसत होती. 

तिला विचारल्या शिवाय रहावेना. 

"तू इतके सगळे भोगून इतक्या कृतघन मंडळींना माफ कसे केलेस? कोणा बद्दल कुठलीच नेगटीव्ह भावना मनात न ठेवणे,कसे काय जमते तुला?"

तिचे उत्तर खूपच मार्मिक होते.

"दीपक, माझे भोग होते ते भोगण्या शिवाय पर्याय नव्हता. काही देणी, ही कार्मिक तत्वावर आधारलेली असतात. त्या देण्याची कारणे, हिशोब,आपल्याला ह्या जन्मी कळू शकत नाही. आपणच त्या त्या वेळी तसे तसे निर्णय का घेतो, याचे तू उत्तर देऊ शकतोस का? कार्मिक हिशोब चुकते करायचे असतात आपल्याला. तु  ह्या जन्मी ज्यांची देणी आहेत,ती परत करताना करणे शोधतोस का? एकच कारण पुरते. मी जे घेतले होते ते परत करतोय. मग मागच्या जन्मीचे देणी परत करताना फरक इतकाच,की त्या ऋणाची स्मृती नसते. पण देणे तर असतेच. उगाच त्रास करून घेतला, तर सुखाचा जीव दुःखात लोटून देतो आपण. आता ह्या जन्मात तरी कोणी नवे देणेकरी नकोत,कोणाची नवीन उधारी नको.  शेवटचा श्वास ऋणमुक्त घ्यायचा आहे मला. मनात जर कटुता बाळगली त्या सर्व मंडळींच्या बद्दल,तर ते ऋण राहील आणि ते फेडायला पुन्हा एक नवीन प्रवास. 

प्रवासाला थकले मी आता. आता एकदम कैवल्यात कायमचा मुक्काम करावा म्हणते."

         पुनर्जन्म आहे,की नाही मला माहित नाही. ह्या जन्मी जे दिले असेन, त्याचा परतावा होण्यासाठी परत यावे लागेल का? मग ह्या जन्मी दिले,ते मागील जन्माचे ऋण होते,की ह्या जन्मी नवे अकाउंट उघडत होतो? काही प्रश्न अनुत्तरित रहाणार.  उत्तरे मिळणे नाही हेच खरे. पण, तिचे तत्वज्ञान ऐकल्यावर वाटले, की त्या तत्वज्ञानाने तिचे आयुष्य नक्कीच सुखी आणि समृद्ध करीत होते. 

"गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे  देणे

माझ्या पास आता कळ्या आणि थोडी पाने"

कोणाचे किती, देणे बाकी आहे अजून कोणास ठाऊक. सरते शेवटी, ह्या अथवा मागच्या जन्माचे असेल,आयुष्य म्हणजे कार्मिक देवाण घेवाण, इतकेच असते का? हिशोब काही संपत नाही. ह्या जन्मी तर सोडाच,पुढल्या कित्येक जन्म चालूच रहाणार. कार्मिक वजा बाकी हेच आयुष्याचे अटळ सत्य. 


Dr Deepak Ranade.

रीसेट बटन

 रीसेट बटण


मोबाईल वर सकाळपासून काम करत होतो. प्रेझेंटेशन करायचे होते डिपार्टमेंटचे. स्लाइड्सवर काम चालू होते. आणि एकाएकी मोबाईल  हँग झाला. काही केल्या डिस्प्ले वर काहीच दिसत नव्हते. सर्व करून पाहिले. फोन स्वीचऑफ करून पाहिले,पण काहीच केल्या तो चालू होईना. 

शेवटी एका मित्राला विचारले आणि त्याच्या सल्ल्याने "रीसेट टू कंपनी सेटिंग" बटन दाबले. 

बराच डेटा डिलीट झाला. पण त्याला पर्याय नव्हता. फोन चालू करायचा तर स्टोर केलेला सर्व डेटा साफ होणार होता. पुन्हा पहिल्यापासून  प्रेझेंटेशन वर काम सुरू केले.

जेमतेम काम उरकले आणि हॉस्पिटल मध्ये निघालो. 

गाडीत विचार करत होतो. 

मोबाईल मध्ल्या डिलीट केलेल्या डेटा बद्दल आणि रीसेट बटणाबद्दल. डेटा गेला,पण तो किती गरजेचा होता? 

डिलीट झाल्यामुळे माझे नेमके किती नुकसान झाले? पाच सहाशे फोटो, कॉन्टॅक्टस, काही फाइल्स, आशा स्वरूपचा डेटा. ई-मेल तर सर्व क्लाऊड वर होते, बरेच फोटो देखील क्लाऊड वर synch झाले होते. 

     रीसेट बटणाने मोबाइल पुन्हा नव्याने चालू झाला. 

आयुष्यात सुद्धा काही वळणावर रीसेट बटण दाबावे लागते. आपल्या भावना,आठवणी,आवडी -निवडी,जवळच्या व्यक्ती, सर्व डेटा साठलेला असतो. काही परिस्थितींमुळे समीकरणे बदलतात आणि लक्षात येते,की डेटा corrupt झाला आहे,आणि मन हँग होते. 

काहीच केल्या मनाची हार्ड डिस्क काम करायचे बंद करते. 

'रीसेट टू कंपनी सेटिंग" चे बटण दाबावे लागते. 

सर्व डेटा डिलीट करावा लागतो. क्लेश होतात. 

काही डेटा जो क्लाउड वर sync केलेला असतो,तो retrieve करता येतो. 

रीसेट बटण दाबून टाकायचे बिनधास्त. जोपासून ठेवलेला डेटा अनावश्यक आहे, हे डिलीट केल्यावर जाणवते. कारण काहीच अडत नाही आणि उलटे, आयुष्य जास्त सुटसुटीत होते. 

रीसेट बटण दाबायला थोडे मन घट्ट करावे लागतेच.

डेटा कुरवाळायची सवय लागलेली असते. डेटा डिलीट झल्यावर थोडा वेळ, हार्ड डिस्क रिकामी रहाते. 

हार्ड डिस्कवर डेटा नाही??अरे बापरे. मग काय करू? मनाची हार्ड डिस्क रिकामी राहूच शकत नाही.

Corrupted डेटा असला तरी चालेल, पण डेटा हवाच. 

हार्ड डिस्क रिक्त करायला थोडे धारिष्ट,थोडा कठोरपणा,थोडी निर्दयता लागते. पण हँग झालेल्या मनाला पुन्हा चालू करायचे असेल,तर रीसेट बटणाला दाबावे लागतेच. रीसेट बटण दाबले,की डेटा गेला,तरी त्या जुन्या पुरण्या डेटावर आधारित दृष्टिकोन,अभिप्राय,नाती,आभास,सर्व काही डिलीट होतात. नवा गडी,नवा राज. क्लाऊड वर बॅकअप केलेला डेटा सुद्धा रिस्टोर करताना खूप विचार करून करावा. 

काही क्लाऊडवरचा डेटा सुद्धा डिलीट करावा लागतो. उगाच भावना प्रधान न होता, विवेक बुद्धी वापरून सिलेक्टिव्ह डेटा रिस्टोर करावा.

मोबाईल ची स्पीड वाढते, तसे मन सुध्दा चपळ होते. उगाच corrupted डेटा मध्ये रेंगाळत बसत नाही. 

चला तर मग. 1,2,3........

"रीसेट टू कंपनी सेटिंग."


Dr Deepak Ranade

आयुष्याचे गणित

 आयुष्याचे गणित.


सकाळचे 9.30 वाजले होते. नानांची पूजेची वेळ. त्यांची लगबग चालू होती. जानवे पाठीवर चोळत ते फुले  ताम्हनात घ्यायला ओट्यापाशी पोचले. 52 वर्ष संसार केलेली त्यांची पत्नी त्यांना बघत होती. त्या माउलीला श्वास घेणे जड जात होते. अर्धांगवायू झाला होता तिला,आणि ती अंथरुणाला खिळूनच होती. फुफुसांचा विकार असल्यामुळे,तिला सतत ऑक्सिजन मास्क मधून घ्यावा लागायचा. तिला सकाळपासूनच  श्वास घ्यायला त्रास होत होता. छातीचा भाता, जमेल तेवढे जोर लावून ती माऊली दमली होती.  येणारे मरण आता पुढच्याच वळणावर थांबले आहे,याची जाणीव होती. 

  गेल्या 2 वर्ष,अंथरुण धरल्या पासून नानांनी तिची सर्व शुश्रूषा अगदी अचूक केली होती. रोज रात्री,वेळी अवेळी उठून,डायपर बदलणे, पाणी आणून देणे, ही नित्याची ड्युटी ते चोख बजावायचे. नाना हे अत्यन्त कर्तृत्ववान. घरच्यांशी भांडण झाल्यावर, बायको आणि 2 मुली सोबत घेऊन त्यांनी 2 छोट्या खोल्यांमध्ये संसार थाटला. अपार कष्ट,कामात अतिरेकी प्रामाणिक,एकही दिवस सुट्टी न घेणारे आदर्श अकाउंटंट. त्यांनी अथक 33 वर्ष चाकरी केली,आणि रिटायर झाल्यावर त्यांच्या मालकांनी रीतसर सर्व ग्रॅचूईटी, फंड सर्व देऊन पुन्हा दुसऱ्या दिवसापासून ऑनररी नेमणूक केली. त्यांच्या प्रमाणिकतेची किंमत अनमोल होती. नानांना एकदा जवाबदारी दिली की विषय संपलाच. त्यांच्या आयुष्यात त्यांनी खचितच कधी  चूक,अथवा हलगर्जीपणा केला नसेल. आपल्या प्रमाणिकतेचा,कर्तबगारीची,आणि सरळ पडणाऱ्या पाउलचा त्यांना प्रचंड अभिमान. अभिमान,की अहंकार? कोणास ठाऊक. पण सगळी नातेवाईक मंडळी त्यांचा खूप आदर करत.  2 पोळ्या आणि भाजीचा डबा, तीच स्कुटर,तोच रस्ता,तीच बॅग,आणि तीच ठरलेली वेळ. 33 वर्ष. आयुष्याचे ठोकताळे अगदी गणिती. कोणाकडून कधीच काही घेतले नाही,ह्या आत्मनिर्भरतेचा प्रचंड अभिमान. नानांना कधीच रिकामे बसलेले कोणीच बघितले नाही. दिनचर्येत प्रत्येक क्षणाला काय करायचे,हे पूर्वनियोजित.अगदी रोबॉटीक आयुष्य. रुमालाची घडी कशी घालावी,इथ पासून,ते स्टेपलेर च्या क्लिप्स हॉल मधल्या लाकडी कपाटाच्या उजव्या बाजूच्या वरच्या ड्रॉवरच्या डाव्या कोपऱ्यात प्लास्टिकच्या डब्बीतच. त्यांच्या आयुष्याचे मूलभूत तत्व-

A place for everything and everything in its place. 

साचेबंद आयुष्य.  काही साच्या बाहेर असू शकतच नव्हते. नानांच्या या गणिती आयुष्यात भावनांना जागा नव्हती. भावना,ओलावा,लवचिकता,सहृदयता ह्या गणितात बसवणे शक्य नाही. गणित या विषयाला कोरडेपणाचा शाप असतो. थोडेफार इकडे तिकडे, तेवढं समजून घ्या, हा अघळपघळपणा गणितात वर्ज. नानांनी घर सोडले, त्याचे मूळ कारण त्यांच्या पत्नीवर केलेले खोटे आरोप. आईनेच आपल्या पत्नीवर केलेले नानाविध आरोप सर्रास खोटे आहेत हे ठाऊक होते नानांना. त्यांच्या अहंकाराला ठेच लागली. पण आपल्या सहचरिणीची बाजू घेऊन घरच्यांना तोडीसतोड उत्तर न देता, त्यांनी सामान आवरून परत त्या घरची वाट धरली नाही. 

अपमान त्यांच्या पत्नीचा झाला,हे महत्वाचे नव्हते. त्यांचा अपमान झाला होता. नानांच्या पत्नीला बोलले होते घरचे. घोर अपमान. 

त्या माउलीने एकही शब्द न बोलता पोटच्या 2 मुली आणि तुटपुंजा संसार खकोटीला घेऊन नानंबरोबर तिने घर सोडले. तिचा अपमान झाला होता हा विषय कधीच चव्हाट्यावर आला नाही.

नानांनी पुनश्च अगदी सुतातून संसार सुरू केला. खाऊन पिऊन सुखी आशा थाटात पुढची अनेक वर्षे लोटली.

नानांची नियमावली, त्यांची गणिते,त्यांचं मोजून मापून जगलेले आयुष्य. त्यांनी त्यांच्या बहिणीच्या संसारात आलेल्या अडचणी अनेकदा सोडवल्या. त्या सोडवण्यात देखील,त्यांच्यावर बेजबाबदरीचा आरोप कोणी चढवू नये,हा गणिती हेतू. चौकटीतील नियमावली ही महत्वाची. कालांतराने मुलींची रीतसर लग्ने लावून दिली. त्याचे गणिती प्रयोजन त्यांनी करून ठेवलेच होते. 

आयुष्यातल्या परीक्षेत पडलेले सगळे प्रश्न त्यांनी अचूक उत्तरे देत सोडवले. आयुष्यतली गणिते  नीती आणि रितीचे फॉर्म्युले वापरून नानांना पैकी च्या पैकी मार्क मिळाल्याचा अभिमान त्यांच्या वर्तणुकीत आणि डोळ्यात ठासून भरलेला स्पष्ट दिसायचा. 

      आता वर्धक्यात सुद्धा,स्वतःची कामे स्वतः करण्यात ते व्यस्त असायचे. बायकोच्या आजारपणात त्यांनी तिची पूर्ण देखरेख केली होती.

कोणी कुठलाच आक्षेप घेणार नाही, असा चोख कारभार. रात्री वेळी अवेळी नुसती त्या माउलीने हाक द्यायची खोटी. नाना ताडकन उठून तिच्या सेवेस हजर. 

    एकदा त्या माउलीने सहज नानांना सुचविले,की मी देह सोडल्यावर तुम्ही आपल्या थोरल्या मुलीच्या घरी मुक्कामाला जा. हे ऐकताच नानांनी तिला फैलावर घेतले.

"तुला अक्कल आहे का? मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही. मला कोणाचीच मदत लागत नाही. माझं मी बघून घेईन."

त्या माऊलीच्या डोळ्यच्या कडा ओलावल्या.

म्हंटले,तर तिच्या नवऱ्याने तिची अहोरात्र सेवा केली होती. नाव ठेवायला कुठेच जागा नव्हती. कधी कधी तिला ह्यांनी जवळ बसून केसातून हात फिरवावा, एवढी क्षुल्लक अपेक्षा तिने केली होती. पण ते होणे नाही,याची त्या माउलीला जाणीव होती. तिने ते सत्य स्वीकारले होते. गणिताच्या रुक्ष कोरडेपणात भावनांचा ओलावा कधीच नसणार हे तिला माहीतच होते. 

आता, ती शेवटचा श्वास घ्यायच्या मार्गावर होती. 

तिला बोलणे देखील अवघड होते. नाकावर ऑक्सिजन चा मास्क होता. तिने खुणावून नानांना बोलावले. नाना त्यांच्या पूजेत गर्क होते. त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. पूजेत व्यत्यय झालेला त्यांना अजिबात खपेना. मना विरुद्ध ते ताम्हन खाली ठेऊन तिच्या जवळ आले. 

तिच्या डोळ्यातुन आसवे ओघळत होती. तिला त्यांचा अखेरचा निरोप घ्यायचा होता. तिने हात वर करीत नानांचा हात हातात घ्याचा होता.

नानांनी हातात बेलाची पाने आहेत, असे खुणावून दाखवले.

त्या माऊलीने उचललेला हात पुन्हा हळूच खाली ठेवला. आणि पुढच्या क्षणी,तो हात निश्चल झाला होता. 

नानांनी तिच्या नाकाजवळ  बेलाची पाने असलेला हात नेऊन,ती श्वास घेत नाही हे तपासले. 

पूजेत खंड झाला होता. 

बेलाची पाने त्यांनी परत फुलांच्या ताम्हनात ठेवली. 

आता,गणिती पद्धतीने तिचे पुढील सोपस्कार नाना अचूक बजावण्या मागे लागले. 


Dr Deepak Ranade.

बिंब प्रतिबिंब



        बिंब- प्रतिबिंब


प्रतिबिंबाने बिंबाला उधळले

कसे, कधी बिंबालाही नाही कळले

बिंब होते लोभस,निर्मळ,शुद्ध

होते  स्वयं, अव्यक्त  बुद्ध

अपेक्षांच्या चिखलाने सारे मळले

प्रतिबिंबाने बिंबाला उधळले


प्रतिबिंबाला नव्हतेच कधी बिंब पसंत

नसलेल्याचीच होती असलेल्या पेक्षा खंत

बिंबाला सुधारण्याचे केले प्रयत्न कोरून

व्यर्थात टाकले बिंब पूर्ण पोखरून

प्रतिबिंबाने बिंबाला उधळले

कसे,कधी,बिंबालाही ना कळले


बिंबाला नव्हती कोणतीही आसक्ती

स्वयंसिद्ध, जाणिवेत केवळ अद्वयभक्ती

प्रतिबिंबाने जागविला द्वैताचा भास

आरंभला काम, क्रोध,वासनेचा प्रवास

प्रतिबिंबाने बिंबाला उधळले

कसे,कधी,बिंबालाही ना कळले


प्रतिबिंबाने बिंबाला चकवले क्षणात

बिंबाच्या अस्तित्वावर केला आघात

तू खोटा मीच खरा अवघे भासवले

बिंबाच्या पावित्र्याला सहजच नासवले

प्रतिबिंबाने बिंबाला उधळले

कसे कधी बिंबलाही ना कळले


बिंबाला कधी होणार साक्षात्कार

बिंबाचे स्वरूप  निर्गुण निराकार

प्रतिबिंब काल्पनिक, क्षणिक नश्वर

बिंब स्वतःच साक्षात परमेश्वर

प्रतिबिंबाला बिंब जेव्हा उधळेल

 तेंव्हाच बिंबाला बिंबत्व कळेल


डॉ दीपक रानडे

डब्बे संसार आणि बरेच काही

 डब्बे आणि सौंसार


"अगं, तुला पर्वा सुरळीच्या वड्या दिल्या होत्या ना,तो डब्बा जरा प्लीज दीपक बरोबर परत पाठव"

लहानपणी, मी शेंडेफळ असल्यामुळे असली किरकोळ कामे माझ्याच पदरी पडायची. मग सायकल वर टांग मारून त्या कुसुम सोसायटी मधल्या मावशिंकडे वाटचाल करायची.

तो प्लास्टिकचा 5 ईंची डब्बा आणायला माझा वापर केला गेला,याचे दुःख आणी त्याहून अधिक कमालीचे आश्चयर्य आणि थोडा संताप.

एवढे काय सोने लागले होते त्या डब्ब्याला? प्लास्टिकचा दीड दमडीचा तो डब्बा. आईसक्रीम चा कधीतरी आणलेला फॅमिली पॅक चा तो डब्बा. आईने तो धुवून पुसून तिच्या नेटक्या सौंसरात त्याला योग्य जागा नियोजित करून दिली होती. तसे आमचे कुटुंब खाऊन पिऊन सुखी,इतकेच. आईने टूकीने सौंसार केला होता. राहण्या खाण्याच्या गोष्टींमध्ये कुठलीही काटकसर नव्हती. मग ह्या प्लास्टिकच्या डब्ब्यात काय एवढा जीव अडकलेला होता तिचा? 

     स्वयंपाकघर म्हणजे आईचे साम्राज्य होते. 

'Everything in its place, and a place for everything.'

     अगदी  क्वचित कळी आई बाहेर असली आणि बहिणीला काही नवीन रेसिपी करायला किचन मध्ये काहीतरी हवे असले,तर ती आईला मैत्रिणीकडे फोन करायची आणि मग आई तिला

"फ्रिजच्या बाजूचे कपाट उघड. डाव्या बाजूला,वरच्या कप्प्यात,कोपऱ्यातून तिसरी,हिंगाची छोटी डबी असेल. त्या डब्बीवर एक छोटी प्लास्टिकची डब्बी आहे. त्या डबीत खसखस आहे. 

    इतक्या छोट्या डब्ब्यांची तिला अचूक पॉझिशन, माहीत असायची. 

   हळदी कुंकू, भोंडला,डोहाळे जेवण,आशा बायकी 

गेट टुगेदर  सोहळ्यामध्ये बरेचदा छोट्या स्टीलच्या डब्या भेट म्हणून दिल्या जायच्या. मला ह्या छोट्या डब्यांविषयी  खूप कुतूहल असायचे. पण, आईच्या सौंसरात त्या डब्यांचे जरा अधिकच महत्व आहे,याचे कारण उमजेना. 

कधी कधी, शेजारच्या मावशी आईला छोट्या डब्यात कालवण द्यायच्या. त्या CKP होत्या,आणि बिरड्याचे कालवण म्हणजे आहाहा.  त्या वयात ते आम्हाला पुरतच नसे. तरी, त्याचा स्वाद,आणि लज्जत काही औरच. मग,तो डबा धुवून,आमच्याकडे नारळ घालून पडवळाची भाजी,असेच काही खास बनवले,की त्या डब्याच्या माध्यमातुन cultural exchange व्हायचा. 

डबा कधीच रिकामा नाही परत करायचा. हे डब्याच्या राजकारणातला अत्यन्त म्हत्वाचा नियम. 

कधीकधी,आईने बाजूच्या जोशी काकूंकडे असाच एखादा खाद्य पदार्थ पाठवलेला असायचा.  मावशिंकडून डबा परत करायला थोडा उशीर झाला,तर आईचा जीव वरखाली व्हायचा. मग एखाद दोन दिवस वाट बघून,दुपारी आईचा मावशिंकडे फेरफटका असे.

"अहो जोशी वहिनी,पर्वा सांडगे पाठवले होते तो जरा डब्बा द्याल का? अहो जाऊबाईना थोडे लोणचे पाठवावे असे म्हणते."

कसले लोणचे,आणि कशाला आई काकुला लोणचे देणार? पण तो डबा परत मिळाला नाही तर? 

डबा. खरच किती छोटी गोष्ट.

आता, काही करणासत्व स्वतः  किचन मॅनेज करतो. पर्वा, एक पॉटलक पार्टी ला गेलो होतो.  मी, आमचा अंजना बाईने बनवलेली भाजी एका छोट्या डब्यात घेऊन गेलो होतो. 

खूप धमाल अली पार्टीला.

निघताना,मी मैत्रिणीला म्हणालो-

"अंग जरा तो प्लास्टिकचा डबा विसळून देशील का? "काही भरू नकोस त्यात  पण डबा प्लीज दे."

तिने जरा कुत्सित स्वरात विचारले

"एवढे काय मोलाचे लागले रे त्या डब्याला?

तेव्हा मला एकदम जाणवले.

काही गोष्टींचे मोल त्यांच्या किमतीवर अवलंबून नसते. त्यांची किंमत त्यांच्या उपयुक्तते नुसार ठरते. तो प्लास्टिकचा  डबा होता अगदी दीड दमडीचाच. पण वेळेला,पटकन काहीतरी पॅक करून न्यायला लागते,तेव्हा त्या डब्याचे मोल जाणवते. सौंसरात पडल्यावर बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात. 

त्यातला महत्वाचा एक चॅपटर म्हणजे डब्याचे महत्व.

मैत्रिणीने रीती प्रमाणे डब्यात शंकरपाळे दिले होते. ते तोंडात टाकत त्या डब्याला भरभरून आशीर्वाद देत, घराची वाट धरली.


Dr Deepak Ranade