Sunday, November 7, 2021

श्रद्धास्थान

 श्रद्धास्थान


रुग्णाच्या नातेवाईकांबरोबर संवाद साधणे,हे सर्जनचे शस्त्रक्रियेच्या अगोदरचे एक महत्वाचे काम असते. 

मेंदूची शस्त्रक्रिया,म्हणजे सर्व नातेवाईकांची चांगलीच तंतरलेली असते. 

आमच्या पेशंटला ऑपरेशन नंतर नॉर्मल आयुष्य जगता येईल का? ऑपरेशन नंतर शुद्धीत यायला कितीवेळ लागेल? ऑपरेशन करण्यात किती धोका आहे?

ऑपरेशन यशस्वी होण्याची काय गॅरंटी आहे? 

अनेक प्रश्न. काहींची उत्तरे देऊ शकतो,काहींची उत्तरे देणे अशक्य. गॅरंटी वगरे मुद्दे काढले,की मग,मी शांतपणे त्यांनाच उलट प्रश विचारतो.

" मी उद्या सकाळी जिवंत असून, ऑपरेशन करायला वेळेत पोचेन, याची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का?"

प्रश्न विचारणाऱ्या व्यक्ती एकाएकी शांत होतात. गॅरंटी. पुढच्या श्वासाची शाश्वती नसताना, मग 5 तास चालणाऱ्या, मेंदूच्या अवघड ठिकाणी असलेल्या गाठ काढण्याच्या ऑपरेशनची गॅरंटी देणारा मी कोण? 

मी देव,हा anthropological (व्यक्तिसापेक्ष,सगुण साकार) असल्याचे मानत नाही. व्यक्तिसापेक्ष देव म्हंटला,की मग त्या देवाला खुश ठेवणे,त्याला आमीष दाखवून,सौदेबाजी करणे, तो शब्द न पाळल्यास त्याचा कोप होणे, हे सारे ओघाओघाने आलेच.

काही नातेवाईक ऑपरेशनच्या दिवशी कडक उपास करतात, नवस बोलतात,अखंड जप चालू ठेवतात. 

परमेशवर हा खरोखर इतका अहंकारी असेल का? श्रद्धा म्हणजे त्या व्यक्तिसापेक्ष देवाला खुश ठेवणे, त्या देवाचा अखंड जप करणे, असेच का? 

कदाचित, हा सारा खटाटोप मनाला शांत ठेवण्यास उपयोगी पडत असेल. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक आशेचे निरंजन तेवत ठेवायचे. 

श्रद्धा,ही कुठल्यातरी ठोस व्यक्तिसापेक्ष देवावर असल्यास,त्या दैवताशी संभाषण साधता येते. हट्ट करता येतो. मनातील इच्छा बिनधास्तपणे व्यक्त करता येतात. 

   मी ऑपरेशन सुरू करायच्या अगोदर hands scrub करताना मनात एक छोटीशी प्रार्थना म्हणतो.

माझ्या हातात नसलेल्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणारी ती अधिभौतिक शक्ती, त्या शक्तीला अभिवादन करतो. त्या शक्तीला माझ्या हातावर वास करण्यासाठी आमंत्रित करतो. ती अज्ञात शक्ती,माझ्या कल्पनेच्या पलीकडची आहे, याची जाणीव असते. मी सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेऊ शकतो, ऑपरेशन 100 टक्के यशस्वी करणे हे सर्वस्वी माझ्या हातात असण्याचा उन्मत्त फाजील अहंकार न बाळगणे, हे ऑपरेशन चांगले होण्यासाठी खूप महत्वाचे. 

माझ्या दृष्टीने श्रद्धा ही माणसाचा अहंकारावर अंकुश ठेवण्याचे एक अमौलीक साधन. केवळ स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर आत्मविश्वास बरेच वेळा घातक ठरू शकतो. 

माझी श्रद्धा,-  मी चूक करू शकतो , माझ्या हाता बाहेर बऱ्याच गोष्टी असतात, याचा भान राखणे. ऑपरेशन करण्यापूर्वी थोडी भीती असतेच. ही भीती देखील श्रद्धेचीच अभिव्यक्ती असते. अनेकदा, ओव्हरकॉन्फिडेन्स मुळे, अडचणीत सापडलेले,पाहण्यात आहेत. श्रद्धा म्हणजे कुठेतरी नतमस्तक होणे. नतमस्तक कोणाला होता,हे महत्वाचे नसते. शस्त्रक्रिया करताना प्रत्येक स्टेप ही केवळ माझ्या बुद्धीतून ठरवली जात नसते. बरेचदा, instinct च्या आधारे,शस्त्रक्रियेतील काही भाग करावा लागतो. एखाद्या महत्वाच्या रक्तवाहिनी जवळ चिकटलेली गाठ सोडवताना नकळत देवाचे नाव ओठांवर आपोआप तरंगायला लागणे, ही श्रद्धा. ऐन वेळेला सुचलेली एखादी स्टेप, विशिष्ट ठिकाणी ठराविक instrument वापरण्याचा निर्णय,आकस्मित होणारा रक्तस्राव काबूत आणण्यासाठी ती रक्तवाहिनी अचूकपणे coagulate करता येणे,आणि हे सर्व करीत असताना, भूलतज्ञानकडून रक्त दाब, ऑक्सिजन saturation व्यवस्थित नियंत्रित होणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे. असल्या  बऱ्याच गोष्टी जेव्हा व्यवस्थित घडतात, आणि रुग्ण बरा होतो,नातलग मनपूर्वक आभार प्रदर्शन करतात. आशा वेळी, ती  शस्त्रक्रिया यशस्वी होण्यामागे त्या अज्ञात शक्तीचे समरण करून, काहीही अनपेक्षित अघटित घडले नाही, यासाठी त्या शक्तीचे आभार मानून, नम्रपणे त्यांचे कौतुक कबूल करणे,म्हणजे श्रद्धा. 

आयुष्यात काही कडक नास्तिक मंडळी सुद्धा भेटली. त्या व्यक्तींच्या अविर्भावातून, आपण नेहेमीच बरोबर असतो, एक कुत्सित self righteousness त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवतो. ही मंडळी बरीच यशस्वी सुद्धा असतात. त्यांच्या यशाचा,त्यांच्या गुणांचा त्यांना सार्थ अभिमान असतो.  त्यांच्या वागणुकीत,"आपल्या हातून कधीच चुका होऊ शकत नाही" चा दर्प असतो. 

त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिल्यास, ते मोठ्या शिताफीने,त्यांची बाजू मांडतात आणि आपणच कसे बरोबर होतो,हे पुनःश्च सिद्ध करतात. असल्या मंडळींच्या बद्दल नेहेमीच कुतूहल वाटते. They wear an armour of infallibility. अचूकतेचे कवच. 

ह्यांना कुठलेतरी श्रद्धास्थान असते का? ह्यांना त्यांच्या चुका समजतच नाहीत का?  की त्या समजल्या,तरी कबूल करण्याचा मोठेपणा नसतोच? नाही मला या प्रश्नाचे उत्तर सापडले अजून. चुकलेल्या निर्णयामुळे, चुकलेल्या वागणुकीमुळे झालेले नुकसान पेलण्याचे सामर्थ्य असते या मंडळींमध्ये. कोणाचेच कोणा वाचून अडत नसते,हे तर ब्रह्मसत्य आहेच. त्यामुळे असल्या मंडळींचे आयुष्य अगदि व्यवस्थित चालू राहते. 

आपल्याकडे त्रयस्थपणे बघणे,ही श्रद्धा. आपल्या वागणुकीत किंवा बोलण्याने जवळचे दुखवले जाऊ शकतात, ही जाणीव म्हणजे श्रद्धा. 

श्रद्धा,म्हणजे केवळ कुठल्या दैवतावर असलेला दृढ विश्वास नाही. श्रद्धा म्हणजे,आपण परफेक्ट नाही,आपल्या हातून सुद्धा चुका होऊ शकतात, ही जाणीव. श्रद्धा म्हणजे माणसाला माणूस असण्याची  असलेली जाणीव.श्रद्धा म्हणजे  माणसाचा माणुसकीत असलेला विश्वास. 


Dr Deepak Ranade.

एकांत

 एकांत. 


नुकताच हिमालयात एक अवघड पण डोळ्याचे पारणे फिटणारा ट्रेक केला.

या ट्रेकचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, स्वतःला स्वतःचा  तंबू उभारावा लागायचा. हिमालयाच्या रौद्र पण अविसमरणीय रांगड्या सौंदर्यात,निसर्गाच्या कुशीत, अगदी थेट डोंगरावर तंबू ठोकून, दमलेले शरीर आणि डोंगराच्या मध्ये फक्त एक ग्राऊंडशीट. स्लीपिंग बॅग मध्ये शिरून मग एकटेच तंबूमध्ये विसावायचे. 

असेच एका रात्री एकाएकी पहाटे 3 ला जाग आली. लघुशंका उरकण्यासाठी तंबूतून बाहेर पडलो. ती रात्र मंत्रमुग्ध करणारी होती. चांदण्यात समोरची हिमशिखरे मंद प्रकाशात चकाकत होती. डोक्यावर अथांग अखंड आकाश आणि त्यामधील अगणित तारका. हलक्या मंद वाऱ्याची झुळूक चेहेऱ्याला कुरवाळत होती.

एकांत. स्वतःच्या श्वासोश्वासाचा आवाज ऐकू येत होता. टेंटच्या फ्लॅपच्या मधूनच फडफडण्याचा निनाद. 

या अथांग निसर्गात तो तंबू म्हणजे,सागरात एक छोटासा बुडबुडा असल्याजोगे. त्या एकांतात नात्यांचे,रुणानुबंधांचे भावनिक पापुद्रे गळून पडले होते. माझ्या नग्न अस्तित्वाची जाणीव होत होती. कोहम कोहम हा प्रश्न सतत डोके वर काढत होता. 

मी स्वतःला नेहेमीच नातेसंबंधाच्या चष्म्यातून बघत होतो. माझ्या आयुष्याचा अर्थ इतरांच्यावर अवलंबून असतो का? माझे विचार माझ्या आईच्या दिशेने वळले. तिने गेली 10 वर्षे माझ्या दिवंगत वडिलांसाठी झुरत आयुष्य ढकलले आहे.  ते गेल्यावर देखील ती ते नाते एक भावनिक कुबडी म्हणून वापरत होती. तिला कितीही समजावून सांगितले,तरी तिला बदललेले वास्तव कबुलच करायचे नव्हते. नाती,ही आयुष्यात किती महत्वाची असतात? वैयक्तिक माझ्या आयुष्यात नुकतेच नात्यांची उलथापालथ झाली होती. Do relationships define me? माझे आयुष्य नात्यांचे मिंध्ये आहे का?

 तंबू उभारताना 5 ते 6 लोखंडी पेग्स जमिनीत खोचून,मग त्या तंबूच्या कडांमधून 2 वाकणार्या फोल्डिंग रॉड्सची फ्रेम वापरवी लागायची. तेव्हा तो तंबू उभा रहायचा.  आपल्या अस्तित्वाला देखील असेच नात्यांचे टेकू देऊन आणि रुणानुबंधाची फ्रेम लावून उभे राहतो का आपण ? 

मन,बुद्धी,अहंकार,नाती,ऋणानुबंध,हे आयुष्यातील अविभाज्य घटक असतात. हे अस्तित्वाच्या तंबूचे पेग्स खोचून,मग स्वत्वाचा  तंबू ठोकायचा. एखादा पेग उचकटला,तर अस्तित्व धोक्यात आल्याचे भय. 

तंबूत असे पर्यंत सुरक्षित वाटते. तंबूच्या बाहेर पडल्यावरच भोवतालच्या अथांग अवकाशाची जाणीव होते. कोहम,या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळणार नाही, पण जेव्हा या स्वनिर्मित तम्बूचे सर्व पेग्स उखडून टाकता येतील, तेव्हा कोहम हा प्रश्न विचारणारा देखील नसणारे. बुडबुडा सागरात काहीच काळ आपल्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारू शकतो. त्याचे सागरात वेगळे अस्तित्व किती काळ राहणार? कधीतरी नकळत,तो सागरात विलीन होणारच. आत्मचिंतन करता करता गारठलो आणि त्या आनंतातून पुन्हा माझ्या सुरक्षित संकुचित तंबूत शिरलो. 

त्या विशाल पर्वताच्या कुशीत विचार करता करता कधी डोळा लागला कळलेच नाही. 

सकाळी टेंटचे पेग्स काढताना चेहऱ्यावर एक विलक्षण भाव होता, हे मात्र नक्की.


Dr Deepak Ranade.

वो अफसाना जीसे अंजाम तक

 वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन 

उसे इक ख़ूब-सूरत मोड़..........


3 तास झाले होते. तो ट्युमर अत्यन्त किचकट आणि चिवट होता. मेंदूच्या अगदी डेखा पासून पुढील डोळ्याच्या मागील भागात पसरला होता. त्या ट्युमरने मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या सर्वात महत्वाच्या रक्तवाहिनीला (carotid artery) पुर्ण विळखा घातला होता. तो ट्युमर अवघ्या मध्यम आकाराच्या पेरू एवढा होता. पेशंट 62 वर्षाची माऊली होती. तिचा रक्तदाब काही केल्यास नियंत्रणात येत नव्हता. सर्वसाधारणतः मेंदूची शस्त्रक्रिया करताना रक्तदाब 70 ते 80 mm ला खाली ठेवला जातो. ट्युमर मधून होणाऱ्या रक्तस्रावावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे खूप मोलाचे साधन असते. पण या माऊलीचा रक्तदाब काही केल्यास 140 mm पेक्षा खाली येतच नव्हता. अशाच काही बिकट परिस्थितीत त्या ट्युमरने मारलेली घट्ट मिठी हळू हळू सोडवण्याचे काम चालू होते. प्रत्येक ट्युमर वेगळा असतो. प्रत्येक ट्युमरचे आपापले एक unique व्यक्तिमत्व असते. काही ट्युमर मऊ असतात,काही कडक. काही मेंदूला घट्ट मिठी मारून बसतात,तर काहींच्या मिठीची पकड थोडी शिथिल असते. काही ट्युमर इतके काही मेंदू सारखेच दिसतात,की नेमका ट्युमर कुठचा,आणि नॉर्मल मेंदू कुठचा,हे कळणे कर्म कठीण. 

Tissue texture, म्हणजे, इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने स्पर्श करून, त्या स्पर्शावरून  ट्युमर की नॉर्मल मेंदू, याचा तपास करावा लागतो.

आजचा ट्युमर खूपच चिडका होता. थोडासा तुकडा काढला तरी लगेच भुसभुस रक्तस्राव चालू. प्रत्येक ट्युमरचे वेगवेगळे स्वभाव. काहींना गोंजारत गोंजारत विनवण्या करीत अलगद हळुवारपणे मिठी सोडवावी लागते. काहीवेळा,थोडा आक्रमक पवित्रा घेऊन, एखाद्या तटस्थ ट्युमवर तुटून पडावे लागते. ट्युमरशी झुंज देता देता, पहिल्या तासातच ट्युमरचा चांगला परिचय होतो. मनोमनी ट्युमरशी संवाद साधायला सुरू करतो.

Microscope वेगवेगळ्या दिशेने फिरवत त्या ट्युमरला वेगवेगळ्या angle ने बघावे लागते. कधीकधी मनात त्या ट्युमर बद्दल विलक्षण आदर वाटतो. ह्या ट्युमर बरोबर अजिबात शहाणपणा चालणार नाही,ह्या ट्युमरला घाबरायचे काहीच कारण नाही, असे मनोमनी ठोकताळे बांधायचे. ट्युमरशी शत्रुत्व न बाळगता,प्रेमाने त्याचा विळखा सोडवायचा,हेच धोरण योग्य. 

आजचा ट्युमर मात्र मेंदूच्या जरा जास्तच प्रेमात होता. त्याने मारलेली मिठी सोडवणे कर्म कठीण. खूपच गुंतागुंतीचे नाते होते. जोर लावणे,हा पर्याय नव्हता. त्या ट्युमरच्या घट्ट आणि ताकदवान बाहुपशातून सोडवले, हात सोडवून झाले होते, पण शेवटची करंगळी सुटता सुटत नव्हती. 

   ट्युमरचा तो एक इवलासा भाग रक्तवाहिनीशी जसा काही एकजीव झाला होता. सोडवताना हृदयाचे ठोके वाढत होते. AC असून देखील,भोवयीवर टेन्शन घामाच्या बिंदूच्या रूपाने झीरपले होते. जाऊदे. 

दोन मिनिटे, microscope बाजूला केला आणि 5 ते 6 मोठे श्वास घेतले. 

ट्युमरचा तो भाग काही केल्या सुटत नव्हता. तो सोडवण्यासाठी जीव धोक्यात टाकायचा, की नाही,हा अवघड निर्णय घेण्याची वेळ येते. 

खूप प्रयत्न करून देखील तो क्षण येऊन ठेपतो. काही नात्यांचा पूर्ण विळखा काहीही केल्यास सुटत नाहीच. आपला थोडासा भाग मग तसाच ठेवावा लागतो. ती करंगळी तशीच रेंगाळत ठेवून द्यावी. कदाचित विळख्याच्या ताकदीची आठवण म्हणून.

    एकदम साहिरच्या  त्या  अविसमरणीय गाण्याच्या ओळी समरल्या.

वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन,

असे इक खूबसुरत मोड देकर  छोडना   अच्छा............


काही वेळा, काहीतरी सोडून द्यायला देखील किंमत मोजावी लागते. आपल्या अहंकाराची. 

जैन तत्वज्ञानात ह्याला अवमौदार्य असे म्हणतात. शिखर सर करायची पूर्ण क्षमता असताना देखील, शिखर सर न करता शिखराच्या अलीकडे थांबायचे.

शिखर सर केल्याने अहंकार बळावतो. 

"Discretion is the better part of valor."

नम्रपणे माघार घेणे,ह्यातच शहाणपणा. 

सुदैवाने, पेशंटचा रक्तदाब वगरे इतर सर्व parameters stable झाले आणि मग closure करायला सुरुवात केली. 

अनाहूतपणे,एक गाणे गुणगुणत होतो. 

"स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकात केव्हा

गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा "


Dr. Deepak Ranade.

4 As to 8As

 Lifelong obsession with the 4 As. 


I was reminiscing about the book Fountainhead the other day. The memories about the book and it's protagonist were stirred up in the context of architecture and the construction of my Farmhouse. 

I had never imagined the impact a fictional character can have on my psyche. 

Howard Roark. 

I was wondering, what immortalised  that character, and left an indelible footprint in the mind of most readers. What was so unique and fascinating about his persona? 

      My thoughts go into overdrive. Slowly, the fog of adulation clears  permitting greater clarity. There was a casual disdain, almost a contemptuous disregard,  stemming not from any negativity or bitterness. An overwhelming self assurance, an assertive, composed self confidence. An equanimity, that stabilized and aborted any emotional contortions. An unpredictability, that anhilated the rote, the mundane and the trivial. 

       And then the one thing, that really stood out. His total alienation from the 4 As. The 4 As - Acceptance, Approval, Acknowledgment and Appreciation. If one introspects deeply, it will become clear, that our lives are held hostage by these 4 As. It could be a consequence of living in society. Social considerations, norms, peer pressure, an unavoidable hierarchy, a never ending game of one-upmanship, the eternal struggle to keep ahead of the pack. 

     I realise this obsessive, perhaps subconscious compulsion truly handicaps and diverts our energies and efforts. 

The time devoured by this perpetual  anxiety about what others think about us is truly unwarranted. The ever increasing connectivity lavished by internet and applications of social media fuels this indefatigable urge to enhance, amplify, cosmetically decorate ones impression.

I must confess, that I am myself, a victim of this scourge. It is on this backdrop, that the enigma of Roark truly intrigues and inspires. His quasi-autistic self indulgence, bordering on heresy, apparently antisocial demeanor could be regarded as pathological in these days and times.

But, deep down, there's much more substance and rationale in this quixotic attitude. There's a method to his madness.

    A method, that perhaps liberates from the shackles of subservience to the 4 As. He was almost a hermit. A man totally self sufficient emotionally and otherwise. A man, who knew exactly what he wanted. Every thought and action were directed more importantly for his own evolution, and not for enhancement or cultivation of an impression for public consumption. 

Cultivated and crafted impressions shift the truth of life from reality to the deceptive virtual. He was a man, who lived in the now. The now, that's devoid of another 4 As. Anxieties,apprehensions, aspirations and ambitions. 

Roark was and will remain an enigma, a state of mind, an ideologue, who paves a path to salvation, liberation from not just 4 , but 8 As. The first four As- 

Acceptance, Approval, Acknowledgement, Appreciation which inevitably lead to the next 4As- Anxieties, Apprehensions, Aspirations and Ambitions. 


Dr. Deepak Ranade.

असाध्याची साधना

 असाध्याची साधना.


तो लहानपणा पासूनच चपळ आणि धडपड्या होता.सतत अस्वस्थ,आणि बेचैन.खोल कुठेतरी एक ऊर्जेचा वणवा पेटल्या सारखे.अस्वस्थतेचे कारण त्याला किंवा इतरांना सुद्धा उमजेना. ऊर्जा अनेक प्रकारच्या अस्तात. त्याची ऊर्जा जरा वेगळ्याच प्रकारची होती. त्या उर्जेमध्ये एक वेगळीच ताकद होती. ती ताकद,ती ऊर्जा त्याला स्वस्थ बसून देत नव्हती. त्याच्या पळण्यामध्ये एक वेगळाच डौल होता.  पळणे,हे जात्याच त्याच्या नसानसात भरलेले होते. त्याची ती विलक्षण ऊर्जा,बेचैनी आणि अस्वस्थता समूहातल्या इतरांना जाचायची. समूहातील इतर समवयीन, काळाच्या ओघाने पळू लागलीं. त्यांचे पळणे,हे साचेबद्ध,कोष्टकात, शिकवणीतले,आणि प्रशिक्षित असे. कळपात सर्वांचे  पळणे त्याच प्रकाराचे, आणि ह्याचे पळणे वेगळे. त्याची वेगळे पळण्याची शैली  कळपातील इतरांना झेपायची नाही. त्यांच्या नजरेत एक प्रशचिन्ह असे- 

तू सर्वांसारखा का पळत नाहीस?  त्याला स्वतःला सुद्धा आपला वेगळेपणा जाणवत होता. सुरवातीला त्या वेगळेपणाचे कुतूहल वाटायचे इतरांना. पण ते वेगळेपण जेव्हा चौकटीत बसेना, तेव्हा ते वेगळेपण थोडे बोचरे वाटू लागले. त्याला स्वतःला आपल्या वेगळेपणाची जाणीव होत नव्हती. पण कळपातील इतर त्या वेगळेपणाची अवहेलना करू लागल्यावर त्याच्या मनात,हळू हळू न्यूनगंडाचे बी रुजले. 

चार चौघांपेक्षा वेगळे असणे,म्हणजे एक विकृतीच अशी भावना कळपात प्रचलित होती. आपले  वेगळेपण, हा एक शाप असल्याची भावना हळू हळू मनात घर करू लागली आणि त्या न्यूनगंडाच्या बिजाचे रोपटे दिवसेंदिवस वाढू लागले. कालांतराने,त्याची दौड आता सर्वांपेक्षा खूपच वेगळी झाली होती. 

काही तर खूपच सरस दौडत होते.शर्यतीत दौडण्याची कला काही वेगळीच होती. त्याने  आपल्या अनोख्या शैलीत स्पर्धेत दौडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण शर्यत जिंकण्यासाठी लागणारी कौशल्ये,ही वेगळी होती. स्पर्धेत उतरण्यासाठी,चार चौघांशी बरोबरी करून, त्यांच्यातील उणिवा अभ्यासणे,स्पर्धेचे नियम,अटी, पाळणे क्रम प्राप्त होते. स्पर्धा म्हंटली,की त्याच्या पळण्याची मजाच निघून जाई. सगळे रेसचे घोडे. एकाहुन एक आपल्या परीने खानदानी, नामांकीत तालमीत  नियोजनबद्ध प्रशिक्षण घेऊन, स्पर्धेत उतरण्यास सज्ज. त्याला तसा खानदानी काहीच वारसा नव्हता. पळण्याच्या विश्वात बेवारस. आपल्याला जमेल,तसे आणि कुठल्याही शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब न करता शर्यतीत उतरायचे म्हणजे एक मूर्खपणाच होता. पण रेस चा घोडा म्हंटला,की स्पर्धेत पळणे अनिवार्य. स्पर्धा हेच आयुष्य. त्याला इतर घोड्यांची नावे देखील माहीत नव्हती.  तसे पाहता, त्यांना नावाचा काहीच उपयोग नव्हता. त्या वर्तुळात, फक्त नंबर महत्वाचा. शर्यतीत, कितवा आलास, किंवा शर्यत चालू असताना कोणत्या क्रमांकावर पळतोय,हीच त्या घोड्याची ओळख. रेस संपायची,पण स्पर्धा अखंड चालूच. एखाद्या रेस मध्ये ह्या घोड्याला पहिला नंबर,तर दुसऱ्या रेस मध्ये दुसरा  घोडा पहिला. पळणे,हे केवळ रेस जिंकण्यासाठी,आणि रेस जिंकणे, हेच आयुष्याचे उद्दिष्ट. हे रेसचे घोडे नुसते उभे राहिले असले तरी मनात,शर्यत चालूच. कधी दौड पायांची,तर कधी दौड मनाची. दौड चालूच. रेस जिंकण्याच्या ध्यासाने, पळण्याचा आनंद कुठेतरी हरपला होता. त्याला हे पळणे आणि रेस जिंकणे,हे फारच निरर्थक वाटू लागले होते. 

     काही घोड्यांनी,रेस जिंकण्याच्या पाठी न लागता, आपले शांतपणे टांग्याची बग्गी ओढणे पसंत केले. अशाच एका घोड्याशी ओळख झाली आणि गप्पा मारायची संधी मिळाली.

 त्या घोड्याला त्याने विचारले-" तू स्पर्धेतून बाहेर का पडलास? "

 तो घोडा म्हणाला- मला स्पर्धा नको वाटते. 8 तास कष्ट केले,की मालक पोटभर जेवायला देतो,आणि मग तबेल्यात शांतपणे उभे राहून,निवांत आयुष्य जगायचं. कोणाशी स्पर्धा नाही,की कुठलेच टेन्शन नाही. मस्त चाललंय आयुष्य."

  त्याला हा युक्तिवाद पटेना. घोडा असून, पळायचे नाही,आणि केवळ टांगा ओढून आयुष्य काढायचे. छे छे. हे नाही जमणार. पळायला तर पाहिजेच.  पण स्पर्धा नको झाली होती त्याला. का कोणास ठाऊक, पण स्पर्धेत जिंकलो तरी स्पर्धा पळण्याचा आनंद  स्पर्धेमुळे हरवला होता. त्याला काहीच सुचत नव्हते.

पाळण्याचे दोनच प्रकार असू शकतात का? टांगा किंवा रेस ?

काही केल्यास त्याला या प्रश्नाचे उत्तर उमजत नव्हते.

एक दिवस, रेस दुसऱ्या गावी असल्यामुळे त्याला वाहनाने दुसऱ्या गावी नेण्यात येत होते. दोन तासाचा प्रवास होता. वाटेत छोटासा घाट लागला आणि तो चढून झाल्यावर, एक मोठे हिरवे गार पठार लागले. एकदम त्याची नजर दूरवर एका उमद्या घोड्यावर गेली. चॉकलेटी आणि पांढरा रंग होता त्याचा. तो सुसाट पळत होता. त्याच्या मानेवरचे पांढरे शुभ्र आयाळ वाऱ्या मध्ये प्रत्येक झेपे बरोबर लाटांसारखे डोलत होते. 

त्याच्या धावण्यात एक धुंद बेफिकिरी होती. त्याचा डौल काही आगळाच होता. एकटाच त्या हिरव्या गार पठारावर मनमोकळा स्वैराचार करीत होता. त्याच्या प्रत्येक झेपेमध्ये एक  लय होती. पळण्याच्या कृतीत एक कला होती. त्याचा सुडौल बांधा, भक्कम मजबूत पायाचे स्नायू त्या चकाकणार्या त्वचे खाली सळसळत होते. त्याच्या पाळण्यात एक विलक्षण सहजता आणि काव्य होते. त्याला कुठल्याही प्रकारची घाई नव्हती,की कुठलेही उद्दिष्ट गाठण्याचे वेड नव्हते.

   त्याच्या पाळण्यात कुठलीच धडपड, आटापिटा,आकांत,नव्हता. त्याचे पळणे एक प्रकारचा चिदविलास होता. त्या पाळण्यात एक रांगडेपण होते, एक नजाकत सुद्धा होती,पण उन्मत्तपणाचा किंवा माजाचा लवलेश नव्हता. तो स्वतःच्या आनंदासाठी पळत होता कारण पळणे हा स्वधर्म होता. कुठल्याच प्रकारची कृत्रिमता नव्हती. त्या क्षणी, त्याला रेस,आणि टांगा, ह्या दोनच परिचित असलेल्या पळण्याच्या प्रकारांपेक्षा  कित्येक उंचीचा तिसरा प्रकार बघायला मिळाला. स्वतःसाठी पळणे. शर्यत केलीच तर स्वतःची स्वतःशीच. 

त्या घोड्याचे पळणे बघून तो मंत्रमुग्ध झाला होता. आणि मग त्याने एक महत्वाचा निर्णय घेतला. 

आता तो जरी रेस मध्ये पळाला,तरी,तो स्वतःच्या आनंदासाठी पळणार होता. पळण्याचा पूर्ण मजा लुटणार . त्याला त्याचा स्वरूपाची जाणीव झाली होती.  आता पळणे,ही केवळ कृती नसून,एक साधना आहे. 

काहीच न साध्य करण्याची साधना. 


Dr. Deepak Ranade.

विश्वास हा नेहेमीच अंध असतो

 विश्वास,श्रद्धा,धाडस,दैव,कर्म,बेफिकिरी..........


"तुला मी खरे काय ते सांगणार आहे. पेशंट पासून काही लपवून ठेवले,आणि शेवटी त्याला सत्य कळले,तर बऱ्याच जणांना विश्वासघात झाल्यासारखे वाटते.म्हणून,सत्य कितीही कटू असले तरी ते सांगितलेले कधीही इष्ट. "

त्या 28 वर्षाच्या युवकाला हे सांगितल्यावर तो थोडा सिरीयस झाला.

"तुझ्या मानेच्या मणक्यामध्ये (cervical spinal cord)एक 2 इंच लांब आणि पाऊण इंच जाड गाठ आहे. ती गाठ ऑपरेशन करूनच काढावी लागेल. दुसरा कुठलाच पर्याय नाहीये."

    दोन मिनिटे शांतता. कोणी काहीच बोलत नव्हते. पेशंटचा भाऊ आणि एक मित्र,असे तिघे जण माझ्याकडे टक लावून बघत होते. 

मी उगाच एवढे स्पष्ट बोललो की काय? 

"जोर का झटका धीरेसे" द्यायला हवा होता का? असो. मी ठरवलं होतं,की आता,जे अनिवार्य असते,ज्याला दुसरा काहीच पर्याय नाही,ते सरळ,सोप्या स्पष्ट भाषेत सांगून टाकायचे. बरेचदा,जे अद्यारुत असते,पण भीतीपोटी व्यक्त केले जात नाही, ते अव्यक्तेपण खूप ताण वाढवते. मग हळूच इकडून तिकडून indirectly प्रश्न विचारत,अधिक मानसिक वेदना आणि कल्पनाशक्तीविलास. 

दोन मिनिटांनी त्या पेशंटनेच उद्गार काढत ती गूढ शांतता मोडून टाकली. 

"डॉक्टर,मणक्याच्या आत गाठ आहे,म्हणजे मणका चिरून ती गाठ काढायला लागेल का? आणि तसे करताना पुढील आयुष्यात अपंगत्व येईल का? "

आता मी धर्मसंकटात सापडलो होतो.

"शस्त्रक्रियेनंतर तुझ्या हाता पायाची ताकद तात्पुरती,किंवा क्वचितकाळी कायमस्वरूपी कमी जास्त होऊ शकते. खचित तुला प्रदीर्घ काळ ventilator वर देखील ठेवावे लागू शकते. कारण गाठ श्वासावर नियंत्रण ठेवणाऱ्या मानेच्या मणक्याच्या त्या नाजूक भागात आहे." आता एकदा स्पष्ट बोलायचे ठरवले आहे,तर मग होऊन जाऊदे. 

पुन्हा,शांतता. ते तिघे एकमेकांकडे बघत होते. पुढे काय बोलायला उरलेच नव्हते. आर या पार. 

       मला वाटले होते,की ही मंडळी आता "बरे आहे,आम्ही विचार करून तुम्हाला कळवू." असे नेहेमीचे वेळ काढू उत्तर देऊन क्लिनिक मधून पाय काढतील.

पण त्यांच्या प्रतिक्रियेने मलाच धक्का बसला. पेशंटनेच डायरेक्ट मला विचारले-

"डॉक्टर, ऑपरेशन करायचं आहे मला. ऍडमिट कधी होऊ?"

मला दोन मिनिटे काहीच सुचेना. मलाच शंका आली,की ह्याला मी सांगितलेले नीट कळले आहे का? की  संभाव्य धोके पुन्हा समजावून सांगावे? 

मी त्याला ऍडमिट व्हायला सांगितले आणि ऑपरेशनची तारीख ठरवून टाकली. 

ह्या पेशंटच्या डाव्या हातात मुंग्या आणि बधिरपणा,एवढाच त्रास होता. एवढी मोठी गाठ त्याच्या मणक्याच्या आत असेल,ह्यावर कोणाचाही विश्वास बसला नसता.

MRI बघितल्यावरच खात्री पटायची. मानेचा मणका तसा खूपच नाजूक.हाताच्या अंगठ्या एव्हढ्या जाडीचा,पण मानेखालच्या सर्व शरीराचे नियंत्रण करणाऱ्या नसा तेवढ्या भागात घट्ट पॅक बंद असतात. शिवाय,श्वास घेण्याचा सर्वात महत्वाचा स्नायू ,diaphragm च्या नसा देखील याच भागातून निघतात. 

आता,ऑपरेशन करताना,हा मानेचा मणका उभा चिरून,1 cm खोल जाऊन ती गाठ काढायची होती. 

हातापायांची ताकद कायमस्वरूपी कमी होण्याची दाट शक्यता होती. ह्या तरुणाचे उभे आयुष्य जगायचे राहिले होते(अजून अविवाहितच होता). ऑपरेशन टेबल वर घेताना पूर्ण धडधाकट असणारा. खूप मोठा धोका पत्करत होतो मी. संभाव्य धोके डोळ्यासमोरून फ्लॅश होत होते. बरेचदा,पेशंट आणि नातेवाईक ह्यांचे 'अज्ञानात सुख'अशी अवस्था असते.सर्जनलाच सत्य परिस्थिती घाबरवत असते.

पेशंट माझ्यावर विश्वास ठेवून मोकळा झाला होता. मलाच त्या विश्वासाचे ओझे पेलायचे होते.

त्याचा निर्णय,हा विश्वास,की अंधविश्वास? आयुष्यावर उदार होऊन केलेले धाडस की मनाचा समतोल राखून निवडलेला व्यवहारी प्रॅक्टिकल मार्ग? 

कोणास ठाऊक काय म्हणावे त्याच्या या वागणुकीला.

मी अधिक विचार न करता कामाला लागलो.

ऑपरेशन करण्यापूर्वी tractography नावाचा MRI करून घेतला. या MRI मध्ये मानेच्या मणक्यातून प्रवास करणाऱ्या सर्व tracts ची रचना आणि गाठीमुळे कशा प्रकारे दबले गेलेत, याचा सखोल अभ्यास करता येतो. या tractography च्या फिल्म्सचा खोलात जाऊन 3 ते 4 तास अभ्यास केला.

ऑपरेशन करताना SSEP आणि MEV ही नसांची मोनिटरिंग करणारी आधुनिक प्रणाली वापरायचे नियोजन केले. 

ऑपरेशन सुरू केले. मणका एक्सपोस केला. मध्य भागात रक्तवाहिन्या नसलेल्या प्लेन microscope मधून अचूक टिपला. छातीत धडधड चालू होती. मग देवाचे नाव घेत,तो मणका उघडला. मोनिटरिंग सतत चालू होतेच. थोडे आत गेल्यावर ती तांबूस रंगाची  गाठ दिसली. मोठी होती. 

मग मन एका वेगळ्याच अवस्थेत पोचले. पुढील एक तासात अत्यन्त शांतपणे,CUSA हातात घेऊन हळू हळू ती सगळी गाठ काढली. ती मनाची अवस्था शब्दात व्यक्त करणे कठीण. त्या क्षणात माझे स्वतःचे अस्तित्व नाहीसे होते. भय,आपल्या अहंकाराचीच अभिव्यक्ती असते. जिथे माझे वेगळे अस्तित्व नसते,अहंकार नसतो,तिथे उरते केवळ जाणीव. भय हे  भूत, भविष्य या काळाच्या कल्पनेतच असते. त्या क्षणात पूर्ण लक्ष केंद्रित केले, की भयाचा लोप होतो. उरतो केवळ तो क्षण.मग त्या अवस्थेत,काळाचा भान हरपून जातो. उरतो केवळ भावनातीत, साक्षीभाव. त्या अनाकलनीय आदी शक्तीवर एक दृढ विश्वास,श्रद्धा असते. ती शक्ती माझ्या हातात उतरली आहे, याची खात्री मनात ठेवून शस्त्रक्रिया चालू राहते. दृष्टा, दृष्टी,दृष्य ही त्रिपुटी एका विलक्षण अद्वैतात विरघळून जाते. 

 अखेर, गाठ पूर्ण निघाली आहे,याची खात्री करून मी gloves काढले. पुन्हा त्या आदिशक्तीला नमन करून मी सर्जनरूम मध्ये कॉफी मागवली. 

 काल हा तरुण टाके काढायला क्लिनिकला आला होता. त्याला बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्याला घट्ट मिठी मारली. त्याचा माझ्यावर असलेला विश्वास,की माझा त्या शक्तीवर विश्वास,की त्याचे आणि माझे धाडस,की आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवतेचे कर्तब? कोणीच ह्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकणार नाही. काही प्रश्न अनुत्तरीतच राहिलेले बरे. 


Dr Deepak Ranade. 


लुप्त होत जाणारी मूल्ये

 लुप्त होत जाणारी मूल्ये


वृन्दाला सांगितलं मी उषा मावशीला बरोबर सकाळी 7 वाजता घ्यायला येतो. तुम्ही खाली येऊन थांबा.

म्हंटल्याप्रमाणे मी 7च्या ठोक्याला वृन्दाच्या सोसायटी बाहेर गाडी उभी केली. आणि वृन्दा त्या माऊलीचा हात धरून तिला माझ्या गाडीत बसवले. 

उषा मावशी सुंदर सिल्क साडी घालून, हातात पर्स,आणि एक छोटीशी पिशवी घेऊन माझ्या गाडीत आसनस्थ झाली. तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रा होती. सतत हसतमुख, आणि प्रेमळ स्वभावाची उषा मावशी माझ्या आईची बालपणाची मैत्रीण. वयाच्या 17व्या वर्षा पासून त्या दोघींची ओळख. हिंदी राष्ट्रभाषेच्या वर्गात प्रथम ह्या दोघी एकाच बाकावर बसायच्या. आई आमची अबोल. उषा मावशी सांगत होती,की 3 महिने एकाच बाकावर बसून देखील एकही शब्द बोलल्या नाहीत दोघी जणी. 

पुढे, j j school of arts मध्ये परत एकत्र आल्यावर कुठे वाचा फुटली. पण त्या नंतर, दोघींचे खूप जिव्हाळ्याचे नाते उलगडत गेले.

     उषा मावशीचा संसार मुंबईत झाला. मी 7 वर्षाचा असताना आई बरोबर तिच्या घरी गेल्याचे आठवते. तेव्हा तिने प्रेमाने आमचे आदरातिथ्य करून, मला खेळायला भोवरा दिला. काही आठवणी कारण नसताना अगदी स्पष्टपणे आठवतात. तिचा तो प्रेमळ चेहरा, तिने केलेले लाड, तोंड भरून कौतुक, काळजात कुठेतरी खोलवर अजून जोपासून ठेवले आहे.

      उषा मावशी आणि माझी त्यानंतर   गाठभेट कमीच. तिचे यजमान उत्तम ज्योतिषशास्त्र जाणत.  आई माझ्या  पत्रिकेबद्दल बरेचदा त्यांच्या कडे चौकशी आणि  विचारपूस करत. कालांतराने उषा मावशीची कन्या पुण्यात वास्तव्यासाठी आल्यामुळे तिच्या घरी माझे येणेजाणे व्हायचे. काही वर्षांपूर्वी  उषा मावशीचे यजमान कैवल्यवासी झाले. मुलगा आणि सून अमेरिकेत स्थायिक,त्यामुळे आपल्या 75 वर्ष वास्तव्य केलेल्या घरी ती एकटीच.

तिला मुलीने पुण्यात शिफ्ट होण्यास आग्रह केला,पण तिने त्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. 

आज बऱ्याच दिवसानंतर उशा माउशीला भेटण्याचा योग आला. ती मुलीकडे काही दिवस मुक्कामाला आली होती. मी ठरवले,की तिला गाडीत घालून माझ्या आईकडे घेऊन जाईन. बाल मैत्रिणींची गाठ घालून देण्याचे पुण्य. 

  गाडीत बसल्यावर आमच्या गप्पा चालू झाल्या. 

तिच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने एक स्वावलंबता जाणवत होती. तिच्या व्यक्तिमत्वात एक सुडौलता,आणि ग्रेस होती. बोलताना,कुठेही आग्रही,हट्टी किंवा कोणाबद्दल टीका नव्हती. दैवाने जे काही तिच्या पानात वाढले होते,ते अत्यन्त चवीने आणि कुरकुर न करता ह्या माउलीने शांतचित्ताने ग्रहण केले. तिच्या व्यक्तिमत्वात एक ठेहेराव,स्थैर्य, तृप्त सम्पन्नता जाणवत होती. कुठेही,एकटेपणाचा त्रास किंवा कंटाळा नव्हता. तिच्या बरोबर विरोधी पावित्रा माझ्या आईचा. आपला साथीदार जीवनाचा प्रवास अर्ध्यात सोडून 11 वर्षे उलटली,तरी ती त्या दुःखातून बाहेर आली नव्हती. तिला तिचे आयुष्य कसे जगते असे विचारता तिने काही अमौलिक सल्ले दिले.

"आयुष्य सुटसुटीत ठेव रे. आपणच आपल्या आयुष्याचा फापट पसारा वाढऊन ठेवतो. भावना,आठवणी,ऐहिक गोष्टी,पैसालत्ता या साऱ्याचे वजन डोक्यावर बाळगून आयुष्य जगलो,तर मग ते कारण नसताना कष्टाचे बनवून टाकतो. मी माझ्या एकटेपणाचा कधीच स्तोम माजवला नाही. हे गेल्याचे दुःख निश्चित उरात बाळगते आहे,पण शेवटी,आयुष्याचे पुढचे पान उलटावे लागतेच. नव्या पानावर स्वतःची उत्क्रांती कशी होणार, यावर चिंतन करते. माझे छंद जोपासते,तब्येतीची काळजी घेते. स्वतःशीच मैत्री करणे,हे खूप महत्वाचे. मित्र परिवाराच्या गोतावळ्यात स्वतःचे स्वतःशी नाते कुठेतरी लुप्त होते. सगळे जण शेवटी आपापल्या संसारात व्यस्त होतात. भावनिक दृष्ट्या आपण कधीच कोणावर परावलंबी नसावे. त्याची खरंतर गरजच नसते. आपल्या मनाचे ते सारे खेळ असतात. "

उषा मावशी खरच खूप हलक्या, शुद्ध अंतःकर्णाची असल्याचे जाणवत होते. तिच्या मध्ये वात्सल्य,प्रेम,ममत्व  भरभरून होते,पण, जेव्हा इतरांना मोकळे सोडून द्यायची वेळ आली, तिने तिच्या रुणानुबंधांतील अपेक्षांच्या साखळ्या काढून टाकल्या आणि स्वतःला आणि इतरांना मुक्त केले. तिच्यात कुठेच कोरडेपणा नव्हता. इतरांवर माया नक्की करावी,पण स्वत्व विसरून नाही. शेवटी स्वतःवर असलेली माया,हीच आयुष्य सुखी आणि समाधानी करते. 

त्या दोघी जिवलग मैत्रिणीची गाठ घालून देताना एक आगळाच आनंद झाला. कित्येक दशकांच्या त्यांच्या नात्याचा सुगंध त्यांच्या डोळ्यात दिसत होता. तो दरवळणारा सुगन्ध मनमुराद लुटत मी माझ्या वाटेला लागलो. आजकालच्या व्यवहारी नातेसंबंधांकडे पहाता,उषा मावशी आणि तिची विचार सरणी  त्यांच्या पिढीबरोबर लुप्त होत चालली की काय, ही शंका मनात कुठेतरी येऊन गेली. 


Dr. Deepak Ranade.