Sunday, February 7, 2021

किंमत

 किंमत.

    त्याला वेदना असाह्य होत होत्या. हात डोक्यावर ठेवावा लागत होता. चेहऱ्यावर त्याची व्यथा स्पष्ट वाचता येत होती. खांद्या पासून कळा थेट उजव्या हाताच्या बोटांपर्यंत अक्षरशः विजेच्या झटक्या प्रमाणे दोन दोन मिनिटाने त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. मानेच्या मणक्या मधल्या 6व्या आणि 7व्या vertebrae च्या मधली उशी सरकली होती आणि उजव्या बाजूच्या नसेला पूर्ण आवळून टाकत होती. शस्त्रक्रियेला पर्याय नव्हता. कष्टचं काम करत होता. डोक्यावर वजन वाहून वाहून बिगारी काम करून त्या मानेवर अनंत अत्याचार झाले होते. 

सोबत त्याची बायको आणि तिच्या कडेवर त्यांचे तिसरे मूल. पोटा पाण्यासाठी धडपड करून जेमतेम दोन वेळचे पोटभर जेवण नशिबी. बायको सुद्धा दिवस भर त्या कोवळ्या जीवाला झोळीत ठेवून राबत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजीने वीणकाम केले होते.  स्वस्तात मानेचा  MRI करून घेतला होता आणि MRI मध्ये सर्व परिस्थिती स्पष्ट दिसत होती. 

          शस्त्रक्रिया म्हणजे खर्च आलाच. त्यांनी त्याबद्दल चौकशी केली. पोट भरण्या पुरते पैसे कमावणारी ही मंडळी. शक्यच नव्हते त्यांना पैशाची व्यवस्था करणे. 

माझ्या फीज सांगायला सुद्धा मला ओशाळल्या सारखे झाले. मी काय मागू आणि ते काय देणार?गणित जुळणे अशक्य. त्यांना काही शासकीय योजने अनतर्गत काही रक्कम मिळणे शक्य होती. अगदीच तुटपुंजी होती ती रक्कम. माझी शस्त्रक्रिया करण्याची फी, त्या रकमेच्या काही पट असते. ही शस्त्रक्रिया करायला शिकण्यासाठी,मी किती कष्ट घेतले,किती अडचणी आणि प्रयत्न केले होते, ती शस्त्रक्रिया करताना मी काय रिस्क घेतो,केवढी जबाबदारी अंगावर घेतो, हे सारे त्यांना समजणे शक्यच नव्हते. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला,आणि त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेता, आपण आपल्या कामाची काय किंमत सांगायची? 

आपण कुणासाठी काही प्रेमाने करतो,तेव्हा कित्येकदा समोरच्या व्यक्तीला त्याची किंमत कळते का? केलेल्या कामाची किंमत कोणी ठरवायची? मदत करणार्याने,की मदत घेणार्याने? मदत घेणाऱ्याची आपण केलेल्या मदतीची किंमत देण्याची दानत असते का? आणि दानत असून देखील त्या व्यक्तीला केलेल्या मदतीचा भाव  करण्याचे तारतम्य असते का? किंमत. कोणत्या currency मध्ये  होतो हा व्यवहार? 

   समोर बसलेल्या त्या बिचाऱ्या कडून काय मागणार मी?

त्याला सांगितलं की तूला माझ्यावर विश्वास आहे ना? म्हणजे ही शस्त्रक्रिया करताना तुझ्या जीवाला धोका आहे. स्वरपेटीच्या पडद्याची  हालचाल करणाऱ्या नसा खूप जवळ असतात आणि त्यांना धक्का लागला,तर तुझा आवाज कायमचा घोगरा होऊ शकतो. भूल देताना 2 टक्के लोकांचा रक्तदाब एकाएकी पडू शकतो.हे सारे तुला सांगितले आहे आणि त्यावर तुला स्वाक्षरी करावी लागेल.(consent)

         तो म्हणाला "साहेब,माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही बिनधास्त ऑपरेशन करा.काय झाले तर तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. पण मला ह्या त्रासातून मोकळे करा. मला जमेल तेव्हढे पैशाची व्यवस्था मी करेन.म्हेवण्या कडून, कंत्राटदारा कडून advance घेईन,पण प्लीज माझे ऑपरेशन करा. 

   त्याला मी म्हणालो "उद्या ऍडमिट व्हायला ये. हॉस्पिटल मध्ये तुला योजने अंतर्गत मदत मिळते. तूझा माझ्यावर असलेला विश्वास हीच माझी फी. 

बऱ्याच किमती, पैशात मोजता येत नाहीत. मी माझ्याकडून सर्व नीट  करेन आणि तुला तुझ्या व्यथेतून मुक्त करायचा प्रयत्न करेन."

माझ्या कन्सलटिंग मध्ये नेहेमीच गाणी ऐकत काम करतो मी. नेमके तो निघत असताना मदनमोहनजी यांच्या एका अविसमरनिय गाण्याची सुरवात झाली.  त्या पेशंटचा निरोप घेत, उस्ताद रईस खानच्या सतारीचे डोळ्यात पाणी आणणारे स्वर कानी पडले. सतारीचे स्वर इतके बोलके आणि काळजाला भिडणारे. मग त्या स्वरसम्राज्ञी देवतेचा आवाज कानी पडला.


"हम है मताये कुचा,बाजार की तरह 

उठती है हर निगाह खरीदार की तरह"


 गाणे डोळे मिटून 5 मिनिटे शांततेत ऐकत बसलो. मजरूह सुल्तानपुरी यांची शब्द रचना. काटा येतो ऐकताना.प्रत्येक जण खरीदारच असतो. किंमत आपआपल्या कुवती प्रमाणे देतो. सर्व गोष्टींची किंमत मोजावी लागतेच.स्वतःला,किंवा इतरांना. आपल्या कष्टाची,स्वातंत्र्याची,निर्णयांची. सौदा पटला,तर व्यवहार होतो. मग कधी कधी किंमत आपण केलेल्या मदतीची जाणीव. ती देखील किंमतच असते.होतो तो व्यवहारच असतो. किंमत चुकवण्याचा.

Friday, February 5, 2021

नीर गाठ

 नीर गाठ 


पर्वा एक कमरेच्या मणक्याचे जरा अवघड ऑपरेशन करत होतो. 

त्या बाईंच्या मणक्याचे एक हाड (vertebra) खालच्या हाडावर सरकून त्यांच्या नसांवर प्रेशर देत होते. त्या सरकणार्या हाडाला लायनीत आणून मग दोन्ही हाडांमध्ये screws घालून त्यामध्ये रॉड घालून भक्कम फिक्स करायचे होते.

सगळे सुरळीत चालले होते. तिच्या हाडाचा काही भाग नसांवर खूपच जास्त दाब देत होता. टणक,दगडासारख्या त्या हाडाला ड्रिल करण्या शिवाय पर्याय नव्हता. हाय स्पीड ड्रिल वापरत होतो. त्या हाडाला अगदी चिकटून खाली dura होता. Dura म्हणजे मजा तंतू  एका कापडी पिशबी सारख्या आवरणात बंदिस्त असतात त्या आवरणाचे नाव. ह्याच पिशवीत csf म्हणजे एक पाण्यासारखे पोषण करणारे द्रव्य भरलेले असते. ड्रिल करत करत ते अत्यन्त कडक हाड झीजवण्याचे काम चालू होते. खूप कमी जागा असते हे सर्व करायला. 

    ड्रिल करणे ही एक कलाच असते. ड्रिल करताना छातीत धडधडते. थोडे नियंत्रण गेले तर मज्जा तंतूंना थेट इजा. 

ड्रिल करत करत त्या हाडाला झीजवत झीजवत शेवटचा पापुद्रा उरला होता. ड्रिल वेळीच वर घेणार,इतक्यात एक छोटेसे भोक पडले त्या dura मध्ये. . क्षणात, पाण्याचे कारंज उडले आणि गांडूळा सारखी roots बाहेर पडली. Roots म्हणजे नसा.

चर्रर्र झाले काळजात. आता ती सगळी गांडुळं पुनः त्या छोट्याश्या विवरातून आत घालून मग एक टका मारणे,हाच उपाय. 

ते छिद्र छोटे होते. ते बंद करायला तिथे अगदी रेशमी पातळ 4 zero size चा धागा वापरावा लागणार होता.  मग त्या छिद्राच्या कडा नीट तपासून ते नाजूक 4 zero suture material उघडले. खूप नाजूक सुवित ते गुंफलेले होते. ती अर्धगोल सुवी needle holder मध्ये धरून दोन्ही कडांमधून आरपार एक टाका घेतला. 

अजून सगळ्यात अवघड भाग पुढेच होता. 

आता मला ते छिद्र बुजवायला त्या रेशमी धाग्याची गाठ मारायची होती.

जागा जेमतेम 3 चौरस इंच. जवळ जवळ 5 इंच खोलीत हे साधायचे होते.

एक टोक needle होल्डर ने धरले आणि दुसरे टोक एक forceps मध्ये पकडले. 

गाठ मारायला पहिल्यांदा दोन्ही टोके एकत्र आणून मग एक टोकाला दुसऱ्या टोकाच्या खालून काढायचे होते. त्या छोट्या जागेत एका टोकाला दुसऱ्या टोकाच्या खालून काढणे कर्म कठीण. पण त्या शिवाय गाठ मारणे शक्यच नाही. 

कसे बसे ते आटापिटा करून जमवले. पण जर नीर गाठ मारायची असेल तर पुन्हा त्या वरती असलेल्या टोकाने आता ह्या वेळी दुसऱ्या टोकाच्या खालून जाणे गरजेचे होते. घाम काढला ह्या कसरतीने.

अखेर, नीर गाठ मारून झाल्यावर ती दोन्ही टोके ओढून ती गाठ घट्ट केली. मग शेवटी ती दोन्ही लांब टोके गाठी जवळ कापून टाकली. हुश्श झाले.

सर्व मनासारखे झाल्यावर closure करत असताना  गाठीं बद्दल विचार करत होतो. नात्यांच्या गाठीचे ही असेच असते. सहवास असल्यामुळे  भावनिक जागेची दाटीवाटी होतेच. कधी  एका टोकाने दुसऱ्या टोका खाली जावे लागते. मग दुसऱ्या टोकाने गरज पडल्यास पहिल्या टोका खालून जावे लागते. प्रतिकूल परिस्थिती या टोकांना ताणून ती गाठ घट्ट करण्यात हातभार लावतात. आणि ती दोन्ही टोके पूर्ण खेचून गेल्यावर गाठ घट्ट होते. काळाच्या ओघाने शेवटी अहंकाराची लांब टोके प्रेमाच्या कात्रीने कापून टाकावी लागतात. मग त्या गाठी मध्ये ती दोन्ही टोके विलीन होतात आणि त्यांचे वेगळेपण ओळखणे जवळ जवळ अशक्य.  आणि मग ती टोके हाती लागत नसल्यामुळे, ती नीर गाठ सोडवणे किंवा सुटणे नाही. 

त्या एका गाठीवर ते एवढे मोठे ऑपरेशन आणि त्या रुग्णाच्या भविष्य काळात काही complication न होणे अवलंबून होते. 

कुठल्याही नात्याचा कणा देखील ह्या नीर गाठीवरच विसवलेला असतो. 


Dr. Deepak Ranade.

The picket fence

 The picket fence.

    The other day, i was visiting a dear old friend for high tea. She lived in a mansion in a very exclusive gated community. Her meticulousness, attention to detail, the manicured garden, and almost everything in and around her house revealed a touch of affluence coupled with a highly evolved aesthetic sense. After a cup of tea and an hour of catching up with what common friends were doing with their lives, she took me on a tour of her house. It was indeed opulent, without looking vulgar or pompous. Her demeanor was also very reticent, and composed. She hadn't changed a bit. I was catching up with her after almost 25 years. Her smile, her very caring nature, her casually giving a warm hug, all had been spared from the ravages of time. As I settled into the living room, i was observing the artefacts, the decor, the ambience of her beautifully set up home. The picture frames on the wall revealed her perfect family. All looking very cheerful and, happy. Her husband,a very distinguished, man with that touch of aristocracy and her well brought up and handsome children added flavor to that sophistication. Her life, and all its components were as manicured and proper as the generous lush green lawn surrounded by the very articulately done up flower beds.  The sun was almost on the verge of dropping down from the horizon lending a golden hue of surreality to the landscape. She suggested that we go for a walk. I readily agreed and we were off into her garden. At the rear end of her garden was a picket fence with a small gate. She opened the gate and we both were off. In a few moments, we were on a beautiful trail that led deeper into the woods. The path was very scenic weaving it's way through a thicket of bushy undergrowth.. In the next ten minutes, we were in the middle of the woods from where her mansion was no longer visible. We then walked for about 45 minutes through a forest. It was really beautiful. The skies were lit up with spectral shades of crimson, orange and some colors that transcended nomenclature. It was as we were traversing this forest, that I noticed a slight change in her. She was looking much more relaxed, and the conversation opened up in the true sense. The lady of the mansion had stepped off the pedestal and now looked far more at ease. The manicured and cultivated streak gave way to the more natural and untouched version of life.The walk was indeed very nice. For a while, we walked in silence. There was no trace of her mansion for the entire 40 minutes. It was almost as if she didn't want to be reminded of her lavish home and abundantly opulent lifestyle. I let her be and didn't deem it necessary to break the silence. She seemed to be very calmed in these rustic environs. Her highly cultivated identity seemed to dissolve in the rustling leaves. The early spring colors with their elegant but understated, subtle  pink and white blossoms reflecting her self effacing personality.   Our walk was coming to an end, and we got closer to her house which soon came in full view. We got back into the manicured ambience that was really plush. The retinue of servants immediately at her beck and call. She got back to her role of the lady of the mansion. Crossing the picket fence one more time.

The picket fence indeed was her gateway to anonymity. When she crossed the fence, she was almost another person. 

As I was gearing up to say goodbye, I felt that we all have our own emotional picket fences, that we cross to enter a zone of anonymity. A zone from where  the mansion of ego vanishes and we foray into the woods of our subconscious to explore small trails leading to unknown, beautiful skies.A zone, where we can seek refuge from the urban insanities, the grind of  protocols and expectations and dissolve our identities to become one with nature.


Dr. Deepak Ranade.

सुरेखा

 बी जे मेडिकल कॉलेज मध्ये वैद्यकीय शिक्षण चालू असताना अनेक प्रकारच्या मंडळींशी गाठी जुळल्या.  ही सर्व मंडळी अत्यन्त भिन्न सामाजिक,आर्थिक,सौंस्कृतीक,

बौद्धिक,वैचारिक,भावनिक स्थरातली होती. सगळी मंडळी अर्थातच अकॅडेमिकली खूप हुशार. 

मी लोकांच्या बाबतीत अति चिकित्सक नव्हतो. जात,धर्म,पंथ,श्रीमंती,आशा पद्धतीचे वर्गीकरण मनात कधीही नसे.

एक ढोबळ वर्गीकरण होते.

शहाणी,दीड शहाणी,अति शहाणी,आगाऊ,प्रौढ,अकाली प्रौढ आणि शेवटी विरजण कॅटेगरी.

शहाणी कॅटेगरीतली मंडळी नियमित अभ्यास, पारदर्शी,थोडी टवाळ पण

 संवेदनशील,मदत करणारी,प्रेमळ,जबाबदार आणि जीवाला जीव देणारी. 

दीड शहाण्या गटातली मंडळी नियमित अभ्यास,स्वतःच्या भविष्याचा सतत विचार,पैसापाणी असलेली,आणि त्या आधारे नाती ठरवणारी,पण आपाल्या ग्रुप मधेच वावर करणारी. अति शहाणी म्हणजे थोडी भोचक,गॉसिप करणारी,कोणाला किती येतंय याच्यावर सतत नजर ठेवणारी,स्वतः खूप घासणारी पण वरवर्ती "मी काहीच अभ्यास करत नाही" असे म्हणणारी. 

आगाऊ मंडळी बरीच.प्राध्यापकांच्या पुढे पुढे,वर्गात सगळ्या प्रश्नांची उत्तरे हात वर करून देणारी,स्पर्धात्मक वृत्तीची,आतल्या गाठीची. 

प्रौढ मंडळी म्हणजे शांत,अभ्यासू,अजिबात टवाळ नसलेली,आपण बरे,आपला अभ्यास बरा. अकाली प्रौढ म्हणजे आमच्या सारख्या अति टवाळ मुलाला नवे ठेवणारी,कधीही खळखळून न हसणारी,वर्गात विनोद केला,तर उग्र चेहेरा करणारी, अभ्यासाव्यतिरिक्त काहीच इतर छंद नसलेली. शेवटचा 

विरजण गट सगळ्यात त्रासदायक.स्वतः तर विशेष काहीच करणार नाहीत,पण इतर मंडळींची सतत समीक्षा,कुत्सित कोंमेंट्स,टोमणे मारणारी.

सुरेखा,ही पहिल्या, शहाणी गटातली माझी एक सिनियर मैत्रीण.

खूप धमाल,प्रेमळ,गप्पीष्ट,ऍक्टिव्ह,अभ्यासू ,जबाबदारीने वागणारी,ही मुलगी.

माझ्याकडे 2nd mbbs वर्गात असताना कुठलेच पुस्तक नव्हते. Forensic Medicine चे पुस्तक मला सुरेखा नि दिले कारण ती 3rd mbbs मध्ये होती आणि तिच्याच वापरलेले पुस्तक तिने मला उधार तत्वावर वापरायला दिले. मी खूपच बेफिकीर होतो. ATKT( allowed to keep term) ही सुविधा होती. नापास झालो एखाद्या विषयात, तरी वर्ष बुडणार नव्हते. मग धमाल करायची एवढा एकच agenda. बुलेट मोटर सायकल होती. सिगरेटी,मोटर सायकल,मैत्रिणी,गिटार,पार्ट्या,

पिकनिक,ट्रेक हेच आयुष्य. परीक्षेत कसा पास झालो,देवास ठाउक. पण सगळ्या विषयात पास झालो. 

सुरेखाचे पुस्तक कुठेतरी हरवले. तिने दोन चार वेळा आठवण करून दिली,पण मग नाद सोडला.

कालांतराने, मी सर्जरी मध्ये MS करू लागलो. सुरेखा anaesthesia मध्ये MD करत होती. ती अर्थात एक वर्ष पुढे. 

माझ्याच वर्गातल्या मित्राशी तिचे सूत जुळले. तो प्रसंग सुद्धा मजेशीर.

ड्युटी हेवी होती तिची एका emergency day ला. घरून आई डबा पाठवायची. तो डबा रूमच्या बाहेर ठेवला जायचा. आमचा मित्र संजू, सुद्धा MD anaesthesia करत होता. मित्राच्या ग्रुप मधल्या मुलांनी भूक लागली म्हणून सुरेखाचा डबा पळवला आणि संपवून होता तिथे परत ठेवला.सुरेखा बिचारी थकून उपाशी पोटी डबा उघडून बघते,तर तो रिकामा. संजूला ते खूप टोचले आणि त्याने पश्चाताप म्हणून तिला जेवायला बाहेर घेऊन जायचे आमंत्रण दिले. मग ते आमंत्रण रोज देऊ लागला. 

पुढे घरच्यांचा विरोध पत्करून दोघांनी लग्न केले आणि दोघेही खूप सुखी आयुष्य जगताहेत. 

सुरेखा BJ  महाविद्यालयात lecturer म्हणून रुजू झाली आणि नुकतीच तीची विभाग प्रमुख म्ह्णून नियुक्ती झाली. COVID काळात ही माझी मैत्रीण दिवस रात्र लढली. तिने जी सेवा केली,ती खरच अतुलनीय आणि विश्वास बसणार नाही इतक्या कठीण परिस्थितीत झुंज देत तिचे सामर्थ्य सिद्ध केले. खूप प्रेमळ,संवेदनशील,सेवातत्पर,कष्टाळू,dedicated आणि sincere. संजू एका हॉस्पिटल मध्ये पार्टनर आणि यशस्वी anaesthesia प्रॅक्टिस करतो. ह्या दोघांना दोन कन्यारत्न आणि दोघीही खूप हुशार,कर्तृत्ववान. दोघीही उच्च शिक्षणासाठी जर्मनी मध्ये. 

मी नयूरोसर्जन झालो. सुरेखा नि दिलेल्या पुस्तकाचे ऋण मी काही केल्यास फेडता येणे नाही. काही ऋणे ही फेडण्याकरता नसतात. ती ऋणे आयुष्यभर जोपासून एखाद्या पुस्तकात खूप वर्षांपूर्वी जपून ठेवलेल्या पिसा सारखी असतात.

ती हळुवार पणे गोंजारून परत त्या पुस्तकात ठेवून द्यायची असतात.


Dr. Deepak Ranade.

रुबिक क्युब

 आयुष्याची रुबिक क्युब


1980 साली रुबिक क्युब नावाचा एक विलक्षण आविष्कार एक हंगेरियन शिल्पकार आणि वास्तुविशारद असलेल्या Erno Rubik याने डिझाइन केला. या क्यूबनी जगात खळबळ उडवून दिली.  सर्वात जास्त खपणारा खेळ म्हणून प्रसिद्ध झाली ही क्युब. ही क्युब म्हणजे खूपच युनिक होती. 6 बाजू असलेल्या ह्या क्युबच्या प्रत्येक बाजू मध्ये 9  वेगवेगळ्या रंगाचे चौकोन होते. ती क्युब म्हणजे एक प्रकारचे कोडे होते. त्या क्युबची वरची,खालची आणि दोन्ही बाजूच्या रांगा फिरवणे शक्य होते. त्या फिरवल्यावर सर्व 6 रंगांचे छोटे चौकोन विखरून जात. कोडे सोडवण्यासाठी सर्व एकच रंगाचे 9 चौकोन एकत्र आणून 6 बाजूचे 6 रंग पूर्ण करायचे. 

सर्व तरुण,वयस्कर,गृहिणी,विद्यार्थी ह्या क्युबच्या मागे वेडे झाले होते. अगणित combinations होऊ शकत होती त्या क्युबची. 

मी कॉलेज मध्ये होतो आणि कर्म धर्म संयोगाने,मी ती क्युब 8 ते 10 मिनिटात पूर्ण करत होतो. वर्गातले सगळे खूपच आश्चर्यचकित होत असे. ती क्युब पूर्ण करण्याचे एक टेकनीक होते. एकेक रांग स्टेप बाय स्टेप पूर्ण करत हळू हळू ती क्युब पूर्ण करावी लागे. पुढे पुढे ,त्या क्यूबला पूर्ण करताना त्रेधातिरपीट उडायची. एक बाजू पूर्ण केली की इतर बाजू विस्कटून जायच्या. अखेर मार्ग सापडायचा पण खूप प्रयत्न करावे लागले. 

वय होत गेले,तशी ती क्युब विसरून गेलो. पर्वा,एका मित्राच्या घरी गेलो होतो आणि त्याच्या 12 वर्षाच्या पुतण्याच्या हातात ती क्युब दिसली. 

का कोणास ठाऊक,पण ती क्युब त्याच्या कडून मागितली आणि 10 मिनिटात पूर्ण करून दाखवतो,आशा फुशारक्या मारत कामाला लागलो. पाऊण तास गेला,पण ती क्युब पुर्ण तर सोडा,एक बाजू देखील पूर्ण करू शकलो नाही. नाद सोडून दिला आणि अहंकाराचे झालेले तुकडे एकत्र करीत ती क्युब परत केली.

आणि मग एक विचार सहजच मनात आला.

आयुष्याची देखील रुबिक क्युब असते. 6 रंग म्हणजे आयुष्यातील  6 पैलू. तब्येत,पैसा, प्रसिद्धी,कुटुंब,व्यवसाय आणि अध्यात्म. ह्या 6 पैलूंचे चौकोन एकमेकात मिसळून, ती क्युब पुर्ण विस्कळीत होती. कुटुंबाची बाजू पूर्ण करायला गेलं,की इतर बाजू अपुऱ्या. मग एक रांग तरी पूर्ण करायचा प्रयत्न. ती रांग पूर्ण होताच बरोबर मागे असलेली अध्यात्माच्या बाजूची रांग बिघडली. अवघड होतं. एक रांग देखील एकाच रंगाची पूर्ण करू शकलो नाही. 

इतरत्र नजर फिरवली,तर काही मंडळींची एखाद बाजू पूर्ण दिसायची. काहींची कुठली बाजू पूर्ण असली,तरी कुठलीच बाजू इतर बाजूंपेक्षा श्रेष्ठ नसते. आयुष्याची क्युब दुसरीकडून पहिली,तर बाकीच्या बाजूंची बोंबच दिसायची. सगळ्यांची सगळ्या बाजू पूर्ण करायची धडपड. पण कुठली तरी बाजू अपूर्णच. मग जाणवले,की वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या बाजू काही काळा करता पूर्ण दिसत. काही काळ गेल्यावर दुसरी बाजू,पूर्ण करण्याच्या नादात पूर्ण झालेली बाजू पुन्हा विस्कळित. एकाच वेळी सगळ्या बाजू पूर्ण होणे नाहीच. 

मग विचार आला, सगळ्या बाजू काही औंशी पूर्ण करायचा प्रयत्न करत राहणे,एवढेच आपल्या हातात. बऱ्यापैकी पूर्ण असलेली बाजू तेवढ्यापुरतं चांगली दिसते. पण दुसऱ्या बाजू बघण्याचा प्रयत्न केला,की त्यांची अपूर्णता जाणवायची. 

कुटुंबाच्या बाजूत थोडे पैशाचे चौकोन घुसून ती बाजू विस्कळित. तब्येतीच्या बाजूत प्रसिद्धीचे चौकोन घुसून ती बाजू बिघडवायची.सगळीच गुंतागुंत. कुठलीच बाजू धड किंवा पूर्ण नाहीच.कोणाचीच क्युब पूर्ण नसतेच. त्यातल्या त्यात पूर्ण असलेली बाजू प्रथमदर्शनी ठेवून, सगळी क्युब पूर्ण असल्याचा फोल देखावा करणे. खेळातली क्युब सोडवली होती खरी. पण आयुष्याच्या क्युबची एखाद बाजू तरी पूर्ण होईल का, ही शंका मनात घुटमळत होती. मग दुरून ती क्युब पहिली,आणि त्या अपूर्ण पण रंगीबेरंगी क्युब सुद्धा देखणी वाटू लागली. कदाचित,कुठलीच बाजू पूर्ण करण्याचे वांझोटे प्रयत्न सोडून द्यावे. आपल्या आयुष्याची क्युब आहे तशीच अपूर्ण पण वैविध्यपूर्ण आहे. एखादी रांग जमेल तशी पूर्ण करावी. नाही जमल्यास, विस्कटलेल्या रांगेतील वैविध्यतेचा स्वाद घ्यावा.  पूर्ण असलेली क्यूबच श्रेष्ठ, हा अतिरेकी हट्ट सोडून दिला,तरच विविधरंगी क्यूबचे सौंदर्य जाणवेल. आयुष्यतला कुठलाच पैलू परफेक्ट नसतो. Happiness lies more in savoring the delectable imperfections rather than seeking it in an obsessive quest for perfection. ती अर्धवट रंगीबेरंगी क्युब त्या मुलाला परत देताना पराभव पत्करलयाची रुखरुख होती,पण जाणिवेची क्युब पूर्ण झाल्याचा आनंद सुद्धा होता. 


Dr. Deepak Ranade.