Sunday, February 7, 2021

किंमत

 किंमत.

    त्याला वेदना असाह्य होत होत्या. हात डोक्यावर ठेवावा लागत होता. चेहऱ्यावर त्याची व्यथा स्पष्ट वाचता येत होती. खांद्या पासून कळा थेट उजव्या हाताच्या बोटांपर्यंत अक्षरशः विजेच्या झटक्या प्रमाणे दोन दोन मिनिटाने त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. मानेच्या मणक्या मधल्या 6व्या आणि 7व्या vertebrae च्या मधली उशी सरकली होती आणि उजव्या बाजूच्या नसेला पूर्ण आवळून टाकत होती. शस्त्रक्रियेला पर्याय नव्हता. कष्टचं काम करत होता. डोक्यावर वजन वाहून वाहून बिगारी काम करून त्या मानेवर अनंत अत्याचार झाले होते. 

सोबत त्याची बायको आणि तिच्या कडेवर त्यांचे तिसरे मूल. पोटा पाण्यासाठी धडपड करून जेमतेम दोन वेळचे पोटभर जेवण नशिबी. बायको सुद्धा दिवस भर त्या कोवळ्या जीवाला झोळीत ठेवून राबत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजीने वीणकाम केले होते.  स्वस्तात मानेचा  MRI करून घेतला होता आणि MRI मध्ये सर्व परिस्थिती स्पष्ट दिसत होती. 

          शस्त्रक्रिया म्हणजे खर्च आलाच. त्यांनी त्याबद्दल चौकशी केली. पोट भरण्या पुरते पैसे कमावणारी ही मंडळी. शक्यच नव्हते त्यांना पैशाची व्यवस्था करणे. 

माझ्या फीज सांगायला सुद्धा मला ओशाळल्या सारखे झाले. मी काय मागू आणि ते काय देणार?गणित जुळणे अशक्य. त्यांना काही शासकीय योजने अनतर्गत काही रक्कम मिळणे शक्य होती. अगदीच तुटपुंजी होती ती रक्कम. माझी शस्त्रक्रिया करण्याची फी, त्या रकमेच्या काही पट असते. ही शस्त्रक्रिया करायला शिकण्यासाठी,मी किती कष्ट घेतले,किती अडचणी आणि प्रयत्न केले होते, ती शस्त्रक्रिया करताना मी काय रिस्क घेतो,केवढी जबाबदारी अंगावर घेतो, हे सारे त्यांना समजणे शक्यच नव्हते. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला,आणि त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेता, आपण आपल्या कामाची काय किंमत सांगायची? 

आपण कुणासाठी काही प्रेमाने करतो,तेव्हा कित्येकदा समोरच्या व्यक्तीला त्याची किंमत कळते का? केलेल्या कामाची किंमत कोणी ठरवायची? मदत करणार्याने,की मदत घेणार्याने? मदत घेणाऱ्याची आपण केलेल्या मदतीची किंमत देण्याची दानत असते का? आणि दानत असून देखील त्या व्यक्तीला केलेल्या मदतीचा भाव  करण्याचे तारतम्य असते का? किंमत. कोणत्या currency मध्ये  होतो हा व्यवहार? 

   समोर बसलेल्या त्या बिचाऱ्या कडून काय मागणार मी?

त्याला सांगितलं की तूला माझ्यावर विश्वास आहे ना? म्हणजे ही शस्त्रक्रिया करताना तुझ्या जीवाला धोका आहे. स्वरपेटीच्या पडद्याची  हालचाल करणाऱ्या नसा खूप जवळ असतात आणि त्यांना धक्का लागला,तर तुझा आवाज कायमचा घोगरा होऊ शकतो. भूल देताना 2 टक्के लोकांचा रक्तदाब एकाएकी पडू शकतो.हे सारे तुला सांगितले आहे आणि त्यावर तुला स्वाक्षरी करावी लागेल.(consent)

         तो म्हणाला "साहेब,माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही बिनधास्त ऑपरेशन करा.काय झाले तर तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. पण मला ह्या त्रासातून मोकळे करा. मला जमेल तेव्हढे पैशाची व्यवस्था मी करेन.म्हेवण्या कडून, कंत्राटदारा कडून advance घेईन,पण प्लीज माझे ऑपरेशन करा. 

   त्याला मी म्हणालो "उद्या ऍडमिट व्हायला ये. हॉस्पिटल मध्ये तुला योजने अंतर्गत मदत मिळते. तूझा माझ्यावर असलेला विश्वास हीच माझी फी. 

बऱ्याच किमती, पैशात मोजता येत नाहीत. मी माझ्याकडून सर्व नीट  करेन आणि तुला तुझ्या व्यथेतून मुक्त करायचा प्रयत्न करेन."

माझ्या कन्सलटिंग मध्ये नेहेमीच गाणी ऐकत काम करतो मी. नेमके तो निघत असताना मदनमोहनजी यांच्या एका अविसमरनिय गाण्याची सुरवात झाली.  त्या पेशंटचा निरोप घेत, उस्ताद रईस खानच्या सतारीचे डोळ्यात पाणी आणणारे स्वर कानी पडले. सतारीचे स्वर इतके बोलके आणि काळजाला भिडणारे. मग त्या स्वरसम्राज्ञी देवतेचा आवाज कानी पडला.


"हम है मताये कुचा,बाजार की तरह 

उठती है हर निगाह खरीदार की तरह"


 गाणे डोळे मिटून 5 मिनिटे शांततेत ऐकत बसलो. मजरूह सुल्तानपुरी यांची शब्द रचना. काटा येतो ऐकताना.प्रत्येक जण खरीदारच असतो. किंमत आपआपल्या कुवती प्रमाणे देतो. सर्व गोष्टींची किंमत मोजावी लागतेच.स्वतःला,किंवा इतरांना. आपल्या कष्टाची,स्वातंत्र्याची,निर्णयांची. सौदा पटला,तर व्यवहार होतो. मग कधी कधी किंमत आपण केलेल्या मदतीची जाणीव. ती देखील किंमतच असते.होतो तो व्यवहारच असतो. किंमत चुकवण्याचा.

No comments: