Sunday, January 29, 2023

Bimba pratibimbs



        बिंब- प्रतिबिंब


प्रतिबिंबाने बिंबाला उधळले

कसे, कधी बिंबालाही नाही कळले

बिंब होते लोभस,निर्मळ,शुद्ध

होते  स्वयं, अव्यक्त  बुद्ध

अपेक्षांच्या चिखलाने सारे मळले

प्रतिबिंबाने बिंबाला उधळले


प्रतिबिंबाला नव्हतेच कधी बिंब पसंत

नसलेल्याचीच होती असलेल्या पेक्षा खंत

बिंबाला सुधारण्याचे केले प्रयत्न कोरून

व्यर्थात टाकले बिंब पूर्ण पोखरून

प्रतिबिंबाने बिंबाला उधळले

कसे,कधी,बिंबालाही ना कळले


बिंबाला नव्हती कोणतीही आसक्ती

स्वयंसिद्ध, जाणिवेत केवळ अद्वयभक्ती

प्रतिबिंबाने जागविला द्वैताचा भास

आरंभला काम, क्रोध,वासनेचा प्रवास

प्रतिबिंबाने बिंबाला उधळले

कसे,कधी,बिंबालाही ना कळले


प्रतिबिंबाने बिंबाला चकवले क्षणात

बिंबाच्या अस्तित्वावर केला आघात

तू खोटा मीच खरा अवघे भासवले

बिंबाच्या पावित्र्याला सहजच नासवले

प्रतिबिंबाने बिंबाला उधळले

कसे कधी बिंबलाही ना कळले


बिंबाला कधी होणार साक्षात्कार

बिंबाचे स्वरूप  निर्गुण निराकार

प्रतिबिंब काल्पनिक, क्षणिक नश्वर

बिंब स्वतःच साक्षात परमेश्वर

प्रतिबिंबाला बिंब जेव्हा उधळेल

 तेंव्हाच बिंबाला बिंबत्व कळेल

No comments: