विश्वास,श्रद्धा,धाडस,दैव,कर्म,बेफिकिरी..........
"तुला मी खरे काय ते सांगणार आहे. पेशंट पासून काही लपवून ठेवले,आणि शेवटी त्याला सत्य कळले,तर बऱ्याच जणांना विश्वासघात झाल्यासारखे वाटते.म्हणून,सत्य कितीही कटू असले तरी ते सांगितलेले कधीही इष्ट. "
त्या 28 वर्षाच्या युवकाला हे सांगितल्यावर तो थोडा सिरीयस झाला.
"तुझ्या मानेच्या मणक्यामध्ये (cervical spinal cord)एक 2 इंच लांब आणि पाऊण इंच जाड गाठ आहे. ती गाठ ऑपरेशन करूनच काढावी लागेल. दुसरा कुठलाच पर्याय नाहीये."
दोन मिनिटे शांतता. कोणी काहीच बोलत नव्हते. पेशंटचा भाऊ आणि एक मित्र,असे तिघे जण माझ्याकडे टक लावून बघत होते.
मी उगाच एवढे स्पष्ट बोललो की काय?
"जोर का झटका धीरेसे" द्यायला हवा होता का? असो. मी ठरवलं होतं,की आता,जे अनिवार्य असते,ज्याला दुसरा काहीच पर्याय नाही,ते सरळ,सोप्या स्पष्ट भाषेत सांगून टाकायचे. बरेचदा,जे आद्यरुत असते,पण भीतीपोटी व्यक्त केले जात नाही, ते अव्यक्तेपण खूप ताण वाढवते. मग हळूच इकडून तिकडून indirectly प्रश्न विचारत,अधिक मानसिक वेदना आणि कल्पनाशक्तीविलास.
दोन मिनिटांनी त्या पेशंटनेच उद्गार काढत ती गूढ शांतता मोडून टाकली.
"डॉक्टर,मणक्याच्या आत गाठ आहे,म्हणजे मणका चिरून ती गाठ काढायला लागेल का? आणि तसे करताना पुढील आयुष्यात अपंगत्व येईल का? "
आता मी धर्मसंकटात सापडलो होतो.
"शस्त्रक्रियेनंतर तुझ्या हाता पायाची ताकद तात्पुरती,किंवा कवचितकाळी कायमस्वरूपी कमी जास्त होऊ शकते. खचित तुला प्रदीर्घ काळ ventilator वर देखील ठेवावे लागू शकते. कारण गाठ श्वासावर नियंत्रण ठेवणाऱ्या मानेच्या मणक्याच्या त्या नाजूक भागात आहे." आता एकदा स्पष्ट बोलायचे ठरवले आहे,तर मग होऊन जाऊदे.
पुन्हा,शांतता. ते तिघे एकमेकांकडे बघत होते. पुढे काय बोलायला उरलेच नव्हते. आर या पार.
मला वाटले होते,की ही मंडळी आता "बरे आहे,आम्ही विचार करून तुम्हाला कळवू." असे नेहेमीचे वेळ काढू उत्तर देऊन क्लिनिक मधून पाय काढतील.
पण त्यांच्या प्रतिक्रियेने मलाच धक्का बसला. पेशंटनेच डायरेक्ट मला विचारले-
"डॉक्टर, ऑपरेशन करायचं आहे मला. ऍडमिट कधी होऊ?"
मला दोन मिनिटे काहीच सुचेना. मलाच शंका आली,की ह्याला मी सांगितलेले नीट कळले आहे का? की संभाव्य धोके पुन्हा समजावून सांगावे?
मी त्याला ऍडमिट व्हायला सांगितले आणि ऑपरेशनची तारीख ठरवून टाकली.
ह्या पेशंटला हाताला मुंग्या आणि बधिरपणा,एवढाच त्रास होता. एवढी मोठी गाठ त्याच्या मणक्याच्या आत असेल,ह्यावर कोणाचाही विश्वास बसला नसता.
MRI बघितल्यावरच खात्री पटायची. मानेचा मणका तसा खूपच नाजूक.हाताच्या अंगठ्या एव्हढ्या जाडीचा,पण मानेखालच्या सर्व शरीराचे नियंत्रण करणाऱ्या नसा तेवढ्या भागात घट्ट पॅक बंद असतात. शिवाय,श्वास घेण्याचा सर्वात महत्वाचा स्नायू ,diaphragm च्या नसा देखील याच भागातून निघतात.
आता,ऑपरेशन करताना,हा मानेचा मणका उभा चिरून,1 cm खोल जाऊन ती गाठ काढायची होती.
हातापायांची ताकद कायमस्वरूपी कमी होण्याची दाट शक्यता होती. ह्या तरुणाचे उभे आयुष्य जगायचे राहिले होते(अजून अविवाहितच होता). ऑपरेशन टेबल वर घेताना पूर्ण धडधाकट असणारा. खूप मोठा धोका पत्करत होतो मी. संभाव्य धोके डोळ्यासमोरून फ्लॅश होत होते. बरेचदा,पेशंट आणि नातेवाईक ह्यांचे 'अज्ञानात सुख'अशी अवस्था असते.सर्जनलाच सत्य परिस्थिती घाबरवत असते.
पेशंट माझ्यावर विश्वास ठेवून मोकळा झाला होता. मलाच त्या विश्वासाचे ओझे पेलायचे होते.
त्याचा निर्णय,हा विश्वास,की अंधविश्वास? आयुष्यावर उदार होऊन केलेले धाडस की मनाचा समतोल राखून निवडलेला व्यवहारी प्रॅक्टिकल मार्ग?
कोणास ठाऊक काय म्हणावे त्याच्या या वागणुकीला.
मी अधिक विचार न करता कामाला लागलो.
ऑपरेशन करण्यापूर्वी tractography नावाचा MRI करून घेतला. या MRI मध्ये मानेच्या मणक्यातून प्रवास करणाऱ्या सर्व tracts ची रचना आणि गाठीमुळे कशा प्रकारे दबले गेलेत, याचा सखोल अभ्यास करता येतो. या tractography च्या फिल्म्सचा खोलात जाऊन 3 ते 4 तास अभ्यास केला.
ऑपरेशन करताना SSEP आणि MEV ही नसांची मोनिटरिंग करणारी आधुनिक प्रणाली वापरायचे नियोजन केले.
ऑपरेशन सुरू केले. मणका एक्सपोस केला. मध्य भागात रक्तवाहिन्या नसलेल्या प्लेन microscope मधून अचूक टिपला. छातीत धडधड चालू होती. मग देवाचे नाव घेत,तो मणका उघडला. मोनिटरिंग सतत चालू होतेच. थोडे आत गेल्यावर ती तांबूस रंगाची गाठ दिसली. मोठी होती.
मग मन एका वेगळ्याच अवस्थेत पोचले. पुढील एक तासात अत्यन्त शांतपणे,CUSA हातात घेऊन हळू हळू ती सगळी गाठ काढली. ती मनाची अवस्था शब्दात व्यक्त करणे कठीण. त्या क्षणात माझे स्वतःचे अस्तित्व नाहीसे होते. भय,आपल्या अहंकाराचीच अभिव्यक्ती असते. जिथे माझे वेगळे अस्तित्व नसते,अहंकार नसतो,तिथे उरते केवळ जाणीव. भय हे भूत, भविष्य या काळाच्या कल्पनेतच असते. त्या क्षणात पूर्ण लक्ष केंद्रित केले, की भयाचा लोप होतो. उरतो केवळ तो क्षण.मग त्या अवस्थेत,काळाचा भान हरपून जातो. उरतो केवळ भावनातीत, साक्षीभाव. त्या अनाकलनीय आदी शक्तीवर एक दृढ विश्वास,श्रद्धा असते. ती शक्ती माझ्या हातात उतरली आहे, याची खात्री मनात ठेवून शस्त्रक्रिया चालू राहते. दृष्टा, दृष्टी,दृष्य ही त्रिपुटी एका विलक्षण अद्वैतात विरघळून जाते.
अखेर, गाठ पूर्ण निघाली आहे,याची खात्री करून मी gloves काढले. पुन्हा त्या आदिशक्तीला नमन करून मी सर्जनरूम मध्ये कॉफी मागवली.
काल हा तरुण टाके काढायला क्लिनिकला आला होता. त्याला बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्याला घट्ट मिठी मारली. त्याचा माझ्यावर असलेला विश्वास,की माझा त्या शक्तीवर विश्वास,की त्याचे आणि माझे धाडस,की आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवतेचे कर्तब? कोणीच ह्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकणार नाही. काही प्रश्न अनुत्तरीतच राहिलेले बरे.
Dr Deepak Ranade.
(खलील विडिओ पेशंटच्या संमतीने अपलोड केला आहे)