माझी एक मैत्रीण खूप वर्षानंतर भेटली. तिची कहाणी काही औरच होती.
तिला तिची चूक लग्नाच्या काही महिन्यातच लक्षात आली होती. पण, तो पर्यंत दिवस गेले होते. खऱ्या अर्थाने. वर्षाच्या आतच मूल झाले आणि मग सर्व चित्रच बदलून गेले. आता, अंगावर आणखी एक जबाबदारी पडली होती. तिला चूल, मूल,आणि पैसे कमवणे,सर्वच गोष्टी एकटीला कराव्या लागत होत्या. पण,अत्यन्त धारिष्टाने,कसोशीने,आणि धीटपणे,तिने सौंसाराचा गाडा सामर्थ्याने ओढला. काळ लवकर सरत होता. मुलगी 18 वर्षाची झाली. सासर कडच्यांनी मुलीचे कान भरले.
"तुझी आई तुझ्याकडे नीट लक्ष देत नाही. तिला फक्त पैसे कमवणे, एवढे एकमेव उद्दिष्ट."
बाप काहीही अर्थाजन, कामधंदा करत नव्हता. घरी फाक्या मारत बसून राहायचा. बापजाद्यांची इस्टेट आहे, आणि त्या जोरावर आयुष्य भर काहीच केले नाही. आता एकटीनेच सर्व कुटुंबाचा भार पेलायला तिला अवघड जात होते. नवऱ्याकडून काहीच मदत,आधार नव्हता. एवढे सगळे करून सावरून कोणालाच त्याची जाणीव नव्हती. त्या कुटुंबात रहाणे आता तिला अशक्य झाले होते . एके दिवशी,तिने सरळ गाशा गुंडाळला आणि आयुष्य एकटीने लढायचे ठरवले. मुलगी वयात आली होती,पण तिचे कान भरण्यात आले होते आणि तिला आई बद्दल तिरस्कारच होता. मुलीच्या शिक्षणाची पूर्ण व्यवस्था माझ्या मैत्रिणीने करून ठेवली होती.
माझ्या मैत्रिणीने ठरवले,मुलीला सत्य परिस्थिती सांगितली,तर ती सासरकडच्यांपासून सुद्धा दुरावेल. माझ्या अहंकारपोटी तिला अधांतरी ठेवण्यापेक्षा तिला सासरी सोडून, दोष स्वतःचा आहे,असे सांगून, ही नायिका बाहेर पडली आणि सासर कडून कुठलीच अपेक्षा न ठेवता,तिने आपले छोटे का होईना, स्वतःचे साम्राज्य निर्माण केले. तिच्या चुकलेल्या निर्णयाची किंमत तिला स्वतःला मोजावी लागली. ती अलीकडे भेटली. हसतमुख, आनंदी, कुठलेही किल्मिश कटुता अभिनिवेश,न्यूनगंड,न बाळगता ती तिच्या आयुष्यात सुखी दिसत होती.
तिला विचारल्या शिवाय रहावेना.
"तू इतके सगळे भोगून इतक्या कृतघन मंडळींना माफ कसे केलेस? कोणा बद्दल कुठलीच नेगटीव्ह भावना मनात न ठेवणे,कसे काय जमते तुला?"
तिचे उत्तर खूपच मार्मिक होते.
"दीपक, माझे भोग होते ते भोगण्या शिवाय पर्याय नव्हता. काही देणी, ही कार्मिक तत्वावर आधारलेली असतात. त्या देण्याची कारणे, हिशोब,आपल्याला ह्या जन्मी कळू शकत नाही. आपणच त्या त्या वेळी तसे तसे निर्णय का घेतो, याचे तू उत्तर देऊ शकतोस का? कार्मिक हिशोब चुकते करायचे असतात आपल्याला. तु ह्या जन्मी ज्यांची देणी आहेत,ती परत करताना करणे शोधतोस का? एकच कारण पुरते. मी जे घेतले होते ते परत करतोय. मग मागच्या जन्मीचे देणी परत करताना फरक इतकाच,की त्या ऋणाची स्मृती नसते. पण देणे तर असतेच. उगाच त्रास करून घेतला, तर सुखाचा जीव दुःखात लोटून देतो आपण. आता ह्या जन्मात तरी कोणी नवे देणेकरी नकोत,कोणाची नवीन उधारी नको. शेवटचा श्वास ऋणमुक्त घ्यायचा आहे मला. मनात जर कटुता बाळगली त्या सर्व मंडळींच्या बद्दल,तर ते ऋण राहील आणि ते फेडायला पुन्हा एक नवीन प्रवास.
प्रवासाला थकले मी आता. आता एकदम कैवल्यात कायमचा मुक्काम करावा म्हणते."
पुनर्जन्म आहे,की नाही मला माहित नाही. ह्या जन्मी जे दिले असेन, त्याचा परतावा होण्यासाठी परत यावे लागेल का? मग ह्या जन्मी दिले,ते मागील जन्माचे ऋण होते,की ह्या जन्मी नवे अकाउंट उघडत होतो? काही प्रश्न अनुत्तरित रहाणार. उत्तरे मिळणे नाही हेच खरे. पण, तिचे तत्वज्ञान ऐकल्यावर वाटले, की त्या तत्वज्ञानाने तिचे आयुष्य नक्कीच सुखी आणि समृद्ध करीत होते.
"गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळ्या आणि थोडी पाने"
कोणाचे किती, देणे बाकी आहे अजून कोणास ठाऊक. सरते शेवटी, ह्या अथवा मागच्या जन्माचे असेल,आयुष्य म्हणजे कार्मिक देवाण घेवाण, इतकेच असते का? हिशोब काही संपत नाही. ह्या जन्मी तर सोडाच,पुढल्या कित्येक जन्म चालूच रहाणार. कार्मिक वजा बाकी हेच आयुष्याचे अटळ सत्य.
Dr Deepak Ranade.