Wednesday, August 3, 2022

वो अफसाना जिसे अंजाम तक

 वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन 

उसे इक ख़ूब-सूरत मोड़..........


3 तास झाले होते. तो ट्युमर अत्यन्त किचकट आणि चिवट होता. मेंदूच्या अगदी डेखा पासून पुढील डोळ्याच्या मागील भागात पसरला होता. त्या ट्युमरने मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या सर्वात महत्वाच्या रक्तवाहिनीला (carotid artery) पुर्ण विळखा घातला होता. तो ट्युमर अवघ्या मध्यम आकाराच्या पेरू एवढा होता. पेशंट 62 वर्षाची माऊली होती. तिचा रक्तदाब काही केल्यास नियंत्रणात येत नव्हता. सर्वसाधारणतः मेंदूची शस्त्रक्रिया करताना रक्तदाब 70 ते 80 mm ला खाली ठेवला जातो. ट्युमर मधून होणाऱ्या रक्तस्रावावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे खूप मोलाचे साधन असते. पण या माऊलीचा रक्तदाब काही केल्यास 140 mm पेक्षा खाली येतच नव्हता. अशाच काही बिकट परिस्थितीत त्या ट्युमरने मारलेली घट्ट मिठी हळू हळू सोडवण्याचे काम चालू होते. प्रत्येक ट्युमर वेगळा असतो. प्रत्येक ट्युमरचे आपापले एक unique व्यक्तिमत्व असते. काही ट्युमर मऊ असतात,काही कडक. काही मेंदूला घट्ट मिठी मारून बसतात,तर काहींच्या मिठीची पकड थोडी शिथिल असते. काही ट्युमर इतके काही मेंदू सारखेच दिसतात,की नेमका ट्युमर कुठचा,आणि नॉर्मल मेंदू कुठचा,हे कळणे कर्म कठीण. 

Tissue texture, म्हणजे, इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने स्पर्श करून, त्या स्पर्शावरून  ट्युमर की नॉर्मल मेंदू, याचा तपास करावा लागतो.

आजचा ट्युमर खूपच चिडका होता. थोडासा तुकडा काढला तरी लगेच भुसभुस रक्तस्राव चालू. प्रत्येक ट्युमरचे वेगवेगळे स्वभाव. काहींना गोंजारत गोंजारत विनवण्या करीत अलगद हळुवारपणे मिठी सोडवावी लागते. काहीवेळा,थोडा आक्रमक पवित्रा घेऊन, एखाद्या तटस्थ ट्युमवर तुटून पडावे लागते. ट्युमरशी झुंज देता देता, पहिल्या तासातच ट्युमरचा चांगला परिचय होतो. मनोमनी ट्युमरशी संवाद साधायला सुरू करतो.

Microscope वेगवेगळ्या दिशेने फिरवत त्या ट्युमरला वेगवेगळ्या angle ने बघावे लागते. कधीकधी मनात त्या ट्युमर बद्दल विलक्षण आदर वाटतो. ह्या ट्युमर बरोबर अजिबात शहाणपणा चालणार नाही,ह्या ट्युमरला घाबरायचे काहीच कारण नाही, असे मनोमनी ठोकताळे बांधायचे. ट्युमरशी शत्रुत्व न बाळगता,प्रेमाने त्याचा विळखा सोडवायचा,हेच धोरण योग्य. 

आजचा ट्युमर मात्र मेंदूच्या जरा जास्तच प्रेमात होता. त्याने मारलेली मिठी सोडवणे कर्म कठीण. खूपच गुंतागुंतीचे नाते होते. जोर लावणे,हा पर्याय नव्हता. त्या ट्युमरच्या घट्ट आणि ताकदवान बाहुपशातून सोडवले, हात सोडवून झाले होते, पण शेवटची करंगळी सुटता सुटत नव्हती. 

   ट्युमरचा तो एक इवलासा भाग रक्तवाहिनीशी जसा काही एकजीव झाला होता. सोडवताना हृदयाचे ठोके वाढत होते. AC असून देखील,भोवयीवर टेन्शन घामाच्या बिंदूच्या रूपाने झीरपले होते. जाऊदे. 

दोन मिनिटे, microscope बाजूला केला आणि 5 ते 6 मोठे श्वास घेतले. 

ट्युमरचा तो भाग काही केल्या सुटत नव्हता. तो सोडवण्यासाठी जीव धोक्यात टाकायचा, की नाही,हा अवघड निर्णय घेण्याची वेळ येते. 

खूप प्रयत्न करून देखील तो क्षण येऊन ठेपतो. काही नात्यांचा पूर्ण विळखा काहीही केल्यास सुटत नाहीच. आपला थोडासा भाग मग तसाच ठेवावा लागतो. ती करंगळी तशीच रेंगाळत ठेवून द्यावी. कदाचित विळख्याच्या ताकदीची आठवण म्हणून.

    एकदम साहिरच्या  त्या  अविसमरणीय गाण्याच्या ओळी समरल्या.

वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन,

असे इक खूबसुरत मोड देकर  छोडना   अच्छा............


काही वेळा, काहीतरी सोडून द्यायला देखील किंमत मोजावी लागते. आपल्या अहंकाराची. 

जैन तत्वज्ञानात ह्याला अवमौदार्य असे म्हणतात. शिखर सर करायची पूर्ण क्षमता असताना देखील, शिखर सर न करता शिखराच्या अलीकडे थांबायचे.

शिखर सर केल्याने अहंकार बळावतो. 

"Discretion is the better part of valor."

नम्रपणे माघार घेणे,ह्यातच शहाणपणा. 

सुदैवाने, पेशंटचा रक्तदाब वगरे इतर सर्व parameters stable झाले आणि मग closure करायला सुरुवात केली. 

अनाहूतपणे,एक गाणे गुणगुणत होतो. 

"स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकात केव्हा

गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा "


Dr. Deepak Ranade.